सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण

सोन्याच्या नावाखाली 
चांदीचे दागिने तारण
Published on: 

मंचर, ता. ७ : सोन्याचे दागिने असल्याचे भासवून प्रत्यक्षात चांदीचे दागिने तारण ठेवत एका पतसंस्थेकडून ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अधिकारी राजेंद्र शिवराम गायकर (वय ६०, रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन राधाकिसन मोरे (रा. नांदूर, ता. आंबेगाव) यांनी ८ जून २०२६ रोजी श्री आंबिका ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) शाखेत खाते उघडून सभासदत्व स्वीकारले. त्याच दिवशी त्यांनी ३८ ग्रॅम ६०० मिली वजनाचे दागिने सोन्याचे असल्याचे सांगून तारण ठेवले. मूल्यांकनानंतर व्यवस्थापक योगेश गावडे यांनी ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचे कर्ज मंजूर केले.
त्यानंतर १६ जून रोजी मोरे यांनी पुन्हा ७६ ग्रॅम ९०० मिली वजनाचे दागिने तारण ठेवून ६ लाख २७ हजार रुपयांचे कर्ज घेतले. अशा प्रकारे दोन व्यवहारांत त्यांनी एकूण ९ लाख ४१ हजार ५०० रुपयांचे कर्ज उचलले.
दरम्यान, तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत मूल्यांकन करणारे कर्मचारी किरण सूर्यकांत दहिवाळ यांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर पुन्हा तपासणी केली असता दागिन्यांमध्ये केवळ २२. ५७ टक्के सोने, तर ७७.२६ टक्के चांदी असल्याचे आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, कर्जदाराने दिलेल्या पत्त्यावर चौकशी केली असता नांदूर येथे सचिन मोरे या नावाची व्यक्ती राहत नसल्याचे आढळून आले. तसेच कर्जासाठी सादर केलेली कागदपत्रेही बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोन्याच्या नावाखाली चांदीचे दागिने तारण ठेवून आणि खोटी कागदपत्रे सादर करून पतसंस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलिस करत आहेत. याबाबत पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे म्हणाले, ‘‘सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक कार्यरत केले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.