आखाड्यात जिंकला ‘आई’ नावाचा डाव!

‘आई, तुला दिलेला शब्द मी पाळणार म्हणजे पाळणारच. स्पर्धेतील शेवटची कुस्ती मारून मी महाराष्ट्र केसरी होणार.’’ शड्डू ठोकत व अंगाला लाल माती चोळत रणजितने निर्धार व्यक्त केला.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

‘आई, तुला दिलेला शब्द मी पाळणार म्हणजे पाळणारच. स्पर्धेतील शेवटची कुस्ती मारून मी महाराष्ट्र केसरी होणार.’’ शड्डू ठोकत व अंगाला लाल माती चोळत रणजितने निर्धार व्यक्त केला.

‘आई, तुला दिलेला शब्द मी पाळणार म्हणजे पाळणारच. स्पर्धेतील शेवटची कुस्ती मारून मी महाराष्ट्र केसरी होणार.’’ शड्डू ठोकत व अंगाला लाल माती चोळत रणजितने निर्धार व्यक्त केला.

कुस्तीशौकिनांनी मैदान पूर्ण भरून गेलं होतं. लाऊडस्पीकरवरून कॉमेंट्री सुरू होती. हलगी, ताशा आणि तुतारीने वातावरणात जीव ओतला होता. मात्र, रणजितच्या डोळ्यांसमोर दिवसरात्र शेतात राबणारी त्याची आई दिसत होती. रणजित अवघा पाच वर्षांचा असताना कुस्तीचे शौकीन असलेले त्याचे वडील वारले, मात्र, मरणापूर्वी ‘माझ्या मुलाला महाराष्ट्र केसरी बनव’ असं आपल्या बायकोकडून वचन घेत त्यांनी देह ठेवला आणि त्यानंतर रणजित आणि त्याच्या आईचा संघर्ष सुरू झाला. रोज चूल पेटेल की नाही, याची शाश्वती नसलेल्या घरात कधी पहिलवान घडतो का? चहात टाकायला जिथं दूध मिळत नाही, त्यांनी नको ती स्वप्ने पाहू नयेत, असे टोमणे अनेक ग्रामस्थांनी मारले, मात्र रणजितच्या आईने हार मानली नाही. आईने दागिने विकून आपल्यासाठी म्हैस आणल्याचे रणजितला आठवले. गोठ्यातच सकाळी व रात्री धारोष्ण दुधाने भरलेली चरवी ती आपल्याला द्यायची. मला दूध कमी पडू नये म्हणून आई आयुष्यभर दुधाविना असलेला कोरा चहा प्यायची, हे आठवून रणजितच्या काळजात कालवाकालव झाली. रणजितला खुराक मिळावा म्हणून आई दिवसभर दुसऱ्याच्या शेतात राबायची, मिळणाऱ्या मजुरीच्या पैशातून पोटाला चिमटा घेऊन खारीक-खोबरं, बदाम, मटण-चिकन आणायची. स्वतः मात्र तिने कधी या गोष्टीची चुकूनही चव घेतली नाही.

Panchnama
कोरोनामुळे राष्ट्रीय मतदार दिन यंदा ऑनलाइन

‘आई तू उपाशी-तपाशी राहून मला पहिलवान करण्यात काय अर्थ आहे? तुझ्यावर अन्याय करून मला नको ती पहिलवानकी.’’ असं म्हणून आपण रुसल्याचं त्याला आठवलं. त्यावेळी डोळ्यातील पाणी लपवत आईने समजूत काढली होती. काही दिवसांनी पुण्यातील तालमीत पाठवताना आईच्या जिवाची घालमेल झाली होती. तालमीत पहाटे पाचलाच उठून रणजित व्यायाम करू लागला. अहोरात्र कष्ट करून, त्याने शरीर पीळदार बनवले. मुलाची प्रगती पाहून ती सुखावून जायची. यंदाच्या महाराष्ट्र केसरीसाठी रणजितने भरपूर सराव केला होता. वस्तादानेही त्याच्यावर भरपूर कष्ट घेतले होते. सुदैवाने सुरवातीच्या काही कुस्त्या त्याने मारल्या आणि अंतिम लढतीसाठी तो उभा होता. मागील जीवनपट क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आईने आपल्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला असल्याचा भास रणजितला झाला आणि सगळा जीव एकवटून त्याने प्रतिस्पर्धी मल्लावर जोरदार मुसंडी मारली. ढाक डावाचा अवलंब करीत त्याने प्रतिस्पर्धी मल्लाला चारी मुंड्या चीत केले आणि काही क्षणातच रणजितच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले. तो आता ‘महाराष्ट्र केसरी'' झाला होता. आईने वडिलांना दिलेले वचन आपण पूर्ण केल्याचे पाहून, त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. कधी एकदा आईला चांदीची गदा दाखवतोय व तिच्या पायावर आपण लोटांगण घालतोय, असं रणजितला झालं होतं. तो आईला भेटण्यासाठी गावी आला, मात्र तिला दवाखान्यात अॅडमिट केल्याचं त्याला कळलं.

‘माझा मुलगा महाराष्ट्र केसरी झाल्याशिवाय मी तोंडात पाण्याचा थेंब घेणार नाही’’, असं म्हणून ती माऊली गेल्या चार दिवसांपासून देव्हाऱ्यासमोर बसून होती. आज तिला त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात नेलंय. पण तिथंही ती आपल्या हट्टावर ठाम आहे, शेजारच्या सरुआजीने माहिती पुरवताच रणजितच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली. मातृप्रेमाच्या या अनोख्या कहाणीनं सारं गाव रडत होतं. रणजितने चांदीच्या गदेसह दवाखान्यात धाव घेतली आणि तिथं एकमेकांच्या गळ्यात पडून ही मायलेकरं रडत होती. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ग्रामस्थांनी रणजितची फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली. त्यावेळी त्याने हट्टाने आपल्या आईला शेजारी बसवून घेतले. ‘या यशाचे सारं श्रेय तुझंच आहे’, असं म्हणत चांदीची गदा त्याने आईच्या हाती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com