पेट्रोलचं शतक अन् ईडीची चौकशी

‘अहो, गॅस सिलिंडर संपलाय,’ हे स्वयंपाकघरातून आलेलं वाक्य ऐकून समीरने चपळाईने रिकामा सिलिंडर बाहेर काढला.
Petrol
PetrolSakal

‘अहो, गॅस सिलिंडर संपलाय,’ हे स्वयंपाकघरातून आलेलं वाक्य ऐकून समीरने चपळाईने रिकामा सिलिंडर बाहेर काढला.

‘मी लगेच सिलिंडर घेऊन येतो. तोपर्यंत तू व्हॉटसअॅप, फेसबुकवर वेळ काढ. अजून उशीर झाल्यास तुझ्या आईशी फोनवर तासभर गप्पा मारत बस.’’ असं म्हणून समीर घराबाहेर पडला. सुखी संसार करायचा असेल तर बायकोची प्रत्येक आज्ञा पाळणे, समाजमाध्यमावर ॲक्टिव्ह राहण्यासाठी तिला वेळ देणे, माहेरच्यांशी तास-दोन तास फोनवरून बोलण्यासाठी तिला प्रोत्साहन देणं, ‘तुला किती काम पडतं ना’, ‘आज खूप छान दिसतेस’, ‘तुझ्या हाताची चव कोणाऽऽकोणाऽऽऽला नाही’... ही वाक्ये दररोज प्रत्येकी पाचवेळी म्हणणं, हा समीरचा नियम होता. त्यामुळे

बायकोबरोबर त्याचं भांडण कधीच होत नव्हतं.

शेजारच्या कॉलनीतील गॅस एजन्सीतून त्याने सिलिंडर घेतला व रोख पैसे दिले. मात्र, हे करत असताना कोणीतरी आपल्यावर ‘वॉच’ ठेवतंय, याची जाणीव त्याला झाली. येताना त्याने गोडेतेलाचा पाच लिटरचा डबा घेऊन, ९७५ रुपये मोजले, हे करत असताना मघाचेच डोळे त्याला दिसले. भाजीपाल्याच्या दुकानातून त्याने एक किलो कांदे व एक किलो वाटाणा घेतला. दोनशे रुपये देऊन तो तातडीने घरी आला. तासाभराने जेवण करून, तो बाहेर पडला. पेट्रोलपंपावर त्याने दुचाकीत पाच लिटर पेट्रोल भरले व पाचशे पाच रुपये तेथील कर्मचाऱ्याच्या हातावर टेकवले. यावेळीही त्याच्या मागावर ते दोन डोळे होते. सकाळपासून आपला कोणीतरी पाठलाग करतंय, याची जाणीव झाल्याने समीर घाबरला. त्याने घरी येऊन प्रियाला सगळं सांगितला. तिनं त्याला धीर दिला. मग त्याने दरवाजा लावून, त्याला सोफा आडवा लावला. जरा कुठं खट्ट झालं तरी तो थरथर कापायला लागला. तासाभराने बेल वाजली. त्यानंतर तर तो आणखी घाबरला व बेडरूममधील वॉर्डरोबमध्ये जाऊन लपला. प्रियाने दरवाजा उघडला.

‘आम्ही ‘ईडी’कडून आलोय. तुमच्या नवऱ्यावर आम्ही दिवसभर पाळत ठेवून आहोत. एवढ्या महागाईतही तो सिलिंडर, गोडेतेल व भाजीपाला खरेदी करतोय. पेट्रोलच्या किमतीने शतक पार केले असूनही, एकदम पाच लिटर पेट्रोल कसे काय भरतो? एवढा पैसा आला कोठून? ब्लॅक मनी तर नाही ना? याची चौकशी करण्यासाठी आलोय. आम्हाला कागदपत्रे दाखवा.’’ एका अधिकाऱ्याने आयकार्ड दाखवत म्हटले. प्रियाने त्यांना आतमध्ये घेतले. समीरही हॉलमध्ये आला.

‘मी एवढे पैसे खर्च केले तर माझी चौकशी करायला आलाय. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळून गेले. त्यांना नाही पकडलं आणि मला मात्र.....’ समीरने बचाव केला.

‘ते सगळं फेसबुकवर टाकायचं. येथं मुकाट्याने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्यायची.’’ एका अधिकाऱ्याने दमात घेतलं. मग त्याने आर्थिक उत्पन्नाचे स्रोत सांगितले. मात्र, समीरच्या सांगण्यावर ते विश्‍वास ठेवायला तयार नव्हते. ‘‘तुमच्याकडे ब्लॅक मनी आहे. तुम्ही खोटं बोलताय.’’ एक अधिकारी जोरात बोलला.

‘बायकोशी रोज खोटं बोलून बोलून, जिवाचा पिट्टा पडतोय. त्यात तुमच्याशी कशाला खोटं बोलू.? खरंच साहेब, मी खरं बोलतोय. अगदी बायकोच्या गळ्याची शपथ...’

समीरने हे वाक्य पाच-सहा वेळा रिपीट केलं. ‘अहो, झोपेत कोणाशी बोलताय? माझ्याशी दररोज खोटं बोलताय? आणि माझ्या गळ्याची शपथ कोणाला घालताय?’ प्रियाने समीरच्या पाठीत गुद्दा घालत म्हटले.

‘बाप रे ! म्हणजे ईडीच्या धाडीचं स्वप्न होतं..’ असे म्हणत समीर डोळे चोळू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com