चक्क सहा कोटींचा "घोडेबाजार'!

दीपक शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

अकलूज (जि. सोलापूर) येथील बाजारात 2540 घोड्यांची आवक झाली. त्यातील सुमारे 670 घोड्यांची विक्री होऊन 5 कोटी 80 लाख रुपयांची उलाढाल झाली.

अकलूजच्या बाजारात 2540 घोड्यांची आवक; 670 घोड्यांची विक्री

 

बावडा (पुणे) : अकलूज (जि. सोलापूर) येथील बाजारात 2540 घोड्यांची आवक झाली. त्यातील सुमारे 670 घोड्यांची विक्री होऊन 5 कोटी 80 लाख रुपयांची उलाढाल झाली.

दीपावली पाडव्याला (28 ऑक्‍टोबर) या घोडेबाजाराचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले होते. या बाजाराचे हे अकरावे वर्षे असून तो सुमारे दीड महिने सुरू राहतो. या बाजारात देशभरातील राजस्थान, पंजाब, गोवा, गुजरात, केरळ, तमिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, हरियाना आदी राज्यांतून जातिवंत घोड्यांची आवक होते.

या बाजारात वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, सुरक्षा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. घोडे खरेदीचा व्यवहार पारदर्शक पद्धतीने संगणकाद्वारे केला जातो, अशी माहिती अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व सचिव राजेंद्र काकडे यांनी दिली. घोडे बाजारामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, घोडे सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

लक्ष्मी घोडी सर्वगुणसंपन्न
घोडेबाजारात चाल व नाचकाम स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. यशराज जगदाळे (रा. सराटी, ता. इंदापूर) यांच्या घोड्याने चालीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला, तर चंद्रकांत खोमणे (रा. माळेगाव, ता. बारामती) यांच्या घोड्याने नाचकामात प्रथम क्रमांक पटकाविला. महेंद्र थोरात (रा. पिंपळगाव, जि. सातारा) यांच्या लक्ष्मी नावाच्या घोडीने सर्वगुणसंपन्नचा मान मिळविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six crores turnover in Akluj horse market