
चोराच्या घरी चोरी भुरटा निघाला भारी!
‘काय जमाना आलाय. लोकांकडं नैतिकता अजिबात शिल्लक राहिली नाही. घरासमोर वाळत घातलेले दोन टॉवल चोरीला गेले. कोणावर विश्वास ठेवायची सोय राहिली नाही.’ मनिषाने मनातील सल बोलावून दाखवली.
‘टॉवेल? कधी घेतले होते?’ मनोजने विचारले. ‘अहो, मागच्या आठवड्यात आपण पाचगणीला फिरायला गेलो होतो. त्या हॉटेलमधील टॉवेल मी मुद्दाम आठवणीने आणले होते. काय मऊ लुसलुसीत टॉवेल होते. पण चोरांना काय त्याचं? आता परत असे टॉवेल मिळण्यासाठी कोठंतरी ट्रीप काढा लवकर. शक्यतो कुलू मनालीचं बघा. तेथील हॉटेलमध्ये याच्यापेक्षा भारी टॉवेल आणि चादरी असतात. साबण तर खूप महागडे असतात म्हणे. शेजारच्या सवितावहिनी सांगत होत्या.’ मनिषाचं बोलणं ऐकून मनोज म्हणाला, ‘तुझं म्हणणं अगदी खरं आहे. खरंच लोकांनी लाजा सोडल्यात. दोन दिवसांपासून माझं गाडी पुसायचं फडकंही गायब आहे. लोकं किती चिंधीचोर आहेत, हे यावरुन लक्षात येतं. आज सकाळी त्या फडक्यानं शेजारचे सदूभाऊ गाडी पुसत होते. ते फडकं त्यांचंच असल्यानं मी काही बोललो नाही पण फडकं घेताना किमान विचारायला तरी हवं. मी त्यांना प्रामाणिकपणं परत केलं असतं. आता दिनेशच्या गाडीचं फडकं मी घेतलंय. बघू किती दिवस वापरायला मिळतंय ते.’ मनोजनं म्हटलं.
तेवढ्यात शाळेतून राजू आला. ‘आई, विराजचा मला सापडलेला चेंडू सकाळी चोरीला गेला. त्यामुळं मी मधल्या सुटीत सगळ्या मुलांची दप्तरे तपासली. मला चार चेंडू सापडले पण नक्की यातला माझा कोठला आहे, तेच कळेनासं झालंय म्हणून मी सगळेच चेंडू घेऊन आलोय.’ त्यावर मनोज त्याच्यावर रागावला. ‘अरे असं कधी वागायचं नाही. शाळेतला प्रश्न शाळेतच सोडवायचा. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर आतापर्यंत तू पंचवीस-तीस चमचे घेऊन आलायस. त्या चमच्यांचं करायचं काय? हा प्रश्न सुटलेला नसतानाच एवढ्या चेंडूचं करायचं काय? हा नवीन प्रश्न तू जन्माला घातला आहेस.’
‘ओ, त्याच्यावर विनाकारण ओरडू नका. तुम्ही काय वेगळं करता? बॅंकेत जाता आणि स्लीप भरायच्या नावाखाली कोणाकडं तरी पेन मागता आणि खुशाल खिशाला अडकवून घरी आणता. असे पन्नास-साठ पेन तुमच्याकडे पडून आहेत. त्याचा कधी उपयोग केलाय? नवीन चप्पल पाहिजे, म्हणून दर आठवड्याला मंदिरात जाता आणि आवडती चप्पल घेऊन येता. असे तीस जोड पडून आहेत, त्यावेळी हा प्रश्न तुम्हाला पडत नाही?’ मनिषानं झापल्यावर मनोज शांत बसला.
त्यानंतर काही दिवसांनी मनोजची नवी कोरी दुचाकी चोरीला गेली. हे पाहून त्याला मोठा धक्का बसला. अजून नंबरप्लेटही त्याने लावली नव्हती. आपण भुरट्या चोऱ्यांमध्ये समाधान मानत बसलो आणि आपली एक लाखांची गाडी चोरीला जाते, हा काव्यागत न्याय मिळाल्याने तो निराश झाला. देवाला शरण जात तो म्हणाला, ‘आजपासून मी आणि माझे कुटुंबीय भुरट्या चोऱ्या करणार नाही. फक्त मला माझी नवी कोरी गाडी सापडू दे.’ त्यानंतर दोनच दिवसांनी मनोजला त्याची गाडी घरापासून दोन किलोमीटरवर रस्त्याच्या बाजूला सुस्थितीत आढळली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. गाडीची त्याने तपासणी केली, त्यावेळी त्याला दोन लिटर पेट्रोल, एक लिंबू-मिरचीचा हार आणि गाडी पुसायचं फडकं चोरीला गेल्याचं आढळलं. त्यावर डोक्यावर हात मारून घेत मनोज म्हणाला, ‘जगात माझ्यापेक्षाही भारी भुरटे चोर आहेत तर...’
Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 14th May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..