फराळ ‘पुराण’ | Panchnama | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
फराळ ‘पुराण’

फराळ ‘पुराण’

‘नमस्कार ताई ! दिवाळीच्या शुभेच्छा ! आम्ही नगरसेवक जगूभाऊंकडून आलोय. कसलीही अडचण, समस्या असेल तर बिनधास्त बोला. आम्ही तुमच्या मदतीला धावून येणार म्हणजे येणार.’’ एका कार्यकर्त्याने हात जोडून म्हटले.

‘अहो, दिवाळीच्या शुभेच्छा किती उशिरा देताय? आणि निवडून आल्यानंतरही किती उशिरा भेटायला येताय.?’’ प्रियाने टोमणा मारला.

‘अहो येणारच होतो पण आज जाऊ, उद्या जाऊ असं करता करता पाच वर्षे कशी गेली ते कळलंच नाही.’’ एका कार्यकर्त्याने खुलासा केला.

‘दोन-तीन महिन्यांवर निवडणूक आलेय. तेवढं आमच्या भाऊंकडे लक्ष राहू द्या.’’ दुसऱ्याने हात जोडले.

‘हो. हो. तुम्ही काळजीच करू नका. बरं तुम्ही काय घेणार?’’ प्रियानं आस्थेनं विचारलं. त्यावर दोघांनीही ‘काहीही नको’ म्हटले. पण प्रियाने दोन ताटात दिवाळीचा फराळ आणला. एखाद्या मतदाराच्या घरी आपलं एवढं प्रेमानं स्वागत होईल, ताट भरून फराळ दिला जाईल, अशी अजिबात अपेक्षा त्या कार्यकर्त्यांना नव्हती. प्रियाच्या पाहुणचारामुळे दोघेही भारावून गेले. त्यांनी उत्साहात फराळ खायला सुरवात केली.

‘चकली कशी झालेय? अजून घ्या ना. अहो माझ्या हातच्या चकल्यांना आख्ख्या सोसायटीत कोणाची सर नाही. यू ट्यूबवरून मी त्याची रेसिपी शिकलेय. यंदा थोड्या वातड झाल्यात पण चवीला एक नंबर आहेत.’’ असं म्हणून प्रियानं आणखी चकली वाढली.

‘आणि हे काय? तुम्ही करंज्यांना हातही लावला नाही. माझ्या आईने मला करंज्यांची रेसिपी शिकवलीय. यंदा मी मुद्दाम काळपट-लाल रंगाच्या करंज्या केल्यात. पण माझ्यावर जळणाऱ्या काही बायका करंज्याही जळल्या आहेत, असं मुद्दाम सांगतात.’’ असे म्हणून तिने आणखी करंज्या वाढल्या.

‘रव्याचे लाडू कसे झालेत?’’ प्रियाने उत्सुकतेने विचारले.

‘एकदम कऽऽडऽऽक.’’ एका कार्यकर्त्याने डोळे मिचकावत म्हटले. लाडू ‘कडक’ झालेत, हे त्याने दोन्ही अर्थाने म्हटले. असं म्हणून तो काहीतरी शोधत असल्याचे प्रियाला जाणवले.

‘वहिनी, रव्याचे लाडू फार कडक झालेत. हातोडा मिळेल? ’’ दुसऱ्याने निरागसपणे म्हटले.

‘तुमचं आपलं काहीतरीच!’’ असं म्हणून प्रियानं पुन्हा चिवडा आणि शंकरपाळ्या वाढल्या.

‘तुम्ही लाजू नका. अजून काही हवंय का?’’ असं विचारून, त्यांच्या उत्तराची अपेक्षा न ठेवता प्रियाने आणखी फराळ वाढला.

‘अहो, दरवर्षी मी एवढं खपून दिवाळीचा फराळ करते. पण आमचे ‘हे’ कशालाच तोंड लावत नाहीत. ‘शुगर वाढते’ असं काहीतरी कारण सांगून, फराळ खाणं टाळतात आणि मुलं तर ढुंकूनही पाहत नाहीत. मग फराळ फेकून देण्यापेक्षा दारी आलेल्या ‘कोणालाही’ आग्रहाने खाऊ घालते.’’ प्रियानं खुलासा केला. त्यावर त्या दोघांचाही घास घशात अडकला.

‘दारावर फिरते विक्रेते किंवा तुमच्यासारखे कार्यकर्ते आले तर त्यांना फराळाचं खायला घातल्याशिवाय मी सोडत नाही. हल्ली एवढी माणुसकी कोण दाखवतं? ‘दिवाळीनंतर दारी आलेल्या व्यक्तीला रिकाम्या पोटी परत पाठवायचं नाही’ हे बाबांनी माझ्यावर पहिल्यापासून संस्कार केले आहेत. तेदेखील आईने केलेला फराळ असाच दारी आलेल्या व्यक्तींना वाटून, पुण्य कमवत असत.’’ प्रियाने वडिलांच्या फोटोला नमस्कार करत म्हटले.

‘अजून मी दोन दिवस फराळ संपण्याची वाट पाहणार आहे. नाहीतर मंदिरासमोर जे बसतात ना, त्यांना नेऊन देणार आहे. तेवढंच पुण्य. तुम्ही लाजू नका. अजून लाडू घ्या ना.’’ प्रियाचा प्रेमळ आग्रह सुरूच होता. किचनमध्ये आणखी फराळ आणण्यासाठी प्रिया वळली, या संधीचा फायदा घेत दोघांनीही तेथून जोरात धूम ठोकली.

loading image
go to top