esakal | सासू येताचि घरा आसू वाही डोळा

बोलून बातमी शोधा

Panchnama
सासू येताचि घरा आसू वाही डोळा
sakal_logo
By
प्रशांत पाटील

मा. पोलिस आयुक्त साहेब,

विषय - नाकाबंदीवरील पोलिसांच्या कारभारात सुधारणा करण्याबाबत.

मा. मेहेरबान साहेब, मी पुण्यातील बिबवेवाडी भागातील रहिवासी आहे. माझी सासू सुनंदाबाई (वय ६५, रंग - सरड्यासारखा, स्वभाव - खत्रूड, वागणं - तोऱ्यात ) या साताऱ्याला लेकीला भेटण्यासाठी (लेकीला म्हणजे माझ्या नणंदेला. तिचे वर्णन - वय ३५, बाकी सगळे गुण आईचेच) पंधरा दिवसांपूर्वी गेल्या होत्या. मी सुटकेचा केवढा मोठा निःश्‍वास सोडला. त्यातच आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांनी राज्यभर निर्बंध लागू केल्याची बातमी आली. त्यांनी जिल्ह्याबाहेर प्रवासाला बंदी घातल्याने दुधात साखर पडली. सासूबाईंपासून किमान महिनाभर तरी माझी सुटका होणार असल्याने देवासमोर मी पावशेर पेढे ठेवले. मुख्यमंत्री साहेबांना मी आभाराचे पत्रही धाडले. नणंदबाईंना ‘सासूबाईंशिवाय मला अजिबात करमत नाही, त्यांची काळजी घ्या’ असे तोंडदेखलेपणे का होईना म्हटले. सासूबाईंनाही पथ्यपाणी पाळण्यास सांगितले. (मनात मात्र ‘उगाच इथल्यासारखं खादाडासारखं खात सुटू नका.’ असे म्हटले.)

साहेब, आता आख्खा महिना आनंदात कसा घालवायचा, याचे नियोजन मी करू लागले. मला पाककलेची प्रचंड आवड आहे. यूट्यूबवर बघून मी अनेक रेसिपी शिकल्या आहेत. पण दरवेळी सासूबाईंनी नाक मुरडलंय. पण आता ते ‘नाक’ साताऱ्यात असल्याने मला कसली काळजी नव्हती. मनाला येईल तो पदार्थ मी शिकणार होते. नवऱ्याला एखादा पदार्थ आवडला नाही तरी तो मूग गिळून बसतो. मी घरात असताना तो फक्त खाण्यासाठीच तोंड उघडतो. त्यामुळे त्याच्यावर माझ्या रेसिपीचे प्रयोग करायला मला नेहमीच आवडतात. सासूबाई घरी नसल्याने ‘असंच का केलंस अन् तसंच का केलंस’ ही माझ्यामागील भूणभूण बंद झाली. ही भूणभूण कायमची बंद कर, अशी प्रार्थना मी अनेकदा देवाकडे केली. मात्र, देवाने माझे कधीच ऐकले नाही. सासूबाईंचा हेकेखोर स्वभाव, अडाणीपणा, टोचून बोलण्याची सवय, माणूसघाणेपणा व नाटकीपणावर मला माझ्या आईशी फोनवर तास-तासभर बोलायला वेळ मिळू लागला. खरं तर रोज तास-दीड तास बोलूनही सासूबाईंचा विषय संपता संपेना. महिनाभरातही तो संपेल, याची खात्री वाटेना. सासूबाई जाऊन चारच दिवस झाल्याने चंद्रकलेप्रमाणे आनंद वाढत चालला होता.

आज सकाळी बेल वाजल्याने मी दरवाजा उघडला. समोर सासूबाईंना बघताच मला चक्कर आल्यासारखे झाले. कपाळावर आठ्यांचे जाळे चढले. ‘सासूबाई, एवढ्या लवकर कशा आलात? सगळं ठीकठाक आहे ना?’ चेहऱ्यावरील नाराजी लपवत मी म्हटले. ‘अगं आधी घरात तरी येऊ दे. फौजदारासारखी दारातच काय उलटतपासणी घेतेस’ असे म्हणून त्या माझ्यावर डाफरल्या. मग त्यांचा अवजड देह सोफ्यावर विसावला. मी नाइलाजाने त्यांना ग्लासभर पाणी दिले. ‘‘अगं, लाकडाउन का फिकडाउन चालू झालंय. म्हटलं साताऱ्यावरून पुण्याला पोलिस सोडत्यात का नाय. पोलिस मध्येच अडवतात व तुरुंगात टाकत्यात, असं कोणकोण सांगत होतं. त्यामुळं लई घाबरून मी ओळखीच्या टेंपोने आले. नशीब माझं थोर! पोलिसानं एकदा बी अडवलं नाय.’ असं म्हणून त्यांनी हुश्‍श केलं.

मेहेरबान साहेब, नाकाबंदीवरील पोलिसांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली असती तर मी आणखी काही दिवस सुखात घालवले नसते का? कोणतंही अत्यावश्‍यक कारण नसताना सासूबाईंना साताऱ्यातून पुण्यात सोडलंच कसं? कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांवर कारवाई करावी. तसेच झालेली चूक सुधारून, पुण्यात आलेले हे पार्सल साताऱ्यात पुन्हा लेकीकडे सोपवून, एका सुनेचा दुवा घ्यावा, ही हात जोडून विनंती.

कळावे,

सुचित्रा कोळेकर, बिबवेवाडी