खड्ड्यात पडला नवरा आता तरी आवरा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama
खड्ड्यात पडला नवरा आता तरी आवरा...

खड्ड्यात पडला नवरा आता तरी आवरा...

‘तुम्ही मला गाडी शिकवणार आहात की नाही, ते सांगा.’ माधुरीने सतीशला इशारा दिला.

‘मला माझ्या जीवाची काळजी आहे,’ असं म्हणून त्याने जीभ चावली.

‘अगं शिकवू. एवढी काय घाई आहे.’ असं म्हणून त्याने विषय बदलला.

‘कधी म्हातारपणी शिकवता का? माझ्या मेलीची कधी हौसमौजच नाही. मी कधी काय मागितलंय आणि तुम्ही ते लगेच मान्य केलंय, असं झालंय कधी? रांधा, वाढा आणि उष्टी काढा यासाठीच माझा जन्म झालाय. मी म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर कधीच गाडीवरून ‘भुर्रऽऽऽ’ पळून गेली असती.’ पदराने डोळे टिपत माधुरीने म्हटले.

‘पण तुला कशासाठी गाडी शिकायचीय?’

‘कशाला म्हणजे? शेजारच्या सोनवणेबाईंना त्यांच्या मिस्टरांनी वाढदिवसाला गाडी घेऊन दिली आणि लगेच शिकवलीसुद्घा. आता मी कोठे दिसले तर हॉर्न वाजवून माझं लक्ष वेधतात. गाडी शिकून त्यांची जिरवायचीय.’ हे ऐकून सतीशने दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर लागोपाठ दोन दिवस स्वयंपाकाची चव बिघडू लागल्याने माधुरीला गाडी शिकवण्याचे त्याने ठरवले.

दुसऱ्या दिवशी सतीश गाडी शिकवू लागला. तीन दिवसांच्या सरावानंतर त्याने रस्त्यावर गाडी नेण्यास सांगितले व तो मागे बसला. गाडी चालवताना माधुरी सारखी आरशात बघू लागली.

‘मागच्या गाड्या बघण्यासाठी आरसे आहेत. गाडी चालवताना आपण कसे दिसतो, हे पाहण्यासाठी नाही.’ सतीशने माधुरीला दटावले.

‘ओ गाडी आलेली दिसत नाही का? बाजूला सरका.’ गाडीच्या पुढे आलेल्या एका व्यक्तीवर ती खेकसली.

‘मॅडम, मी पुढे चाललोय. तुम्ही मागून येताय. मला कसं कळणार, तुम्ही मागून आलाय ते.’ एका गृहस्थाने म्हटलं.

‘तुम्हाला मागं बघून, पुढे चालता येत नाही का? एखादी महिला गाडी शिकत आहे तर तिच्या मार्गात किती अडथळे आणताय. तिने गाडी शिकू नये, अशी तुमची इच्छा आहे का? ’ माधुरीने रस्त्यात भांडण काढले पण सतीशने ‘सॉरी’ म्हणत प्रकरण मिटवले. खड्डे चुकवण्याऐवजी तिची गाडी खड्ड्यात जाऊ लागली. समोर पोलिस नाही, असे पाहून सिग्नल तोडू लागली. अर्जंट ब्रेक मारताना चप्पल रस्त्यावर घासत गाडी थांबवू लागली. थोडं पुढं गेल्यावर पोलिसाने गाडी थांबवण्यास सांगितली.

‘आता मास्क नसला तरी चालतो.’ तिने खुलासा केला.

‘मॅडम तुम्ही सिग्नल तोडलाय. दंड भरायला लागेल.’ पोलिसानं असं म्हणताच ती जोरात म्हणाली,

‘अहो, पाचशे एक रुपये दंड भरा. गाडी शिकताना देवाला देणगी दिली असे समजू. चांगलं असतं ते.’

माधुरीने म्हटले. ही महिला स्वतःशीच बोलतेय, तिची मनःस्थिती ठीक नसावी, असा अंदाज पोलिसाने बांधला.

‘अहो पाचशे एक रुपये द्या ना.’ माधुरीने परत आवाज दिला पण काहीच प्रतिसाद न आल्याने तिने वळून पाहिले तर मागे कोणीच नव्हते.

‘पोलिसमामा, ‘हे’ कोठे गेले? मला ते गाडी शिकवत होते. मागे दोन किलोमीटरवर खड्ड्यात गाडी आदळली, तेव्हा ते बहुतेक पडले वाटतं.’ असं म्हणून तिने गाडी मागे वळवली. थोडं पुढं गेल्यावर सतीश लंगडताना दिसला.

‘अहो, इकडं काय करताय? मला तुम्ही गाडी शिकवायला आलाय ना? असं कसं पडलात? बरं मला सांगायचं तरी मी पडलोय म्हणून. तुम्ही मागे बसला आहात, असं समजून मी बोलत होते. रस्त्यावरील लोकं माझ्याकडं बघून का हसत होते, हे आता मला कळलं. एक काम तुम्हाला धड जमत नाही. आता त्या सोनवणेबाईंची मी कशी जिरवू....’ असं म्हणून माधुरीचा पट्टा चालू झाला.

‘सॉरी ! माझीच चूक आहे, मी असं गाडीवरून रस्त्यात पडायला नको होतं. सॉरी.’’ खाली मान घालून सतीशने म्हटले.

Web Title: Sl Khutwad Writes Panchnama 24th April 2022 Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama
go to top