
फसवणूक प्रकरणी एकाला सहा महिने साधा कारावास
मंचर - भोरवाडी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शेतकरी चंद्रकांत निराभाऊ भोर यांच्यासह तीन शेतकऱ्यांची अडीच एकर जमीन रजिस्टर खरेदी खताद्वारे खरेदी केली. काही रोख रक्कम दिली. इतर रकमेचे दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. या प्रकरणी शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याचा दावा घोडेगाव न्यायालयात दाखल केला होता. याप्रकरणी घोडेगाव न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. चोखट यांनी खरेदी खताद्वारे जमीन घेणारे संजय वामनराव बाणखेले (रा. मंचर ता. आंबेगाव) यांना सहा महिन्याचा साधा कारावास शिक्षा व जमीन विक्रीची किंमत, व्याज व इतर खर्च मिळून तीन कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
चंद्रकांत निराभाऊ भोर, बाळु निराभाऊ भोर, रामदास निराराभाऊ भोर, सुमन सूर्यकांत काळे यांना आर्थिक अडचण आल्याने त्यांनी त्यांची भोरवाडी येथे असलेली अडीच एकर जमीन विक्रीसाठी काढली होती. संजय बाणखेले यांनी दोन कोटी नऊ लाख रुपयांना जमीन खरेदी करण्याचे ठरवले.त्यानुसार घोडेगाव येथे ता. २४ एप्रिल २०१५ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर खरेदीखत केले. त्यावेळी बाणखेले यांनी भोर कुटुंबियांना १५ लाख रुपये रोख व उर्वरित एक कोटी ९४ लाख रुपयांचे चार धनादेश अशोक नागरी सहकारी बँक पिंपरी पुणे बँकेचे दिले. धनादेश भोर कुटुंबियांनी ता. ७ डिसेंबर २०१६ रोजी बँकेत भरले. पण धनादेश वटले नाहीत.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोर कुटूंबियांनी अॅड.अर्चना गायकवाड यांच्या माध्यमातून बाणखेले यांना कायदेशीर नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी केली. नोटीस मिळूनही बाणखेले यांनी पैसे न दिल्याने सदर दावा घोडेगाव न्यायालयात दाखल करण्यात आला. न्यायाधीश चोखट यांनी सर्व साक्षी पुरावे तपासून निकाल दिला आहे.
“खरेदी विक्रीचे व्यवहार करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खातरजमा करूनच व्यवहार करावेत. फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी.”
- अॅड. अर्चना गायकवाड, महिला सल्लागार मानव विकास परिषद पुणे जिल्हा.