आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचा मूक महामोर्चा

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजाचा मूक महामोर्चा

पुणे : नोकरी व शिक्षणात मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे या आणि मुस्लिम वक्‍फ बोर्डच्या जमिनींवरील आरक्षण हटवा. मुस्लिम मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारा. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करा. मॉब लिंचिंग (जमावाने मारणे)च्या घटना थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीतर्फे रविवारी (ता. 9) पुण्यात मूक महामोर्चा काढण्यात आला. 

या मोर्चाचे नेतृत्व मुस्लिम महिला व तरुणींनी केले. मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोळीबार मैदान ते विधान भवनपर्यंत काढलेल्या मोर्चाच्या अग्रभागी तिरंगा झेंडा होता. मोर्चाचे समन्वयक रशीद शेख, हाजी नदाफ, नगरसेवक हाजी गफूर पठाण, नासिर मुजावर, इक्‍बाल अन्सारी, मुनवर कुरेशी, बाबूझुबेर शेख, अंजूम इनामदार, फारुक इनामदार, राहुल ढमाले तसेच मागण्यांचे फलक घेऊन महिला, पुरुष बहुसंख्येने सहभागी झाले होते. 

खासदार संजय काकडे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, अनिल हातागळे, रमेश राक्षे मोर्चात सहभागी झाले होते. शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, भीम छावा, भीमसेना माथाडी, लहूजी समता परिषद, राष्ट्रीय जनसेवा प्रतिष्ठान, जनता दल (धर्मनिरपेक्ष), क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना या संघटनांनीही मोर्चाला पाठिंबा दर्शविला. 

मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुश्‍ताक पटेल, मुख्तार पटेल, मनसूर निसार पटेल, अबुशेठ तांबे, भीमसेवा समाजातर्फे संजय सरोदे, अशोक शिंदे यांच्यातर्फे तसेच विविध संघटनांतर्फे मोर्चातील नागरिकांना बिस्किटे आणि पाणी वाटण्यात आले. 

प्रमुख मागण्या 

- सामूहिक हत्याकांडातील दोषींना फाशी द्यावी. 
- मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डमध्ये हस्तक्षेप करू नये. 
- मुस्लिम, दलित समाजावरील अत्याचार थांबवावेत. 
- मुस्लिम समाजाला ऍट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com