मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण

‘जागतिक हास्यदिनापासून मी नियमित हसायला सुरवात करणार आहे. कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख झाले तरी हसणं सोडायचं नाही, असं मी ठरवलंय.’ समीरने गंभीर मुद्रा करीत आपला संकल्प सोडला. एक जानेवारीला नियमित व्यायाम करायचाही तू संकल्प सोडला होतास, त्याचं काय झालं? असा प्रश्‍न आमच्या ओठावर आला होता.

‘लहानपणी आम्ही फार गरीब होतो. त्यामुळं आम्हाला हसणं कधी परवडलंच नाही. चेहऱ्यावर सतत दुःख पांघरूण आम्ही वावरत असायचो. चुकून कधी आनंद झाला तरी आम्ही आलटून- पालटून हसायचो. एकाचवेळी हसणं, आमच्या खिशाला परवडणारं नव्हतं. लहानपणी आम्ही चित्रपटही हमखास रडू येणारेच पहायचो. सुलोचना, आशा काळे, अलका कुबल या आमच्या आवडत्या नट्या होत्या. आता माझी आर्थिक परिस्थिती बदलली आहे. तरीही जुने दिवस विसरता येत नाही. म्हणून हसत नव्हतो. मात्र, डॉक्टरांनी ‘हसलात तरच जगाल’ असा इशारा दिल्याने हास्यदिनापासून हसायला सुरवात करतोय.’ समीरने हसण्यामागचं कारण सांगितलं.

‘बरं मी काय मदत करू?’ हसू दाबत गंभीरपणे मी विचारले.

‘गेल्या काही वर्षापासून कामाच्या गडबडीत मी हसणंच विसरलोय. सकाळी उठलो की रेसच्या घोड्यासारखं नुसताच पळतोय. पैशांच्या मागं धावून धावून माझी आता दमछाक झाली आहे. त्यातच ताण-तणाव आणि नैराश्‍याने ग्रासल्याने अनेक आजाराची साथसंगत लाभली आहे. त्यामुळं मी हसायचं ठरवलं आहे. पण मला हसायलाच येत नाही. त्यासाठी मला मदत कर. सुतकी चेहरा ठेवून सतत वावरत असल्याने मला कोणी मित्रही नाही. मला मित्रांचीही गरज आहे.’ समीरने म्हटले.

‘मित्रा, हसण्याचं वेळापत्रक ठरवून कोणाला नियमितपणे हसता येत नाही. आनंदाची लयलूट करताना हसणं हे नैसर्गिकपणे चेहऱ्यावर आलं पाहिजे. त्यासाठी छोट्याछोट्या गोष्टींतून आनंद शोधता आला पाहिजे. यासाठी सतत सकारात्मक विचार केला पाहिजे. ‘मन करा रे प्रसन्न ! सर्व सिद्धीचे कारण’ हे ध्यानात ठेव.’ समीरला मी सल्ला दिला.

‘सकाळी व संध्याकाळी एक तास मी हसायचं ठरवलं आहे. त्यासाठी कोणती पुस्तके वाचू?’ पुन्हा गंभीर होत समीरने विचारले.

‘हे बघ असं ठरवून हसता येत नाही. त्यासाठी आपण आपला स्वभाव बदलला पाहिजे. उद्यापासून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काहीही कारण नसलं तरी हसत राहायचं. उत्तम आरोग्यासाठी ते रामबाण औषध आहे’ दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या तो हू लागला.

‘चहा घेणार का?’ या बायकोच्या प्रश्‍नावरही तो हसू लागला. ‘नाश्‍त्याला काय करू?’, या प्रश्‍नावर तो दात काढून हसू लागला.

‘भाजीला काय करू?’ असं विचारल्यावर त्याने जोरात ‘हाऽऽऽहाऽऽऽ’ केलं. त्यानंतर मात्र त्याच्या बायकोनं रणचंडिकेचा अवतार धारण केला. ‘सकाळी सकाळी माकडासारखं दात काढायला काय झालं? मी काय वेडी दिसते का?’ असं म्हणून तिनं लाटणं फेकून मारलं. संध्याकाळी डोक्याला बॅंडेज बांधलेला समीर दिसला.

‘साधं हसणंही नशिबात नाही. सकाळी बायकोशी बोलताना हसायला गेलो तर डोक्याला बॅंडेज बांधावं लागलं. दिवसभर हसायला लागलो तर आख्ख्या शरीराला बॅंडेज बांधायला लागेल नाहीतर येरवड्याच्या मनोरुग्णालयात दाखल व्हावं लागेल. जाऊ दे एखाद्याच्या आयुष्यात नसतं हसणं.’ असं समीर गंभीरपणे सांगू लागल्यावर मी डोक्यावर (स्वतःच्या) मारून घेतलं.

Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 1st May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama
go to top