esakal | सुख म्हणजे नक्की काय असते? ना ताप, ना खोकला अन् चव असते

बोलून बातमी शोधा

Panchnama

सुख म्हणजे नक्की काय असते? ना ताप, ना खोकला अन् चव असते

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

दर दहा मिनिटांनी सॅनिटायझरने हात धुणे, दर अर्ध्या तासाने घरी असूनही मास्क बदलणे, दर एक तासाने सॅनिटायझरने मोबाईल पुसून घेणे व दर दीड तासाने देशभरातील कोरोनाविषयक अपडेट घेण्यात विशालचा दिवस कसा निघून जायचा, हेच त्याला कळायचे नाही. एकदा तो जेवत असतानाच दहा मिनिटे झाली म्हणून तो ताटावरून उठला व त्याने सॅनिटायझरने हात धुतले. त्यानंतर परत जेवायला बसला. नियम म्हणजे नियम. दीप्तीने त्याला काही काम सांगितले, तर तो वैतागायचा. ‘अगं माझीच कामे मला कमी आहेत का? मग कशाला मला कामे सांगतेस?’ सोसायटीच्या गेटपर्यंत जरी तो गेला, तरी घरी आल्यानंतर अंघोळ करायचा. चुकून त्याने भाजीपाला आणला, तर तो तासभर धुवत बसायचा. आपल्याला कोरोना होऊ नये, याची तो पुरेपूर काळजी घ्यायचा. मात्र, कोरोनारूग्णांची वाढती आकडेवारी बघून, तो चिंताग्रस्त व्हायचा. ‘कोरोनाचे निदान लवकर झाल्यास उपचार तातडीने सुरू करता येतात. त्यामुळे जीवावरचा धोका टळू शकतो.’ हे त्याने अनेकदा वाचले होते. त्यामुळे निदान लवकर व्हावे, यासाठी तो रोज सकाळी उठल्यानंतर हिरवी मिरची खायचा. ती तिखट लागल्यास, जिभेला चव आहे, त्यामुळे कोरोना नाही, असे निदान तो करायचा. हिरवी मिरची म्हणजे त्याच्यादृष्टीने लिटमस पेपरच असायचा. ‘ताप नाही, खोकला नाही, सर्दी नाही, जिभेला चव आहे, अजून काय हवं माणसाला...सुख सुख म्हणजे याच्यापेक्षा काय वेगळं असतं.’ असं तो दीप्तीला रोज सकाळी मिरची खाल्यानंतर म्हणायचा.

एकदा दीप्तीला काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. त्यामुळे तिने स्वयंपाक करून ठेवला. ‘‘मला यायला थोडा उशीर होईल.’’ असा निरोप तिने दिला. दुपारी एकच्या सुमारास त्याने जेवण वाढून घेतले. भरलेल्या वांग्याची भाजी पाहून त्याचे मन प्रसन्न झाले. त्याने पहिला घास घेतला. मात्र, त्याला कसलीच चव लागली नाही. आपला काहीतरी गैरसमज झाला असेल, असे त्याला वाटले. त्यानंतर त्याने चार- पाच घास खाल्ले व चव काही लागेना. मग त्याने वरण- भात वाढून घेतला. पण तरीही चव येईना. मग मात्र त्याची घाबरगुंडी उडाली. त्याने लगेच फ्रिज उघडून मिरच्यांचे भांडे काढले. मात्र, त्यात एकही मिरची शिल्लक नव्हती. थोड्यावेळाने त्याने सॅनिटायझरने हात पुसले व परत जेवायला बसला. पण भरलेल्या वांग्यांची त्याला चव येईना. तीच गोष्ट वरण- भाताबाबतही पुन्हा घडली. मग मात्र आपल्याला कोरोना झालाय, याची त्याला खात्री पटली. भीतीने त्याची गाळण उडाली. तासभर डोक्याला तो हात लावून बसला.

‘देवा, मी एवढी काळजी घेऊनही, मला कसा कोरोना झाला?’ असं देवघरासमोर बसून तो देवाला प्रश्‍न विचारू लागला. तेवढ्यात दीप्ती घरी आली. तिच्या गळ्यात पडून तो रडू लागला.

‘अगं, मला कोरोना झालाय.’ असं म्हणू लागला. त्यावर दीप्तीने त्याला झिडकारले. ‘अहो, तुम्हाला कोरोना झालाय तर माझ्या गळ्यात काय पडताय? मला नाही का व्हायचा.’? असे म्हणून त्याला झापले. मग त्याने काय झालं, ते सविस्तर सांगितले.

‘अहो, घरातील मीठ संपलंय. त्यामुळे वांग्याची भाजी, वरण व भातामध्ये मीठ नाही. त्यामुळे तुम्हाला चव आली नाही. तुम्हाला मीठ आणायला सांगणार होते पण काम सांगितलं, की तुम्ही माझ्यावरच डाफरता. त्यामुळे सांगितले नाही. मी आता मावशीकडे गेले होते. येताना मिठाचा पुडा आणलाय.’ असे म्हणून दीप्ती मोठ्याने हसली. त्यावर विशालने कसनुसं हसत दीप्तीला कोपरापासून नमस्कार घातला.