जनुभाऊंची ‘लस’, अन ज्येष्ठांची ‘नस’

Panchnama
Panchnama

‘हा काय प्रकार आहे? पुण्यासारख्या शहरात ज्येष्ठ नागरिकांना लस मिळू नये, अशी तुमची इच्छा आहे का? गेले तीन तास आम्ही रांगेत उभे आहोत. आमच्याकडे ढुंकून बघायला कोणाला वेळ नाही? 
या अपमानास्पद वागणुकीबद्दल मी आजच पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून निषेध नोंदवणार आहे.’’ जनुभाऊंनी संतप्तपणे सांगितले.
‘आयुष्यभर मी शिस्त आणि नियम पाळले आहेत. त्याचे उल्लंघन केले म्हणून आमच्या गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष कारंडे यांनाही मी अनेकदा धारेवर धरले आहे. मी समोरून आलो तर ते रस्ता बदलतात. एवढी माझी दहशत आहे. वाटल्यास त्यांना विचारा.’’ असे म्हणून जनुभाऊंनी एका डॉक्टरपुढे मोबाईल धरला. 
‘तुमच्या सोसायटीच्या अध्यक्षांशी बोलून मी काय करू?’’ त्या डॉक्टरने म्हटले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अध्यक्षांशी बोला. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही कोणाशी पंगा घेतलाय ते.’ जनुभाऊंचा राग अजून धुमसत होता. 
‘ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे करू नका. दर अर्ध्या तासाने त्यांना सॅनिटायझर पुरवा. कोणाकडे मास्क नसेल तर त्यांना द्या.’ या सूचना काय भिंतीच्या शोभा वाढवण्यासाठी लिहल्यात का? गेले तीन तास आम्ही रांगेत उभे आहोत. साधं कोणी पाणीही विचारलं नाही. तर सॅनिटायझर आणि मास्क कधी पुरवणार’’? जनुभाऊंनी पुन्हा तणतण केली. तेवढ्यात एका शिपायाने पाणी आणले. ‘‘नुसतं पाण्यावर भागवा. पाच तास झाले, आमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आम्हाला चक्कर आल्यानंतर नाश्‍ता देणार आहात का? ’’ जनुभाऊंनी म्हटले.

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब, असं उगंच म्हणत नाहीत.’ रांगेतील एका ज्येष्ठाने सुरात सूर मिसळले.
‘म्हणजे ? लशीसाठी आम्ही काय सहा महिने थांबायचे का’? जनुभाऊंनी चांगलेच रागावले. त्यांनी रांग सोडून डॉक्टरांकडे धाव घेतली.
‘अहो आम्हाला लशीसाठी किती महिने वाट पहावी लागेल, तसं स्पष्ट सांगा. म्हणजे डबा आणि अंथरूण-पांघरूणाची सोय करता येईल.’ जनुभाऊंनी डॉक्टरांना फैलावर घेतले. 
‘आजोबा, शांत व्हा. आपण लगेचच लस देऊ? तुमचे नाव सांगा.’ असे म्हटल्यावर जनुभाऊंनी संपूर्ण नाव पत्ता व जवळच्या खुणेसह एका दमात सांगितला. डॉक्टर व त्यांच्या सहायकांनी संगणकावर बराचवेळ शोधाशोध केली पण त्यांना नाव सापडले नाही. 

‘आजोबा, तुमचे नाव यादीत नाही. तुम्ही ‘कोविन ॲप’वर नोंदणी केली होती का?’’ डॉक्टरांनी विचारले.
‘कोविन ॲप’ हा काय प्रकार आहे? तिथे नोंदणी कशाला करायची? हे माझे आधारकार्ड पहा. जन्मदाखला पहा. वाटल्यास लाइटबिलही बघा. मी ज्येष्ठ नागरिक आहे, हे सिद्ध करण्यासाठी एवढे पुरावे पुरेसे नाहीत का?’ असे म्हणून जनुभाऊंनी कागदपत्रांचे भेंडोळे टेबलवर ठेवले.
‘आजोबा, कोविन ॲपवर जाऊन आधी नोंदणी करावी लागते. त्यानंतर तुम्हाला स्थळ आणि वेळ याची माहिती मिळते. त्यानुसार तुम्ही येणे अपेक्षित आहे.’

‘या वयात आम्ही तुमचे कसले ॲप ओपन करून फॉर्म भरायचे का? आमच्यासाठी एकदम सोपी आणि सुटसुटीत वाटेल, अशी सिस्टिम तुमच्याकडे नाही का? ज्येष्ठ नागरिकांना फक्त एनकेन प्रकारे त्रासच होईल, एवढेच तुमचे आणि सरकारचे उद्दिष्ट आहे का’’? असे म्हणून टेबलावरील कागदपत्रांचे भेंडोळे उचलून साश्रू नयनांनी जनूभाऊ चालू लागले. पण त्यांना थांबवत एक डॉक्टर म्हणाले, ‘‘थांबा आजोबा ! काळजी करू नका. मी तुमचा फॉर्म भरून देतो.’’

त्यावर सवयीप्रमाणे जनुभाऊ पुन्हा उसळले. ‘हे तुम्हाला आधी करता येत नव्हतं का? गेले तीन तास मी रांगेत उभा आहे. पण ज्येष्ठांना त्रास कसा होईल, याकडेच सगळ्यांचे लक्ष असते.’’ यावर डॉक्टरांसह सर्व स्टाफ जनुभाऊंकडे पहातच राहिला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com