चोरीचा मामला; अन् नवराही फसला 

Panchnama
Panchnama

पहाटे तीनच्या सुमारास जगनू ‘ड्युटी’वरून परत आला. झोपलेल्या बायकोला जागे करीत म्हणाला, ‘‘अगं आज आपल्याला लॉटरी लागली लॉटरी. माल बघशील तर आनंदाने नाचशील,’’ असे म्हणून जगनूने पिशवीतील माल काढायला सुरवात केली. राणीहार, नेकलेस व रोख रक्कम पाहून जगनूची बायको हरखून  गेली. ‘‘बया... बया खरंच किती कमाई झालीय.’’ असे म्हणून ती ‘‘वाटा...वाटा... वाटा...गं..., माझा किती वाटा गं,’’ असे म्हणून नाचू लागली. ‘‘सगळे दागिने तुला गं... अन् रोख रक्कम मला गं,’’ जगनूनेही सुरात म्हटल्यावर दोघेही हसू लागले. ‘‘बायको, हल्ली विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी मिळणं, चोरीच्या धंद्यात फार अवघड झालंय. अप्पलपोटेपणामुळे हा धंदा अडचणीत आला आहे. आपल्या सहकाऱ्याची नजर चुकवून चोरीचाच माल चोरायचा म्हणजे याला काय अर्थ आहे. चोर असलं म्हणून काय झालं, नैतिकता नको पाळायला.’’ ‘‘काय झालं एवढं नाराज व्हायला?’’ बायकोने असं म्हटल्यावर जगनूने स्टोरी सांगायला सुरवात केली. ‘‘अगं, आम्ही आज तिघं पार्टनर होतो. एका घरावर आम्ही डल्ला मारला.

चांगला तीस तोळ्यांचा माल हाती आला. रोकड बी मिळाली. पण वाटं करायला बसलो तर वीसच तोळे भरत होते. चप्पलहार आणि नेकलेस गायब. माझा तर त्या दोघांवर संशय आहे. नाही...नाही...खात्रीच आहे. असं एकमेकांना फसवलं तर धंद्याला बरकत कशी येणार? अशाने आपली पुढची पिढी या धंद्यात येईल का?’’ जगनूने नाराजी व्यक्त केली. ‘‘बायको, अजून एक सरप्राइज हाये बरं का!’’ असं म्हणून जगनूने पिशवीच्या चोरकप्प्यातून सोन्याची मूर्ती काढली. ते बघून तर जगनूच्या बायकोचे डोळेच चकाकले. ‘‘अगं कमीतकमी वीस तोळ्यांची मूर्ती असंल. घरफोडी करताना दोघे पार्टनर बेडरूममधील कपाटातून माल काढत होते. त्यावेळी मी देवघरात शोधाशोध करत होतो. ही मूर्ती पाहिली आणि पटकन पिशवीतील चोरकप्प्यात ठेवली. या कानाची त्या कानाला खबर नाय बघ.’’ आपल्याच हुशारीवर जगनू खूष झाला. नवऱ्याची हातचलाखी पाहून बायको खूष झाली. फ्रीजमधून खंबा काढून देत म्हणाली. ‘‘आता लई मोठी कामगिरी केलीया. तेव्हा माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. निवांत तुमचा कार्यक्रम चालू द्या.’’ यावर जगनू अजून आनंदीत झाला. बायकोला अजून खूष करावं म्हणून तो म्हणाला, ‘‘बायको, तुझ्यासाठी अजून एक स्पेशल गिफ्ट आहे.’’ असे म्हणून जगनूने पिशवीतून तीन साड्या काढल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कामगिरीवरून परत येताना रस्त्यात साड्यांचे दुकान दिसले. थोडा वेळ बी हातात होता. तू बी बरेच दिवस ‘चांगल्या साड्या नाय, साड्या नाय’ असं म्हणत होतीस. म्हणून म्हटलं, करा येथं हात साफ. बायको खूष तर आपण खूष, असे म्हणून जगनूने बायकोच्या हातावर साड्या ठेवल्या. मात्र, त्या साड्या पाहून त्याच्या बायकोने रुद्रावतार धारण केला. ‘‘तुम्हाला काय अक्कलेचा भाग आहे का? किती भंगार साड्या आणल्यात. या साडीचा पोत किती खराब आहे. ही बैंगणी कलरची असली साडी दोन दिवसांपूर्वी आपल्या शेजारणींनी घेतलीय. माझी कॉपी करते, असा आरोप ती माझ्यावर करील ना!  अन् या तिसऱ्या साडीचे काठ किती बटबटीत आहेत. मला नको असल्या साड्या. तुम्ही आताच्या आता या साड्या बदलून आणा. निघा लगेच!’’ असे म्हणून जगनूच्या हातातून खंबा हिसकावून घेत, त्याच्या बायकोने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com