esakal | आली समीप लग्न घटिका...
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

आली समीप लग्न घटिका...

sakal_logo
By
सु. ल. खुटवड -सकाळ वृत्तसेवा

‘सगळ्यांनी सोशल डिस्टन्स पाळायचं आहे. मास्क नसेल तर लगेचच हाकलून दिलं जाईल. नवरा- नवरीही याला अपवाद नसतील. तुमचा टाइम आता सुरू होत आहे,’ असे म्हणत हवालदार कोळेकर यांनी हिरवा झेंडा फडकावत हातातील स्टॉपवॉच सुरू केले. ‘बरोबर दोन तासांमध्ये लग्न उरकायचे आहे. एक मिनीटही उशीर चालणार नाही. नियम म्हणजे नियम.’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर वऱ्हाडी मंडळी लगबगीने मंगल कार्यालयात आली. (SL Khutwad Writes about Marriage)

कपड्यांची दुकाने महिनाभरापासून बंद असल्याने नवरा मुलगा प्रशांत टी शर्ट व बर्म्युडावरच आला होता. त्याला या अवतारात पाहिल्यानंतर नवरी मुलगी प्रियानेही आपणही गाऊन घालणार, असा हट्ट धरला. मात्र, दोघांची समजूत घालण्यात पंधरा मिनिटे गेली. प्रियाने आज पहाटे उठून मेकअपला सुरवात केली होती. तरीही शेवटचा हात फिरवायचा राहून गेला होता. तो तिला ४५ मिनिटांत पूर्ण करायचा होता.

मुलीचे मामा गाडेकर यांनी ‘कार्यक्रमपत्रिका’ वाचून दाखवली.

‘हळदीचा कार्यक्रम - ५ मिनिटे, साखरपुडा - पाच मिनिटे, रूसवा- फुगवा - २० मिनिटे, मुलीचा मेकअप - ४५ मिनिटे, नागीन व मोर डान्स - दहा मिनिटे, लग्न - दहा मिनिटे....’ मुलाचे काका वाघमारे यांनी या कार्यक्रमपत्रिकेवर लगेच आक्षेप नोंदवला. ते तावातावाने गाडेकर यांच्याशी भांडू लागले. ‘‘म्हणजे जेवणासाठी वेळ राखीव ठेवला नाही का? आम्ही काय घरी जाऊन जेवायचे का? अजून नाश्‍ता मिळाला नाही. कार्यक्रमपत्रिकेत त्याचा उल्लेखही नाही. लग्न ठरवायच्यावेळी फुशारकीने जेवणाचे एक हजार रुपयांचे ताट असेल, असे सांगत होता आणि येथे साधं चहाचं गरम पाणीही नाही.’ वाघमारे यांना मध्येच थांबवत गाडेकर म्हणाले, ‘अहो माझं वाचन तरी पूर्ण होऊ द्या. लग्न लागल्यानंतर जेवणासाठी पाच मिनिटे ठेवली आहेत. तेवढ्यात काय खायचं ते खा. दुष्काळातून आल्यासारखं वागू नका.’

हेही वाचा: सेट परीक्षा २६ सप्टेंबरला होणार

‘माझ्याशी आदराने बोला. मी मुलाचा सख्खा काका आहे. एकवेळ नवऱ्या मुलाचा अपमान झाला तरी चालेल पण माझा अपमान महागात पडेल.’ वाघमारे यांनी डोस दिला. मग दोन्ही बाजूंकडील मंडळींनी मध्यस्ती करून वाद मिटवला. हळदीचा कार्यक्रम वेळेत पार पडला. नवरा- नवरीच्या गालावर हळदीची दोन बोटे उमटवून हा कार्यक्रम झाल्याचे जाहीर करण्यात आले. नवरी मुलीकडील कलवऱ्या पाहून, हळदीच्या कार्यक्रमाला अर्धा तास द्या, असा हट्ट नवरदेव प्रशांतच्या मित्रांनी धरला. मात्र, तो फेटाळण्यात आला. साखरपुडाही वेळेत पार पडला. त्यानंतर मुलाच्या आत्याने ‘मला जुनीच साडी दिली आहे,’ असे म्हणून रुसून बसली तर तिच्या नवऱ्यानेही गोंधळ घातला. ‘मी नवऱ्या मुलाचा मामा आहे. मला मुलीचे मामा खुर्च्या उचलून ठेवायला कसं काय सांगतात? वाढपी नाहीत म्हणून मला जेवण वाढायला सांगाल. वराकडच्या लोकांना काही इज्जत आहे का नाही’? असे म्हणत त्यांनी आवाज चढवला. तेवढ्यात लग्न लावणारे काका आले. ‘नवरा- नवरीने शून्य मिनिटांत हजर राहायचे आहे. मला अजून पुढची दहा लग्न लावायची आहेत. दोघांपैकी एकालाही उशीर झाला तरी मी एकट्याचेच लग्न लावून मोकळा होईल.’ असा इशारा दिला. सुदैवाने दोघेही लगेच आले. त्यानंतर काकांनी अंतरपाट धरला. मात्र, हवालदार कोळेकर यांनी शिटी वाजवत हातातील स्टॉप वॉच दाखवत, ‘दोन तास झाले आहेत. त्यामुळे थांबा.’ असे खड्या आवाजात म्हटले. मग नाइलाजाने लग्न थांबवण्यात आले.

‘उर्वरित लग्न उद्या सकाळी दहा वाजता, याच ठिकाणी लावण्यात येईल. मात्र पोलिसांची परवानगी मिळणार नसल्याने नवरा- नवरीचे नाव तेवढे बदलले जाईल, ’ असे हळू आवाजात मुलीचे मामा कोळेकर यांनी जाहीर केले.