esakal | वहिनी...भावोजी अन् आमचे हे...
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

वहिनी...भावोजी अन् आमचे हे...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

लंचब्रेकनंतर मानसीचा पुन्हा फोन पाहून मनोजच्या कपाळावर आठ्या चढल्या. त्यानं नाईलाजाने तो उचलला.

‘अहो, काय करताय?’’ तिच्या या लाडिक प्रश्नावर तो चांगलाच तडकला.

‘अगं मी ऑफिसमध्ये काय झोपा काढायला येतो का? कामच करतोय ना?’’ त्यावर मानसी म्हणाली, ‘‘भरलेल्या वांग्याची भाजी कशी झाली होती हो? तुम्हाला आवडली ना? माझ्या मावशीने याची रेसिपी शिकवलीय. यूट्युबवर बघून पंधरा दिवसांपूर्वी मी केली होती. पण ती नीट जमली नव्हती. आता कशी झालीय सांगा ना?’’ मानसीने लाडिक हट्ट धरला.

‘तुला कितीवेळा सांगितलंय. फालतू कारणांसाठी मला फोन करत जात जाऊ नकोस. मी खूप बिझी आहे.’’ मनोजने रागावत म्हटले. ‘‘आपलं नवीन लग्न झालं होतं. त्यावेळी तुम्ही दर अर्ध्या तासाला फोन करायचे. मी डब्यात दिलेल्या शेपूची वा भेंडीच्या भाजीचीही किती तारीफ करायचे. तू म्हणजे साक्षात अन्नपूर्णा आहे, असे म्हणायचे आणि लग्नाला कुठं आठ-दहा वर्षे नाही झाली तर माझा फोनही तुम्हाला नकोसा झालाय.’’ मानसीने स्फुंदत उत्तर दिले.

‘अगं त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. इथूनपुढं काय महत्वाचा निरोप असेल तरच फोन कर,’’ असे म्हणून मनोजने फोन ठेवून दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मानसीने फोन करून, तेलाची पिशवी, एक किलो साखर, एक किलो कांदे व बटाटे आणायला सांगितले. मनोजने ते निमूटपणे आणून दिले. त्यानंतर ‘घरी येताना हे आणा अन् ते आणा’ यासाठीच मानसीचा फोन होऊ लागला. याला मनोज लवकरच कंटाळला.

‘तू मला काय घरगडी समजतेस काय? किराणा मालाच्या दुकानातून या गोष्टी तुला आणता येत नाहीत का?’’ घरी आल्यावर मनोज भडकला. ‘‘अहो, तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला वाटतं, की नवऱ्याबरोबर एक-दोन मिनिटं का होईना बोलावं. पण तुमची ‘बिझी’ची कॅसेट चालू होते. ‘निरोप काही असेल तरच फोन कर’ अशी तुम्ही अट घातल्याने तुमच्याशी बोलायला मिळावं म्हणून काही गोष्ट आणायला सांगते.’’ मानसीने खुलासा केल्यानंतर मनोज काही बोलला नाही. त्यानंतर तीन-चार दिवस मानसीने मनोजला फोन केला नाही. ऑफिसमध्ये आल्यानंतर मानसीच्या फोनची कटकट नसल्याने त्यालाही खूप बरं वाटलं. मात्र, पाचव्या दिवशी महत्त्वाचे काम असल्याने मानसी त्याला फोन करू लागली. ‘मिटिंगमध्ये आहे’, ‘बिझी आहे’ असं म्हणून मनोज तिचा फोन कट करू लागला. तासाभरानं प्राजक्तावहिनींचा फोन मनोजला आला. त्याने तो लगेच उचलला. ‘‘कसे आहात भावोजी?’’ या पहिल्याच प्रश्नाला मनोजची कळी खुलली.

‘मी मजेत आहे वहिनी. तुम्ही कशा आहात?’’ मनोजनं विचारलं. ‘‘तुम्ही कामात बिझी नाही ना? नाहीतर उगाचंच मी तुम्हाला डिस्टर्ब करायचे?’’ वहिनींनी विचारलं. ‘‘नाही हो वहिनी! माझ्याकडं भरपूर वेळ आहे. बिनधास्त कितीही वेळ बोला. तुमच्यासाठी वेळ नाही काढायचा तर कोणासाठी काढायचा. तुम्ही फक्त आज्ञा करा. तुमच्यासाठी कायपण !’’ मनोजने दिलखुलासपणे म्हटले.

‘भावोजी, माझं तुमच्याकडं काही काम नाही. पण तुमच्या बायकोला तुमच्याशी बोलायचंय. मी त्यांच्याकडे फोन देते,’’ असं म्हणून वहिनींनी मानसीकडे फोन दिला. ‘‘अहो घरी येताना बॅंडेज, आयोडिन, कापूस आणि आयोडिक्सची क्रीम आठवणीने आणा आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफिसला तीन-चार दिवस रजा टाकून घरी या.’’ मानसीचं बोलणं ऐकून मनोजची बोबडीच वळली.

‘अगं, तसं काही नाही. तुझा गैरसमज...’ एवढंच तो बळंबळं बोलू शकला.

loading image
go to top