घराची वीज तोडली अन् मित्रांची ट्यूबलाईट पेटली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
घराची वीज तोडली अन् मित्रांची ट्यूबलाईट पेटली!

घराची वीज तोडली अन् मित्रांची ट्यूबलाईट पेटली!

‘राज्यात काय मोगलाई लागून गेली काय? तुम्ही अशाप्रकारे एखाद्या घराची वीज तोडू शकत नाही. मी तुम्हाला कोर्टात खेचीन.’ सुधीरभाऊंनी वीज तोडायला आलेल्या कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.

‘हे बघा, गेल्या चार महिन्यांपासून सहा हजार रुपयांची विजेची थकबाकी आहे. ती न भरल्याने आम्हाला वीज तोडण्याचे आदेश आहेत.’ एका कर्मचाऱ्याने म्हटले. ‘अरे व्वा! फक्त सहा हजार थकले म्हणून आम्हाला अंधारात ठेवता काय मग? मोठमोठ्या कंपन्या, उद्योगपती, नेतेमंडळी यांच्याकडे लाखो, कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, आमच्यासारख्यांकडे किरकोळ थकबाकी राहिली की आले वीज तोडायला. तुमच्या या दुटप्पी धोरणाचा मी निषेध करतो.’ एक हात उंचावत सुधीरभाऊंनी म्हटले.

‘आम्ही हुकूमाचे ताबेदार आहोत.’ दुसरा कर्मचारी म्हणाला. ‘आधी वीज तोडण्याचं ‘लाइकट’ दाखवा.’ सुधीरभाऊ इरेला पेटले होते. ‘‘लाइकट म्हणजे?’ सगळ्या कर्मचाऱ्यांनी आश्चर्याने विचारले. ‘लाइकट म्हणजे काय? हे साधं माहिती नाही आणि आलेत वीज तोडायला. एखाद्या संशयित आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडं ‘वॉरंट’ लागतं. अगदी तसंच एखाद्याची वीज तोडायची असेल तर महावितरणकडं ‘लाइकट’ लागतं. म्हणजे ‘लाईट कटिंग’ करण्याची लेखी परवानगी लागते. विद्युत नियामक आयोगाचा ‘एलके ४२६/२०२२’ चा सुधारित आदेश पहा.’ सुधीरभाऊंच्या या मुद्याला मित्रांनी साथ दिली. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने कागद पुढे केला. त्यावर सुधीरभाऊ संतापले. ‘हे काय? वीज ग्राहकाचे नाव, बिलाचा आकडा, ग्राहक नंबर, मीटरनंबर व पत्ता आहे. ही माहिती मलाही मिळू शकते. याच्या आधारावर मी कोणाचीही वीज तोडू शकतो का?’ सुधीरभाऊंनी धारेवर धरले. ‘तुम्हाला जे काय सांगायचंय ते आमच्या साहेबांना सांगा. आम्ही वीज तोडणारच.’ एका कर्मचाऱ्याने म्हटले. ‘अच्छा! तुम्हाला माझ्याकडून पाचशे-हजार रुपये चहा-पाण्यासाठी हवेत तर! मी अजिबात लाच देणार नाही. मी फार तत्वनिष्ठ माणूस आहे. आयुष्यात मी कधीही लाच दिली नाही आणि कधीही घेतली नाही.’ सुधीरभाऊंनी ठामपणे सांगितले. त्यानंतर तासभर सुधीरभाऊ व कर्मचाऱ्यांमध्ये खडाजंगी उडाली. त्यानंतर एक कर्मचारी इतरांना म्हणाला, ‘मी साहेबांकडून लेखी परवानगी आणतो आणि यांची चांगलीच जिरवतो. आता यांनी बिल भरलं तरी महिनाभर यांची वीजच जोडायची नाही. बसू दे अंधारात. आमच्याशी पंगा घेता काय?’ असं म्हणून तो कर्मचारी निघून गेला.

‘तुम्ही आमच्याशी फार चुकीचं वागलाय. तुमची वीज तोडल्यानंतर ती जोडण्यासाठी रोज खेटे मारायला लावतो का नाही बघा. शिवाय भरमसाठ दंड भरायला लागेल तो वेगळाच.’ दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने धमकी दिली. अर्ध्या तासात तो मघाचा कर्मचारी लेखी पत्र घेऊन आला. ‘आता तुमची काय हरकत आहे का?’ असं त्यानं विचारलं. सुधीरभाऊंनी पत्र वाचल्यानंतर ‘आता कसं सगळं कायदेशीर झालं. आता तुम्ही वीज तोडू शकता.’ असे म्हणत ते मित्रांसोबत बाहेर जाऊ लागले. त्यानंतर ‘हिप हिप हुर्रे...’ असं म्हणत कर्मचाऱ्यांनी वीज तोडली.

सोसायटीच्याबाहेर आल्यानंतर सुधीरभाऊंनी मित्रांना टाळी देत म्हटले, ‘‘निवृत्तीनंतरचं माझं आयुष्य असं मजेत चाललंय. वीज कोणाची तोडली जातेय आणि कर्मचाऱ्यांशी वाद कोण घालतंय? सगळीच गंमत...! घरमालक कुटुंबासह परदेशात असतो, ही माहिती मला मिळाल्याने माझं काम सोपं झालं. त्यामुळे अशा प्रकरणात गृहपाठ महत्त्वाचा असतो, एवढं लक्षात ठेवायचं. माझ्याबरोबर तुमचाही दोन तास फूल टाईमपास झाला की नाही. बॅंका, सरकारी कार्यालये, पीएमपी बस, दुकानदार, वाहतूक पोलिस यांच्याशी मी अशी ‘तात्विक चर्चा’ अधून-मधून करत असतो. वेळ कसा निघून जातो, हेच कळत नाही.’ असं म्हणून सुधीरभाऊंनी टाळीसाठी मित्रांपुढे हात पुढे केला.

Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 17th May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama
go to top