esakal | बायकोच्या नातेवाइकांसाठी मस्त, जबरदस्त ‘पॉलिसी’
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

बायकोच्या नातेवाइकांसाठी मस्त, जबरदस्त ‘पॉलिसी’

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

समीरच्या मावसभाऊ दीपक कुटुंबासह दारात पाहून गौरीच्या रागाचा पारा चढला. ‘‘लॉकडाउनमुळे गेले सहा महिने कोठे बाहेर पडता आले नाही. म्हटलं तिसरी लाट सुरु होण्याच्या आत तुम्हाला भेटून घ्यावं,’’ असा खुलासा करत ते चौघे आत आले. दीपकने लगेचच बाथरूम गाठली. तासाभराने फ्रेश होत तो बाहेर आला. ‘‘अरे आमच्याकडे पाणीच नीट येत नाही. बऱ्याच महिन्यांनी अशी मनोसक्त अंघोळ केली.’’ असे म्हणत जेवणासाठी त्याने मटणाची फर्माईश केली. ‘तुमच्याकडे मटण दुकानदारांचाही संप चालू असेल ना?’ गौरी मनात म्हटली. मग तिने समीरला जवळ बोलावले. ‘‘मी कंटाळलेय पाहुण्यांचा पाहुणचार करून. गेल्या महिनाभरात कोण ना कोण येतच आहे. रोज आपलं रांधा, वाढा आणि उष्टी काढा आणि त्यातच पाहुण्यांची फर्माईशही पुरी करा. आम्हीही लॉकडाउनमध्येच होतो ना. आम्हाला नाही का वाटत कोठे फिरायला जावं.’’ गौरीने संताप व्यक्त केला. ‘‘अगं पण बहुतेक पाहुणे तुझ्याकडचेच येत आहेत. माझ्याकडचे कधीतरी येत आहेत.’’ समीरने खुलासा केला. ‘‘माझ्याकडचे पाहुणे आल्यावर काही वाटत नाही हो.

पण तुमच्याकडचे आले ना की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. वाटतं अंगावर पांघरून घेऊन झोपावं.’’ गौरीने असं म्हटल्यावर समीरला राग आला पण आपण काही बोललो तर ही मावसभावाच्या देखत ‘अंग खूप दुखतेय’, असं सांगून बेडरूममध्ये झोपून जाईल. त्यामुळे तो शांत बसला. गेल्या महिनाभरात गौरीच्या माहेरची मंडळी अनेकदा घरी आली होती. गौरीने त्यांचे उत्साहाने स्वागत केले. त्यांना काय हवं नको तेही बघितले होते. फक्त एकदा गावावरून समीरचे आई-वडील आले होते व आज मावसभाऊ आला होता. दोन्हीवेळी तिच्या कपाळावर आठ्या चढल्या होत्या व भांड्यांची आदळआपटही वाढली होती. त्यामुळं समीरला काय करावं, ते सुचत नव्हतं. ‘‘माझा मामा काल आला होता. त्यावेळी आपण मटण केले होते. त्यामुळे मी आज करणार नाही. गवारीची व शेपूची भाजी करीन. जमत असेल तर बघा. नाहीतर हॉटेलमधून मागवा,’’ गौरीच्या या इशाऱ्यावर समीर गप्प बसला. घरातील रागरंग पाहून दीपकने जेवणानंतर काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी समीरने कागदपत्रांचं बाड आणलं.

‘‘गौरी, आपलं उत्पन्न फारच कमी झालंय. त्यामुळे मी साईडबिझनेस करायचं ठरवलंय. मी विमा प्रतिनिधी व शेअर विक्रेता व्हायचं ठरवलंय. त्यामुळं आपल्याला पुष्कळ पैसे मिळतील,’’ असे सांगून समीरने या व्यवसायावर लोकांनी बंगले, गाड्या कशा खरेदी केल्या, याची उदाहरणे दिली. हे ऐकून गौरीही खूष झाली. मग काय समीरने गौरीच्या नात्यातील सगळ्यांना ‘अमकी पॉलिसी उतरावा अन् तमक्या कंपनीचे शेअर घ्या’ असा धोशा लावला. व्हॉटसॲप, मेसेंजरवर तो सतत मेसेज टाकू लागला. दिवसातून दोन-तीन वेळा तो फोनवरही आग्रह करू लागला. ‘फक्त लाखभर रुपये गुंतवा आणि पाच-सहा महिन्यांत डबल कमवा’ असे आमिष दाखवू लागला. विम्याचे फायदे सांगू लागला. या जाहिरात तंत्रापासून गौरीला मात्र त्याने दूर ठेवले. ती मात्र अधून-मधून इमाने इतबारे आई-वडील-भाऊ-मामा-मावशी-काकांसह इतर नातेवाइकांना घरी येण्याचे प्रेमाने आमंत्रण द्यायची. ‘पुढच्या महिन्यांत बघू’ असे त्रोटक उत्तर समोरची व्यक्ती द्यायची. ‘माहेरची माणसं अशी का वागतात, हे गौरीला काही कळेना अन् समीरच्या चेहऱ्यावरील आनंद काही लपेना.

loading image