
कलिंगड, टरबूजपासून बनवला आमरस...
‘आंबे कसे आहेत?’ रत्नाकरने मार्केटयार्डमधील एका विक्रेत्यास विचारले. ‘आता बरे आहेत.’ विक्रेत्याने म्हटले.
‘अहो, मी काय आंब्यांच्या तब्येतीची चौकशी करत नाही. आंबे कोणत्या भावाने दिलेत, असं विचारतोय.?’ रत्नाकरने चिडून म्हटले. ‘थोरल्या भावाने दिलेत. सध्या तो बाहेर गेलाय. येईलच आता.’ विक्रेत्याने म्हटले.
‘थोरला की धाकट्याशी मला देणंघेणं नाही. तुम्ही आंबे कसे देताय, ते सांगाल का?’ रत्नाकरने संयम ठेवत म्हटले. ‘पेटीतून किंवा बॉक्समधून देतो.’ विक्रेत्याने शांतपणे उत्तर दिले. तेवढ्यात विक्रेत्याचा थोरला भाऊ आला. रत्नाकरने त्याच्याकडे मोर्चा वळवला.
‘काय हो आंबे गोड आणि रसाळ आहेत ना?’
‘आम्ही तिखट किंवा आंबट आंबे विकत नाही. मात्र, आंबट चेहरे असलेल्या ग्राहकांशी आमची जीभ तिखट बोलते.’ विक्रेत्याने म्हटले.
‘रत्नागिरीचाच हापूस आंबा आहे ना?’ रत्नाकरने विचारले. ‘तुम्ही काळजीच करू नका. आंब्याखालील पेपरची रद्दी पहा. रत्नागिरीतील स्थानिक पेपरची आहे.’ विक्रेत्याने म्हटले. ‘रद्दीचं काय सांगू नका. आंबे कर्नाटकवरून मागवता आणि रद्दी रत्नागिरीवरून मागवता. आम्ही तुमचे सगळे डाव ओळखून आहे.’ रत्नाकरने म्हटले.
‘नाही आम्ही उलटं करतो. आंबे रत्नागिरीवरून मागवतो आणि रद्दी कर्नाटकवरून मागवतो. तुम्हाला रद्दीवरुरून आंबे घ्यायचेत की चांगल्या दर्जाचे आंबे घ्यायचेत, हे एकदा ठरवा.’ विक्रेत्याने इशारा दिला. ‘अहो, मला आमरसासाठी आंबे हवेत.’ रत्नाकरने म्हटले. ‘हे आंबे तुम्ही घेऊन जा. यामध्ये बाठा व रस नाही निघाला तर सगळे पैसे परत करणार.’ विक्रेत्यानं असं म्हटल्यावर बरीच घासाघीस होऊन व्यवहार ठरला. ‘तुमच्या आंब्याच्या पेटीखाली रत्नागिरीतील स्थानिक पेपर, कन्नड, तमीळ, पंजाबी की मल्याळी पेपरची रद्दी टाकू. आमचा मूळ व्यवसाय रद्दीचाच आहे.’ विक्रेत्याने म्हटले. मात्र, संपूर्ण पेटी रत्नाकरच्या पिशवीत बसेना. त्यामुळे विक्रेत्याने पिशवीच्या तळाशी रद्दी टाकली व वर आंबे सुटे ठेवले.
थोडं पुढं गेल्यावर त्याला कलिंगड व टरबूज दिसले. त्याने दोन्ही फळे घेऊन आंब्यावरच ठेवली. आता पिशवी बरीच जड झाली होती. त्यामुळे रस्त्यात टेकवत टेकवत तो वाहनतळावर आला. हॅंडलला पिशवी अडकवून तो गाडी चालवू लागला. तेवढ्यात एका चालकाने त्याला हूल दिल्याने त्याची गाडी घसरून पडली. पिशवीच्यावर कलिंगड व टरबूज असल्याने आंबे बाहेर पडले नाहीत. आपल्या या युक्तीवर तो कमालीचा खुश झाला. थोडं पुढं आल्यावर किराणा मालाच्या दुकानातून निलिमाने काही गोष्टी त्याला आणयला सांगितल्या. त्यावेळी पिशवीची चोरी होऊ नये म्हणून त्याने ती सोबत घेतली. ती जड वाटू लागल्याने ती दुकानात त्याने दाणकन आदळली. किराणा सामान घेऊन घरी आल्यावर निलिमाकडे त्याने पिशवी सुपूर्त केली.
‘अगं मी आंबे, कलिंगड व टरबूज असे काही पिशवीत ठेवले होते की गाडी पडली पण एकही आंबा पिशवीच्या बाहेर आला नाही. अक्कलहुशारी आणि समयसूचकतेनं वागणं येरागबगाळ्याचं काम नाही.’ रत्नाकरने फुशारकी मारत म्हटले. तेवढ्यात निलिमाने पिशवीतून आंबे बाहेर काढले. आंब्याचा झालेला चिखल पाहून तिने घर डोक्यावर घेतले. ‘तुमची अक्कलहुशारी आणि समयसूचकता किती कामाची आहे हे पुन्हा एकदा कळलं. आपल्याला एखादी गोष्ट आणायला जमत नसेल तर आणू नका पण असा फुकटचा शहाणपणा तरी खाऊ नका.’ सध्या रत्नाकर गेल्या दोन दिवसांपासून ‘तहानभूक हरपून’ रत्नागिरीच्या रद्दी पेपरमधील शब्दकोडी सोडवतोय.
Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 13th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..