चिमकुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात शांततेत मूक मोर्चा!

प्रसाद पाठक
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

पुणे : राज्यात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, नुकतेच नगरमध्ये अकरा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या निषेधार्थ येथील पद्मशाली समाजाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता.
​#NagarIncident 

पुणे : राज्यात ठिकठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार, नुकतेच नगरमध्ये अकरा वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या निषेधार्थ येथील पद्मशाली समाजाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यात महिला आणि तरुणींचा मोठा सहभाग होता.
​#NagarIncident 

पन्नास हजार महिलांचा सहभाग
अहमदनगर येथील घटनेचे तीव्र पडसाद राज्यात सर्वत्र उमटले. असंतोषाचा उद्रेक झाला. नगर, सोलापूर नंतर पुण्यात पद्मशाली समाजच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील कधीही रस्त्यावर येणाऱ्या महिला प्रथमच आपल्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. पन्नास हजाराहून अधिक महिला या मुक मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

महाविद्यालयीन विद्यार्थिनी कडाडल्या
भवानी पेठेतील पद्मशालीपुरम येथील कामगार मैदानापासून या भव्य मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी विविध नेत्यांची भाषणे झाली. मोर्चा पंडित नेहरू मार्गाने रास्तापेठ पॉवर हाऊस, समर्थ पोलिसचौकी मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यात कष्टकरी, विडी कामगार महिला आणि शालेय, महाविद्यालयीन तरुणींची संख्या लक्षणीय होती. शांततेने आणि सुनियोजनरीत्या निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्यानंतर तिथे निधी मद्देल, वैष्णवी गुलापेल्ली, रिया दासरी, तृष्टी चिंतल या तरुणींची जोशपूर्ण भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणातून झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संताप व्यक्त केला. बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यापुढे अशी कुकर्म करणाऱ्याला जरब बसेल अशी कारवाई व्हावी. निर्भया प्रकरणानंतर संमत केलेल्या कायद्यानुसार हा गुन्हा चालवावा अशी आग्रहाची मागणी केली.

व्यवसाय बंद ठेऊन सहकुटूंब मोर्चात सहभागी
या मोर्चात अनेक जण सहकुटूंब सहभागी झाले होते. पद्मशाली समाजातील कारखानदारांनी, व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात गंज, भवानी, नाना पेठेतील सर्व पक्षाचे नगरसेवक, राजकीय कार्यकर्ते, याशिवाय स्वकुळ साळी, कोष्टी व इतर समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी खासदार संजय काकडे यांनी या मोर्चाबाबत आपल्या भावना व्यक्त करून मागण्यांना एका पत्रकाद्वारे पाठींबा व्यक्त केला.

विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी
मोर्चातील तरुणींचा भाषणानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात प्रामुख्याने नगरच्या बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, या प्रकरणी अॅड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी. बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी अशा मागण्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. वसंतराव येमुल, सोमनाथशेठ केंची, ज्ञानेश्वर बोड्डू, मिनाक्षीताई काडगी, नंदा गरदास, वंदना पासकंठी, शुभांगी अंदे आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: silent protest against Abuse little Girl and women in pune