

‘एसकेबी सीड्स’ कंपनीचा
बियाणे विक्री परवाना रद्द
कृषी संचालकांचे आदेश; ५५ पैकी १० नमुने अप्रमाणित
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या नऊ जिल्ह्यांतील २९८ तक्रारी आणि ५५ पैकी १० नमुने अप्रमाणित आढळल्याने मध्य प्रदेशातील मे. एसकेबी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा बियाणे विक्री परवाना कृषी विभागाने रद्द केला आहे. कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर यांनी मंगळवारी (ता. १५) याबाबत आदेश दिले.
खरीप हंगाम २०२६मध्ये कंपनीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत सोयाबीन बियाण्याचा पुरवठा केला होता. कंपनीने साथी पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार ५ हजार ७१० क्विंटल सत्यतादर्शक बियाण्याचा पुरवठा करण्यात आला. या बियाण्याची पेरणी केल्यानंतर उगवण न झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर क्षेत्रीय पातळीवर गुणनियंत्रण निरीक्षकांनी कंपनीच्या विविध वाणांचे ५५ नमुने घेतले. त्यापैकी १० नमुने अप्रमाणित आढळले.
या प्रकरणी कंपनीला १७ ऑगस्ट रोजी सुनावणीची नोटीस देण्यात आली. कंपनीचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर १ सप्टेंबर रोजी प्रथम सुनावणी झाली. कंपनीने म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितल्यानंतर ११ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान कंपनीने परवान्यात समाविष्ट नसलेल्या वाणाचे नाव बियाण्याच्या लेबलवर छापल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बियाणे कायदा १९६६ मधील खंड ७ (अ), (ब), (क) तसेच बियाणे नियम १९६८ मधील नियम १० चा भंग झाल्याचे नमूद करण्यात आले. तसेच सत्यतादर्शक बियाण्याच्या उत्पादन व विक्रीसंदर्भातील आवश्यक माहिती, प्रक्रिया आणि नोंदी ठेवणे अपेक्षित असताना संबंधित वाणाबाबत ही प्रक्रिया राबविल्याचे आवश्यक पुरावे कंपनीला सादर करता आले नाहीत.
त्यामुळे बियाणे नियंत्रण आदेश १९८३ मधील नियम १८ चा थेट भंग झाल्याचे तसेच विक्री केलेल्या बियाण्याच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाल्याचे कृषी विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार बियाणे विक्री परवाना क्रमांक LCSD२०२४०८०१४८ रद्द करण्यात आला. या परवान्याची वैध मुदत ५ ऑगस्ट २०२४ ते ४ ऑगस्ट २०२९ अशी होती.
कोट ----
बियाणे उगवण आणि गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची कृषी विभागाकडून गांभीर्याने दखल घेतली जात आहे. संबधित कंपनीकडे बियाणे नसताना विक्री केल्याचे आढळल्याने परवाना रद्द केला आहे. इतरही कंपन्यांची तपासणी सुरू असून तपासणीत दोष आढळलेल्या कंपन्यांविरोधात नियमाप्रमाणे कार्यवाही केली जाईल.
- सुनील बोरकर, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.