अरे संसार संसार उमगा त्याचं सार

‘अगं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? का स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ, की मी लस घेण्यासाठी रांगेत उभा आहे.’
Panchnama
PanchnamaSakal

‘अहो कुठं आहात?’’ हा प्रश्‍न मुग्धाने दहाव्यांदा विचारल्यानंतर दिनेशची सटकली.

‘अगं, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? का स्टॅम्पपेपरवर लिहून देऊ, की मी लस घेण्यासाठी रांगेत उभा आहे.’ ‘मग तुमच्या मोबाईलमधून बाईच्या हसण्याचा आवाज कसा काय येतोय? मला तुम्ही आधी सेल्फी पाठवा.’ मुग्धाने असे म्हटल्यावर दिनेशचा राग अनावर झाला; पण तरीही त्याने सेल्फी काढून पाठवला. दोन-तीन मिनिटांनंतर लगेचच मुग्धाचा फोन आला.

‘अहो, तुमच्यामागे ती लाल टॉप व जीन्समधील तरुणी कोण आहे? खरं खरं सांगा.’ मुग्धाने संशयाने विचारले.

‘मला काय माहिती? मी काय तिचं नाव-गाव विचारून रांगेत उभा राहिलोय का? ’ दिनेशने म्हटले.

‘कालसुद्धा हीच तरुणी तुमच्यामागे उभी होती. मला माहिती आहे, ती तुमच्या ऑफिसमधील नेहा आहे. मी इकडे घरकाम करून मरमर मरतेय आणि तुम्ही लशीच्या नावाखाली चार-पाच तास रांगेत उभे राहून तिच्याशी गुलूगुलू बोलताय.’’ मुग्धाने आरोप केला.

‘वाट्टेल ते बोलू नकोस. कालची मुलगी वेगळी होती. कालचा सेल्फी नीट पाहा.’ दिनेश म्हणाला.

‘काही सांगू नका. कालही नेहाच होती. फक्त तिने काल पंजाबी ड्रेस घातला होता. मी लगेच ओळखलं. कडक निर्बंधामुळे तुमचे ऑफिस बंद आहे. त्यामुळे तुम्हाला भेटायला मिळत नाही. त्यामुळे लसीकरणाच्या रांगेचा फायदा तुम्ही घेताय.’ असे म्हणून मुग्धा फोनवर रडू लागली.

‘तरी म्हटलं एवढे झकपक कपडे घालून, बुटाला पॉलिश करून, सेंट वगैरे मारून रांगेत उभं राहायला कशाला जाताय? हे कारण आहे होय. मला लसीकरणासाठी सोबत नेताना तुम्ही टाळाटाळ का करताय? मी सोबत असताना तुम्हाला नेहाशी गुलूगुलू बोलायला कसं येईल.?’ मुग्धाने आरोप केला. ‘अगं किती संशय घेतेस. तरी बरं तू सोबत असताना मी कोणत्या महिलेकडे मान वर करून बघत नाही. त्याआधी दोन दिवस मी ऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत रांगेत होतो. त्याचेही सेल्फी तुला पाठवले होते. त्यावेळी तू काय बोलली नाहीस.’ दिनेशने आवाज चढवत विचारले. त्याचे हे बोलणे ऐकून रांगेतील अनेक जण त्याच्याकडे बघू लागले. दिनेशचा चेहरा रडवेला झाला. त्यामुळे ती तरुणी त्याच्या मदतीला धावली.

‘मी बोलू का तुमच्या मिसेसबरोबर. मी त्यांना समजावून सांगते.’ असे म्हणून तरूणीने फोन लावला. ‘अहो ताई ऐका ना. तुम्ही समजताय तसं काही नाही...तुमचा गैरसमज...’ ती तरुणी असे बोलल्यावर मुग्धाचा रागाचा पारा पुन्हा चढला. तिला मध्येच थांबवत मुग्धा म्हणाली,

‘मला फसवू नका. मी तुमच्या दोघांनाही चांगलेच ओळखते. आता तुमच्यात ‘काही’ नसतं तर तू मला वहिनी अशी हाक मारली असती. म्हणजे तू त्यांची बहिण झाली असतीस. पण तू मला ‘ताई’ म्हणतेस यातच सगळं आलं. हे सगळं ओळखायला मी काय मूर्ख आहे का’’? असे म्हणून तिने फोन बंद केला. थोड्या वेळात दिनेशचा फोन केला. त्यावर त्याला तिने चांगलंच झापलं. ‘‘तुम्ही घरी या. मग तुमच्याकडे चांगले बघते.’’ असा इशारा तिने दिला. मग मात्र दिनेश घाबरला. त्याने तेथूनच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना ई-मेल केला.

‘साहेब, आठ दिवसांपासून मी लशीसाठी रांगेत उभा आहे. तरीही मला लस मिळाली नाही. त्यामुळे माझी बायको माझ्यावर संशय घेत असून, माझा संसार मोडायला आला आहे. माझ्यासारखी अनेक पुरुषांची अवस्था झाली आहे. आमच्या आरोग्याचं एक वेळ जाऊ द्या. पण आमचा संसार टिकण्यासाठी तरी तुम्ही आम्हाला तातडीने लस द्यावी, ही विनंती.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com