दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण; ‘जबाब दो’मधून विवेकाचा आवाज बुलंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अंनिसकडून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. विवेकाचा आवाज बुलंद होवो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ‘मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?’ असा सवाल सहभागींनी उपस्थित केला.

पुणे -  ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अंनिसकडून विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. विवेकाचा आवाज बुलंद होवो, अशी घोषणाबाजी करण्यात आली. ‘मारेकरी सापडले, सूत्रधार कधी?’ असा सवाल सहभागींनी उपस्थित केला.

कॅंडल मार्च काढून डॉ. दाभोलकर यांना अभिवादन करण्यात आले. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, निवृत्त पोलिस अधिकारी अशोक धिवरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहराध्यक्ष श्रीपाल ललवाणी, भानुदास दुसाने, उदय कदम, मिलिंद  जोशी आणि विवेक सांबारे उपस्थित होते.

‘‘डॉक्‍टरांच्या हत्येचे पडसाद संपलेले नाहीत, हत्येचा तपास झाला नाही असे नाही. खुनी हात पकडले गेले आहेत. मात्र, त्यांचा वापर करणारे अद्याप मोकाट आहेत. जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, तोपर्यंत तरुणांच्या मनात विष कालविण्याचे काम सुरूच राहील,’’ 

असे विचार मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले. देशमुख म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांचे विचार मारता येणार नाहीत. विवेकाचा आवाज आपण अधिक बुलंद करू, त्यांचे विचार पुढे पोचवू.’’ 
------------------------------------------------------------------------
पुस्तकांतून पोचविणार डॉ. दाभोलकरांचे विचार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचा वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद केला जाणार आहे; तसेच विविध  अभियानांतून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला गती दिली जाणार आहे, अशी माहिती हमीद दाभोलकर यांनी दिली. 

डॉ. दाभोलकर यांनी १२ पुस्तके लिहिली असून, त्यातील तीन पुस्तके इंग्रजीमध्ये भाषांतरित झाली आहेत. वर्षभरात त्यांच्या सर्वच पुस्तकांचे भाषांतर होणार आहे. डॉक्‍टरांचे विचार इतर भाषिक नागरिकांमध्ये पोचविणे हा या मागील उद्देश आहे. ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कने डॉक्‍टरांचा स्मृतिदिन राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन मानण्याचे ठरविले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच जेथे अविवेक दिसून येतो तेथे ‘अंनिस’ने काम सुरू केले आहे. जातपंचायत बुवाबाजीपासून नागरिकांना दूर करण्यासाठी ‘मानस मैत्री’ मोहीम चालवली जाते. ज्यामध्ये भावनिक आरोग्य जपणे व भावनिक प्रथमोपचार देणे याविषयी मदत करतो. जोडीदाराची निवड आणि लग्न यांच्या भोवताली खूप कर्मकांड व अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

वैज्ञानिक दृष्टिकोन पोचविणे हे आव्हान आहे. सोशल माध्यमांचा वापर करण्यात येईल. ‘फेक न्यूज’ या आधुनिक जगाची अंधश्रद्धा आहेत. या ‘फेक न्यूज’ कशा ओळखाव्या, याबाबत काम करण्यात येणार असल्याचे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
-----------------------------------------
‘हत्येमागील सूत्रधारांना अटक करा’
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येस आज (ता.२०) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड असल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे. मात्र हत्येमागील सूत्रधार अद्याप मोकाट असून त्यांना अटक करावी, अशी मागणी  डॉ. दाभोलकर यांचे कुटुंबीय करीत आहेत. 

हमीद दाभोलकर म्हणाले ‘‘सीबीआय आणि महाराष्ट्र पोलिसांनी तपास करून मास्टरमाइंडच्या मुसक्‍या आवळाव्यात. तोपर्यंत आम्ही सनदशीर मार्गाने आमचा लढा चालू ठेवू.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six years have passed since the assassination of Narendra Dabholkar