esakal | गाडी नको पण चिरीमिरी आवर... SL Khutwad
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

गाडी नको पण चिरीमिरी आवर...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

महेशची दुचाकी चोरीला गेल्याने त्याची तक्रार नोंदवण्यासाठी तो पोलिस ठाण्यात गेला.

‘या ..या साहेब, कसं काय येणं केलंत? काय सेवा करू,’’ असे म्हणून सुहास्य वदनाने एका हवालदाराने त्याचे स्वागत केले. पोलिस ठाण्यात एवढी प्रेमळ वागणूक मिळाल्याने तो भांबावून गेला.

‘साहेब, सौजन्य सप्ताह चालू आहे का?’’ महेशने विचारले. त्यावर मोठ्याने हसत हवालदार म्हणाले, ‘‘असं काही नाही. तुम्ही चहा घेणार की कॉफी?

बरं कसं काय येणं केलंत? घरचं सगळं ठीक आहेत ना?’’ हवालदारसाहेबांनी एवढ्या आत्मीयतेने चौकशी केल्यावर महेशला गहिवरून आलं.

‘साहेब, मोटरसायकल चोरीला गेलीय.’’ महेशने तक्रार सांगितली.

‘साहेब, एवढ्याशा कारणासाठी येथे येण्याची गरज नव्हती. ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता.’’

‘महिनाभरापूर्वी मी ऑनलाइन तक्रार दिली पण पुढं काहीच झालं नाही.’’ महेशने खुलासा केला.

‘गाडीचा नंबर सांगा बघू.’’

महेशने नंबर सांगितल्यावर त्यांनी तो एका मशिनवर टाकला.

‘साहेब, तुमच्या गाडीवर आठ हजारांचा दंड आहे. तो भरल्याशिवाय तपास कसा सुरू होणार? तुम्ही रोख पैसे भरले तर तडजोड होऊन सहा हजार भरावे लागतील. ऑनलाइन भरणार असाल तर जीएसटी वगैरे धरून ९२०० रुपये भरावे लागतील.’’ हवालदारसाहेबांनी असं म्हटल्यावर महेशने सहा हजार रुपये त्यांच्या स्वाधीन केले.

‘दंड भरल्यानंतर तपासाला वेग येतोय का नाही बघा. दोन दिवसांत तुमची गाडी दारात असेल.’’ हवालदारसाहेबांचं बोलणं ऐकून महेशच्या जीवात जीव आला. मात्र, दोन दिवसांनी महेश परत आला.

‘काय साहेब ! कोठपर्यंत आलाय तपास? सापडली का नाही गाडी? ’’ हवालदारसाहेबांचं बोलणं ऐकून महेशला आश्‍चर्य वाटलं. खरं तर हा प्रश्‍न त्याने विचारायला हवा होता. महेशची गोंधळलेली अवस्था पाहून हवालदारसाहेब म्हणाले, ‘‘अहो, हे चोरटे पक्के बिलंदर असतात. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून अनेकदा फिर्यादीलाच मुद्देमाल देतात. पोलिसांना सापडले की आधी फटके आणि नंतर आयुष्यभर हप्ता चालू....’’ असं म्हणून त्यांनी जीभ चावली.

‘गाडी कोठून चोरीला गेली?’’ साहेबांनी विचारलं.

मग महेशने एरियाचे नाव सांगितले.

हवालदारसाहेबांनी फाइल काढली. ‘‘ तो एरिया म्हणजे...आपला पिंट्याभाई..’’ असं म्हणून त्यांनी फोन लावला. ‘‘पिंट्याभाई, तुझ्या एरियातून या...या नंबरची गाडी चोरीला गेलीय....’’ असं म्हणून दोघांच्या गप्पा रंगल्या. थोड्यावेळाने चुकचुकत ते म्हणाले, ‘‘साहेब, तुम्ही थोडा उशीर केला. पिंट्याभाईने दोनच दिवसांपूर्वी पिंपरीतील एकाला पंचवीस हजाराला गाडी विकलीय. पिंट्याभाईंचे पण नुकसान नको आणि तुमचेही नको. तुम्ही पिंपरीतील माणसाला दहा हजार देणार असाल तर गाडी उद्या तुमच्या दारात असेल.’’ महेशने दहा हजार त्यांच्या स्वाधीन केले. दोन दिवसांनी वाट पाहूनही गाडी न मिळाल्याने महेश पुन्हा आला. त्यावेळी हवालदारसाहेबांनी स्पेशल कॉफीची ऑडर दिली.

‘साहेब, पिंपरीतील माणसाने ती गाडी साताऱ्यात विकलीय. आता साताऱ्याला जाण्याचा खर्च पाच-सहा हजार तरी होईल. तेवढे दिले की उद्या तुमच्या दारात गाडी हजर...’’ महेशने पुन्हा पाच हजार दिले. दोन दिवसांनी तो पुन्हा आला. यावेळी साहेबांनी त्याला पंजाबी लस्सी पाजून गार केले. ‘‘साहेब, तुमची गाडी साताऱ्यात गॅरेजमध्ये दुरुस्तीला दिलीय. गॅरेजमालकाला पाच हजार दिले, की उद्या गाडी तुमच्या दारात उभी असेल.’’

‘साहेब, माझी गाडी सापडलीय. मी तक्रार मागे घेण्यासाठी आलोय.’’ महेशने खोटंच सांगितलं. त्यावर हवालदारसाहेब म्हणाले, ‘‘गाडी सापडली? पण तक्रार आमच्याकडे दाखल आहे. त्यामुळे गाडी नियमानुसार कोर्टात सादर करावी लागेल. त्यांच्या आदेशानुसार आम्ही ती तुम्हाला देऊ. या प्रोसिजरसाठी पाच हजार खर्च आहे. पैसे

भरले व प्रोसिजर पूर्ण झाली, की गाडी उद्या तुमच्या दारात असेल.’’ हवालदारसाहेबांचे बोलणं ऐकून महेशला घाम फुटला.

loading image
go to top