esakal | ‘लिटल’ तोंडी मोठा घास!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘लिटल’ तोंडी मोठा घास!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

‘अप्रतिम, अतिशय सुंदर, काय चाल आहे ! काय समतोलपणा आहे. हे बघितलंस माझ्या अंगावर तर अक्षरक्षः आठ काटे फुटलेत. मी जेव्हा तुझ्याएवढी असताना या स्पर्धेत भाग घेतला होता, त्यावेळी माझ्या मनाचा संयम, पाण्यासारखी नितळता, स्वच्छंदीपणा, वाऱ्याशी स्पर्धा करणारे माझे भुरभुरणारे केस आणि कणखरपणा आज मला तुझ्यात दिसला. ‘‘स्वातीने परीक्षकाच्या भूमिकेतून मीराच्या कृतीचे वर्णन केले. त्यानंतर सूत्रसंचालन करणाऱ्या अंजलीने जोरात किंचाळत, ‘‘मग स्वाती, ती आठवण तू जागी केलीच पाहिजेस, काय म्हणता प्रेक्षकहो!’’ असे म्हटले. मग स्वातीच्या हातात चमचा-लिंबू दिला. त्यानंतर तिने चमचा-लिंबूसह चालून दाखवले.

लंबोदर हाऊसिंग सोसायटीत लहान मुलांची चमचा-लिंबूची स्पर्धा आयोजित केली होती. दहा वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या तिघांची आज परीक्षक म्हणून नेमणूक केली होती. पहिल्या राउंडमध्ये पाच वर्षांची मीरा चमचा-लिंबू घेऊन दहा मीटर यशस्वीपणे चालली. त्यावेळी परीक्षक असणाऱ्या स्वातीने तिचे कौतुक केले. सूत्रसंचालक अंजली म्हणाली, ‘तुझ्याकडून आता इथं काय घडलं, तुला कळलं का? माईंड ब्लोईंग ! काय मस्त बॅलन्स केलास. दहा वर्षांनी तू याचे व्हिडिओ शुटिंग पाहशील त्यावेळी तुला याचा अभिमान वाटेल.’ त्यानंतर प्रिया ही सह‍ा वर्षांची मुलगीही यशस्वीपणे चालत गेली. त्यावर दुसरा परीक्षक प्रमोद म्हणाला, ‘आता तू चमच्यात लिंबू घेऊन चाललीस. त्यावेळी शेषनागाच्या फण्यावर (चमचा) पृथ्वी (लिंबू) तोलल्याचा भास आम्हाला होत होता.’’ अशाप्रकारे लहान स्पर्धकांच्या डोक्यावरुन जाणाऱ्या भाषेचा वापर करत पहिला राऊंड संपला. दुसऱ्या राउंडमध्ये दहा स्पर्धक उरले होते. त्यांचे अभिनंदन करून स्वाती म्हणाली, ‘तुम्ही इथपर्यंत आला आहात, ही गोष्ट जग जिंकल्यापेक्षा कमी नाही.

हेही वाचा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सक्षम करणार; यशोमती ठाकूर

खरं तर ऑलिपिंकमध्ये गोल्ड मेडल मिळाल्यासारखंच हे यश आहे.’ त्यावर मंजुषा म्हणाली, ‘‘खरं तर मला आमची स्पर्धा आठवली. या स्पर्धा नसून, आपल्या अलौकिक प्रतिभासाधनेला पैलू पाडून, त्यातून हिरे निर्माण करणाऱ्या खाणी आहेत. आमच्यासारखे हिरेही या स्पर्धेतूनच तयार झाले आहेत.’ मग स्पर्धेला सुरवात झाली. प्रमोद म्हणाला, ‘स्पर्धकांच्या चालीमध्ये ग्रेसपण दिसत नाही. त्यांनी हंसासारखं डौलदार चालून, अर्जुनाच्या बाणाप्रमाणे पोपटाच्या डोळ्याचे ध्येय ठेवले पाहिजे, हे करत असताना घारीसारखे मन स्थिर ठेवावं. मी स्पर्धक असताना एवढं सगळं केलं तरी परीक्षकांनी माझ्यावर अन्याय केला. सोसायटीच्या चेअरमनच्या मुलीला पहिला नंबर दिला. ‘त्यावर आक्षेप घेत स्वाती म्हणाली, ‘मी चेअरमनची मुलगी म्हणून पहिली आली नव्हते. गुणवत्तेवर आले होते. उलट प्रमोदने स्पर्धेत प्राण्यांची सभा भरवली होती. त्यामुळे त्याला पहिला नंबर मिळाला नाही.’ मग मंजुषानेही माईक हिसकावून घेतला.

‘आमच्यावेळची स्पर्धा फिक्स झाली होती. नाहीतर मीच पहिली आली असती. ही स्वाती अजूनही ‘लिंबू-टिंबू’च आहे आणि हा प्रमोद कोणाचा ना कोणाचा ‘चमचा’ म्हणून वावरतो. त्यामुळे दोघांना वाटते आम्ही फार ग्रेट.’ मंजुषाच्या बोलण्यावरून मोठा गोंधळ उडाला. जो तो माईक खेचू लागला. आरडा-ओरड वाढला. ‘लिंबू’, ‘चमचा’’ असे परीक्षक एकमेकांना चिडवू लागले. या गोंधळात चिमुरडे स्पर्धक चमचा-लिंबूबरोबरच जीवही मुठीत घेऊन बसले.

loading image