esakal | घटस्फोटाची चर्चा झाली अन् चेष्टा अंगलट आली!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

घटस्फोटाची चर्चा झाली अन् चेष्टा अंगलट आली!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

अमीर खान-किरण राव (Amir Khan Kiran Rao) यांच्या घटस्फोटाची (Divorse) बातमी पाहून मंगेशच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दर पंधरा वर्षांनी लग्न (Marriage) करणे, ही कल्पनाच त्याला रोमांचक वाटली. आपल्या आयुष्यातही असा क्षण आला तर किती बहार येईल, अशी कल्पनाही त्याने केली. त्यामुळे त्याने हेमाला बोलावून, टीव्हीवरील घटस्फोटाची बातमी दाखवली. ‘अमीर खान किती नशीबवान आहे ना ! त्याला पटकन घटस्फोट मिळालाही,’ असं तो पुटपुटला. ‘तुमच्या मनात काय आहे’? हेमाने थेट मुद्यालाच हात घातला. (SL Khutwad Writes 6th July 2021)

‘आपणही घटस्फोट घ्यायला हवा.’ मंगेशने म्हटले. ‘पण घटस्फोट घेतल्यानंतर तुम्ही काय करणार? अमीर खानकडे त्याचा प्लॅन तयार आहे. तुमचं काय? एक जवळची मैत्रीण म्हणून मला सांगा.’ हेमानं आपुलकीनं विचारल्यावर मंगेशच्या जीवात जीव आला. आता एवढ्या जिवलग मैत्रिणीपासून कशाला काय लपवायचे? शिवाय आपला आता घटस्फोटही होणार आहे, हे समजून मंगेशने सगळं खरं सांगायला सुरवात केली. त्यातच तीन-चार गर्लफ्रेंडचीही त्याने माहिती दिली. त्यातील एकीशी लग्न करायचा विचार आहे, असं त्याने सांगितलं. ‘तुझ्यासारख्या चांगल्या मैत्रिणीपासून कशाला काय लपवू’? हेही वाक्य तो अधून-मधून पेरायचा. ‘तुम्हाला खरंच घटस्फोट हवाय’? असा अंतिम प्रश्‍न तिने विचारल्यावर ‘हो’ असे त्याने उत्तर दिल्यावर ती बेडरूमध्ये गेली व तिथूनच तिने किंकाळी फोडली.

तिने आई-वडिलांना फोन लावला व फोनवरच ती रडू लागली. ‘अगं पोलिसांना फोन कर’ या त्यांच्या सल्ल्याने तिने पोलिसांना फोन केला. ‘मी केलाय पोलिसांना फोन,’ असं तिने सांगितल्यावर मात्र मंगेशची भीतीने गाळण उडाली. तिच्या भावाने मंगेशला फोन केला व ‘आम्ही पाच-सहा जण येत आहोत. कोठे जाऊ नका,’ असे म्हटले. त्यावेळी मात्र त्याचे हात-पाय थरथर कापायला लागले. त्यानंतर हेमाने बेडरूमचे दार धाडकन लावून घेतले. ते पाहून मंगेशची पाचावर धारण बसली. ‘अगं हेमा, सॉरी. खरंच मला घटस्फोट नकोय. मी तुझी चेष्टा केली. खरंच माझं बाहेर काही नाही. मला माफ कर. जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नकोस.’’ मात्र, हेमाने आतून कसलाही प्रतिसाद दिला नाही. ‘दया, यह दरवाजा तोड दो’ हे हिंदी सिरीयलमधील वाक्य त्याला आठवले. त्यानुसार तो दरवाजाला धडका मारू लागला. मात्र, हेमाचा आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थोडंसं ‘खुट्ट’ झालं, तरी पोलिस आले असावेत, अशी भीती त्याला वाटू लागली.

‘हेमा, मला माफ कर. मला घटस्फोट नकोय,’ हे त्याचे पालुपद मात्र चालूच होते. थोड्या वेळाने हेमाने दरवाजा उघडला. त्यावर तिच्या पायावर त्याने सपशेल लोटांगण घातले. त्यावेळी हेमाने फोन लावला, ‘अगं आई, सापडला बरं दागिन्यांचा डबा. अगं मीच कपाटातील पिशवीत ठेवला होता आणि विसरून गेले. त्यामुळे मी फार घाबरून गेले. अगं माझे मिस्टर फार धसमुसळे आहेत. त्यांना शोधा म्हटलं असतं ना, तर सगळं कपाट खाली करून, पसारा मांडला असता. त्यामुळे मी बेडरूमचे दार बंद करून, शोधत बसले होते. हो ! हो दागिने सापडले म्हणून पोलिसांनाही कळवते. तू दादाला निरोप दे, उगाचंच इकडे यायची घाई करू नकोस.’ असे म्हणून हेमाच्या हसण्याचा आवाज हॉलमध्ये पसरला आणि मंगेश तिच्याकडे वेड्यासारखा बघत बसला.

loading image