शिर्सुफळ ग्रामपंचायतीकडून एकल महिलांचा सन्मान

शिर्सुफळ ग्रामपंचायतीकडून एकल महिलांचा सन्मान
Published on

इंदापूर, ता. २४ : ‘एकल महिलांना समाजाकडून सहानुभूती नको, तर सन्मान हवा,’ असा निर्धार शिर्सुफळच्या सरपंच जुई हिवरकर यांनी व्यक्त केला. शिर्सुफळ ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी (ता. २३) ‘एकल महिला सन्मान दिना’निमित्त त्या बोलत होत्या.
शिर्सुफळ ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात गावातील एकल महिलांचा गौरव करण्यात आला. हिवरकर म्हणाल्या, ‘‘विधवा महिलांनी जुनाट रूढी-परंपरा झुगारून आत्मविश्‍वासाने जगावे.’’ सामाजिक कार्यकर्ते कचर शिंदे यांनी यावेळी संजय गांधी निराधार योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती दिली. चर्चेदरम्यान महिलांनी विधवा पेन्शन योजनेतील मुलांच्या २५ वर्षांच्या वयाची अट रद्द करण्याची मागणी केली. ही अट योजनेच्या लाभासाठी अडथळा ठरत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
या मागणीची दखल घेत हिवरकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून हा प्रश्‍न शासनस्तरावर सोडवण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात महिलांनी वटवृक्षाच्या चित्रावर हाताचे हिरवे ठसे उमटवून ‘आम्ही समाजाचा अविभाज्य भाग आहोत’ असा संदेश दिला. यावेळी अंगणवाडी सेविका रंजना शिंदे, स्नेहा हिवरकर, सोनाली शिंदे, ताई गावडे, संध्या घायतडके, मनीषा थोरात उपस्थित होत्या.

Marathi News Esakal
www.esakal.com