

संस्था संगणकीकरणात सिंधुदुर्ग देशात प्रथम
डॉ. भवानी शंकर ः २१४ पैकी २०९ संस्थांचे काम पूर्ण
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या संगणकीकरणात सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यासह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील २१४ पैकी २०९ संस्थांचे म्हणजेच सुमारे ९८ टक्के संगणकीकरण पूर्ण झाले असल्याचे मत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) पुणे विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर यांनी येथे व्यक्त केले.
केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची माहिती प्राथमिक सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कार्यकारी संचालक दिलीप दिधे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँक अधिकारी प्रमोद गावडे, वसंत हडकर आदी उपस्थित होते.
डॉ. भवानी शंकर म्हणाले, “महाराष्ट्रातील संस्था संगणकीकरणाच्या टी-१ प्रकारातील कामकाजाचा आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९८ टक्के काम पूर्ण करून अव्वल स्थान मिळविले आहे.” हे काम खूपच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात या कामाचा चांगला परिणाम सहकार क्षेत्रात दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी म्हणाले, “जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांनी प्रत्येक वेळी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. त्यामुळेच संगणकीकरणात देशात प्रथम क्रमांक मिळविता आला. मागील पाच वर्षांत जिल्हा बँकेने संस्थांना विविध प्रकारे आर्थिक पाठबळ दिले आहे. सचिवांच्या वेतनासाठी तूट भरपाई, संगणकीकरण पूर्ण करणाऱ्या सचिवांना आवश्यक सहकार्य बँकेने केले आहे.”
जिल्ह्यातील प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा देखरेख संघामार्फत सचिव यंत्रणेच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. आगामी काळात किमान १५० गटसचिव नियुक्त करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संस्थांच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता येईल. संगणकीकरणासह संस्थांच्या आर्थिक व्यवहारांना अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.