स्टार्टअप केले सुरू कोंडीतही कमाई करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

वाहतूक कोंडी हा एखाद्याचा व्यवसाय होऊ शकतो, यावर कदाचित तुमचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, नितीन यातूनही बक्कळ पैसा कमावतोय. पुण्यात त्याने ‘टीजे’ (ट्रॅफिक जाम) या कंपनीच्या सहा शाखा सुरू केल्या आहेत.

स्टार्टअप केले सुरू कोंडीतही कमाई करू

वाहतूक कोंडी हा एखाद्याचा व्यवसाय होऊ शकतो, यावर कदाचित तुमचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, नितीन यातूनही बक्कळ पैसा कमावतोय. पुण्यात त्याने ‘टीजे’ (ट्रॅफिक जाम) या कंपनीच्या सहा शाखा सुरू केल्या आहेत. वाहतूक कोंडीच्या ठिकाणी असूनही, त्याच्या सगळ्या शाखा सुसाट सुटल्या आहेत. एखाद्या शाखेला भेट दे, असा आग्रह त्याने धरल्यावर आम्ही सोलापूर रस्त्यावरील ‘टीजे’च्या शाखेला भेट द्यायचं ठरवलं. त्यानुसार आम्ही गेलो असता, हडपसरजवळ वाहतूक कोंडीत अडकलो. आम्ही नितीनला कळवल्यावर ‘माझी दोन माणसे लगेच पाठवतो’ असा निरोप दिला. त्यानुसार दोन मिनिटांत दोघेजण चौकशी करत आले. त्यांनी सुरवातीला माझ्या अंगावर अत्तर फवारले व दुसऱ्याने लस्सीचा ग्लास दिला.

‘सर, तुम्ही शेजारील ‘टीजे’च्या ऑफिसमध्ये आराम करा. माझा सहकारी तुमची गाडी कोंडीतून बाहेर काढेल.’ एका कर्मचाऱ्याने म्हटले. दुसऱ्याने गाडी ताब्यातही घेतली. मी आॅफिसमध्ये गेल्यावर नितीन माझी वाटच पाहत होता.

‘अरे ही कसली सेवा?’ आम्ही शंका विचारली.

‘अरे हाच माझा व्यवसाय आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या व्यक्तींना आम्ही मदतीचा हात देतो. त्यांच्या अंगावर थंड पाण्याचा वा अत्तराचा फवारा मारून, त्याला ताक, लस्सी वा कोल्डिंक्स देतो. नाश्‍ता वा जेवणाचीही सोय करतो. दुपारी एक ते चार वामकुक्षीची सोयही करतो. तोपर्यंत आमचे कर्मचारी तुमची गाडी कोंडीतून बाहेर काढतात.’

ऑफिसच्या शेजारी गायींचा कळप चरत होता. त्याकडे आम्ही लक्ष वेधले.

‘नितीन, जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय सुरू केला काय?’ आम्ही विचारले.

‘सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडणे हल्ली फार अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही फक्त दहा रूपयांत लोकांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडून देतो. आम्ही फक्त गायींच्या कळपाला रस्त्यापलीकडे घेऊन जातो. गायींची ढाल करून, एकाचवेळी आठ- दहा जण सुरक्षित रस्ता ओलांडत असतात. आमच्या सहाही शाखांमधून दररोज एक ते दीड हजार लोकांना आम्ही अशाप्रकारे सुरक्षित रस्ता ओलांडून देतो.’ नितीनने म्हटले.

आमचे लक्ष ‘प्रेम वाहतूक विवाह केंद्र’ या पाटीकडे गेले.

‘लग्नाचीही कंत्राटे घेतोस काय?’ आम्ही विचारलं.

‘पुण्यामध्ये सर्वात जास्त प्रेम हे शाळा- महाविद्यालये, ऑफिसेस यामध्ये जुळतं, असा एक गैरसमज आहे. सर्वाधिक प्रेम हे वाहतूक कोंडीतच जुळून येतात, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष हाती आला आहे. अशा प्रेमाचं रूंपातर लग्नगाठीत व्हावं, यासाठी ‘प्रेम वाहतूक विवाह केंद्र’ काम करते. घरच्यांशी लग्नाची बोलणी करण्यापासून हनिमूनला पाठवण्यापर्यंत आमचं केंद्र काम करतं. आतापर्यंत आम्ही अशी सोळाशे लग्नं लावली आहेत.’

‘भांडा पण कायद्यानं’- कायदेशीर सल्ला केंद्र’ याबाबत नितीन म्हणाला, ‘वाहतूक कोंडीत अडकल्यावर अनेकांची चिडचिड होते. मग त्यातून शेजारच्या वाहनचालकांबरोबर भांडणं होतात. अशा लोकांसाठी आम्ही हे सेवाकेंद्र सुरू केलंय. महिन्याला चार- पाचशे केस मिळतात.’

‘झटपट सेवा केंद्र’ हा काय प्रकार आहे?’ आम्ही विचारले.

‘वाहतूक कोंडीत अडकलेल्यावर वेळ कसा घालवावा, हा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्यांच्या मनोरंजनासाठी एलईडी टीव्हीवर चित्रपट दाखवतो, काहींना गाणी ऐकावयाची असल्यास फर्माईश विचारत घेऊन, त्यांना हेडफोनद्वारे गाणी ऐकवतो. केस कापणे व दाढी करणे अशी कामेही झटपट सेवा केंद्राद्वारे केली जातात. काहींचा रोज एक तास कोंडीत जातो. त्यांच्यासाठी आम्ही ‘इंग्रजी फाडफाड बोला’चे क्लास घेतो. महिलांसाठी रेसिपीचे क्लास घेतो.

संगणक, शिवणकाम, नृत्यही आम्ही शिकवतो. अभिनयाची कार्यशाळाही आम्ही येथेच घेतो. काहींना भांडता येत नाही, त्यांना आम्ही ‘मुद्देसूद भांडायला’ शिकवतो.’ नितीनची यादी बरीच होती. आम्ही त्याचा निरोप घेतला. त्यावेळी त्याने दोनशे रुपयांचे बिल आमच्या हातात टेकवले.

‘मैत्रीमध्ये आम्ही व्यवहार आणत नाही,’ असे म्हणत त्याने बिल काऊंटरकडे बोट दाखवले.

Web Title: Sl Khutwad Writes 27th March 2022 Panchnama

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top