esakal | लोक लसीकरणात मग्न; आमचे जुळले रांगेतच लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage

लोक लसीकरणात मग्न; आमचे जुळले रांगेतच लग्न

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

आरोग्यमंत्री टोपेसाहेब.

विषय - लसीकरणासाठीच्या (Vaccination) रांगेत उभे राहून प्रेम जुळून, लग्न झाल्याने आभार मानण्याबाबत.

साहेब, एक मेपासून १८ ते ४४ वयोगटातील सगळ्यांना कोरोनावरील लस (Corona Vaccine) देण्याचा आपण जो क्रांतिकारक निर्णय घेतला आहे, त्यामुळे युवापिढी कोरोनामुक्त तर होईलच. शिवाय अनेकांची लग्ने (Marriage) ठरून, त्यांचे संसारही मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे. मीदेखील त्यापैकीच एक आहे. लसीकरणाच्या रांगेत उभे राहून, मला अद्याप लस मिळाली नाही. मात्र, तुमच्या या उपक्रमामुळे कित्येक वर्षे रखडलेले माझे लग्न जुळले. त्याबद्दल मी आपले व मुख्यमंत्री (Chief Minister) ठाकरेसाहेब यांचे आभार मानतो. मानतो म्हणजे काय मानलेच पाहिजेत. किंबहुना आभार मानले नाहीत तर तो मोठा कृतघ्नपणा ठरेल आणि तो कृतघ्नपणा मी करणार नाही. नक्कीच करणार नाही. (SL Khutwad Writes about Public Vaccination)

टोपेसाहेब, आपण १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केल्याने माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी अॅपवर नोंदणी केली व एक मे रोजी सकाळी सातलाच रांगेत उभे राहिलो. थोड्यावेळाने एक सुंदर मुलगी माझ्यामागे उभी राहिली. तासभर आम्ही निमूटपणे उभे होतो. मात्र, रांगेत उभे राहून राहून कंटाळा आला. मग आठच्या सुमारास आम्ही हवापाण्याच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. नऊला एकमेकांचे नाव-गाव विचारले. दहापर्यंत आमची पुरेशी ओळख झाली. तिचे नाव प्रिया होते. बारापर्यंत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडल्याची जाणीव झाली. दुपारी एकला लशींचा साठा संपल्याने लसीकरण थांबवत असल्याचे कर्मचाऱ्यांनी जाहीर केले व दुसऱ्या दिवशी परत यायला सांगितले. यावर रांगेतील सगळ्यांनीच संताप व्यक्त केला. मात्र, उद्या पुन्हा बोलावल्याचा आम्हा दोघांना आनंद झाला.

हेही वाचा: कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही

दुसऱ्या दिवशी सकाळी सातला मी कडक इस्रीचे कपडे, पॉलिश केलेले बूट व ब्रॅंडेड सेंट फवारून रांगेत उभा राहिलो. प्रियादेखील आज खूपच सजून आली होती. तिला पाहताच माझ्या ह्रदयाची तार झंकारली. मग आमच्या गप्पा रंगल्या. नऊ वाजता आम्ही लग्न कसे करायचे, यावर बोलू लागलो. लग्नासाठी दोनच तास असल्याने त्या वेळेत काय काय करायचं, हे दहा वाजता ठरवू लागलो. लग्नाला कोणा-कोणाला बोलवायचे याची यादी आम्ही एकपर्यंत काढली. तेवढ्यात कर्मचाऱ्याने लस संपल्याचे जाहीर केले. मग रांगेतील अनेकांनी वाद घातला. आम्ही मात्र हसतमुखाने एकमेकांना निरोप दिला. तिसऱ्या दिवशी आम्ही दोघेही वेळेच्या आधीच रांगेत उभे राहिलो. आज आम्ही हनिमूनला कोठे जायचे, यावर चर्चा केली. लग्नानंतर कोठे राहायचे, आर्थिक नियोजन कसे करायचे, हे ठरवण्यातच आमचा वेळ गेला.

हेही वाचा: सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

चौथ्या दिवशी आम्ही साडेसहाला आलो. आज आम्ही मुलांना काय शिकवायचे यावर चर्चा केली. मुलीला डॉक्टर व मुलाला इंजिनिअर करायचे हे ठरवले. खरं तर सहाव्या दिवशी आमचे लग्न होते. तरीही आम्ही रांगेत उभे राहिलो व दोन तासात लग्न उरकायचे असल्याने त्याचे नियोजन करत बसलो. लस संपल्यानंतर तसेच आम्ही विवाहस्थळ गाठले. साहेब, लसीकरणासाठी रांगेत उभे राहायला लागते, याची माहिती आमच्या घरच्यांना होती. त्यामुळे आमच्या दोघांवर कोणीही संशय घेतला नाही. त्यामुळेच सकाळी सात ते दुपारी एक-दोनपर्यंत आम्ही एकत्रित वेळ काढू शकलो. रांगेमुळेच आमचे प्रेम जमले व ते यशस्वीही ठरले. याबद्दल तुमचे व शासनाचे खूप खूप आभार. पण साहेब, अजूनही आम्हाला लस मिळाली नाही. आम्ही आई-बाबा होण्याच्या आत ती मिळावी, एवढी विनंती. नाहीतर आम्ही दोघे मुलांसह लस घेण्यासाठी रांगेत उभे आहोत, हे दृश्य दिसायला नको म्हणजे मिळवली.

कळावे, आपला विश्वासू, स्वप्नील

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा