esakal | पुण्यातील 'या' रस्त्याचे काम कासवगतीने
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील 'या' रस्त्याचे काम कासवगतीने

दोन वर्षांपासून सुरू असलेले मुख्य सिंहगड रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, रस्त्यावर पडलेले खड्डे, उडणारी धूळ यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत.

पुण्यातील 'या' रस्त्याचे काम कासवगतीने

sakal_logo
By
नीलेश बुरूडे

किरकटवाडी - दोन वर्षांपासून सुरू असलेले मुख्य सिंहगड रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, रस्त्यावर पडलेले खड्डे, उडणारी धूळ यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या कामाचा वेग वाढवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र, प्रयत्न करताना दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या नांदेड फाटा ते किरकटवाडी फाटा यादरम्यान मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता हे काम पूर्ण होण्यास किमान अजून दोन वर्षांचा कालावधी लागेल, अशी स्थिती आहे. 

हा रस्ता केवळ खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रस्ता खोदलेल्या ठिकाणी केवळ सिमेंटचे पोते मातीने अर्धवट भरून कडेला ठेवलेले आहेत. नांदेड फाटा ते डोणजे फाटा या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.  

डी आय ए टी गेटपासून पुढील अर्ध्या बाजूचा रस्ता करून वर्ष झाले; परंतु तरी उर्वरित बाजू तशीच अर्धवट ठेवलेली आहे. तसेच खडकवासला गावाच्या हद्दीतही रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. ठेकेदाराकडून अगोदर पावसाचे कारण दिले जात होते; आता रस्त्याच्या कामासाठी लागणारे सिमेंट काँक्रीट मिळत नसल्याचे कारण त्यांच्याकडून सांगितले जात आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी  मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

येत्या जून महिन्यापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्याचे आम्ही ठेकेदाराला बजावले आहे. दर दोन दिवसाला आम्ही त्यांच्याकडून कामाचा आढावा घेत आहोत. कोणतेही कारण न सांगता पूर्ण क्षमतेने रस्त्याचे काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना देण्यात आली आहे.
- चंद्रकांत नाईक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग  

loading image
go to top