‘मुंगळाऽऽऽऽ’ने केला घात चिमणरावांचे कानावर हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘मुंगळाऽऽ मुंगळाऽऽऽऽ’’ दोन्ही कानात बोटं घालून, गुंड्याभाऊ तांडवनृत्य करीत असल्याचे पाहून चिमणराव घाबरले. त्यांनी लगेच सौ. काऊला आवाज दिला.

‘मुंगळाऽऽऽऽ’ने केला घात चिमणरावांचे कानावर हात

‘मुंगळाऽऽ मुंगळाऽऽऽऽ’’ दोन्ही कानात बोटं घालून, गुंड्याभाऊ तांडवनृत्य करीत असल्याचे पाहून चिमणराव घाबरले. त्यांनी लगेच सौ. काऊला आवाज दिला.

‘काऊऽऽ, अगं वाटीभर साखर घेऊन ये. गुंडूच्या कानात मुंगळा गेलेला दिसतोय. मुंगळ्याला साखरेचे आमिष दाखवून, बाहेर काढू.’ चिमणरावांनी स्वयंपाकघराच्या दिशेने पाहत म्हटले.

‘अरे चिमण, एवढा कसा रे तू वेंधळा. कानात मुंगळा गेला असेल तर त्याच्या कानात तापलेले तेल ओतायला हवे.’ आईने म्हटले. मोरू आणि मैनाही धावत-पळत आली. ‘अरे चिमण, ही मुंगळ्याची भानगड नसून, बहुतेक जादूटोण्यासारखं काहीतरी दिसतंय. गुंडू कालिजात असताना मालती गुणेने त्याच्यावर जसा प्रेमाचा जादूटोणा केला होता. तसाच काहीतरी प्रकार असावा.’ आईने अंदाज व्यक्त केला. मालतीचं नाव ऐकताच गुंड्याभाऊ भानावर आले.

‘अरे चिमण, काल रात्रभर आपण पुण्यातील गणपती बघत होतो. त्यावेळी ध्वनिवर्धकाच्या भिंतीमुळे माझ्या कर्णपटलाला धडे बसलेत. त्यातच रात्रभर ‘मुंगळाऽऽमुंगळा’ हे गाणं ऐकून, मला दिवसाही तोच भास होतोय. त्यामुळे कानात बोटं घालून, मी तेच गाणं म्हणत नाचत होतो.’ त्यावर सौ. काऊ पदरात तोंड लपवून ‘दळभद्री लक्षण मेलं.! ’ असं म्हणून फिदीफिदी हसू लागली.

‘अप्पा, तुम्ही कोट, उपरणे आणि पुणेरी पगडी घालून, मिरवणुकीत ‘मुंगळाऽऽ ’ गाण्यावर नृत्य करत होता काय?’ मोरूने हसत विचारले. त्यावर गुंड्याभाऊ म्हणाले, ‘नृत्य आणि चिमण ! भलतंच काय बोलतोस मोरू.’

‘काऊ, तू मोरू आणि मैनेला घेऊन, मिरवणुकीला आली नाहीस, तेच बरं झालं. नुसता धांगडधिंगा चालला होता. आमच्या लहानपणी काय मिरवणुका निघायच्या. कुटुंबकबिल्यासह सगळेजण त्यात सहभागी व्हायचे. सगळा आनंदोत्सव चालायचा पण आता गोंधळ उरलाय. कोणावर वचकच राहिला नाही. पूर्वीचं पुणं आता राहिलं नाही.’ चिमणरावांनी खंत व्यक्त केली.

‘तरी बरं ! वेडंवाकडं नाचणाऱ्यांना मी सोट्याचा प्रसाद देत होतो.’ गुंड्याभाऊंनी म्हटलं. तेवढ्यात त्यांनी पुन्हा तांडवनृत्य करायला सुरवात केली.

‘चिमण, हे प्रकरण हाताबाहेर चाललंय बरं का? गुंडूला एखाद्या वैद्याला नेऊन दाखव बरे.’ यावर दोघेही बाहेर पडले. एका दवाखान्यात त्यांनी प्रवेश केला. एका शुभ्रवस्त्रांकित परिचारिकेने सुहास्य वदनेने त्यांचे स्वागत केले.

‘आहेत का डॉक्टर? की विसर्जन मिरवणुकीतील जागरणामुळे झोपले?’ गुंड्याभाऊंनी आगाऊपणे विचारले.

‘अंमळ थोडी प्रतिक्षा करावी लागेल.’ परिचारिकेच्या चेहऱ्यावर गुलाब फुलले होते. गुंड्याभाऊंना ती मालती गुणेच भासली.

‘मिस मालती, तुम्ही अजूनही माझी वाट पाहत आहात का?’ गुंड्याभाऊंनी विचारले. ‘गुंडूला तापात बरळायची सवय आहे’ असे म्हणून चिमणरावांनी वेळ मारून नेली. तेवढ्यात डॉक्टरांचे बोलावणे आले. त्यांनी श्र्वासमापक नळी व रक्तदाब मोजायच्या मशीनने गुंड्याभाऊंना तपासले.

‘डॉक्टर, कान तपासा.’ गुंड्याभाऊंनी म्हटले.

‘डॉक्टर तुम्ही आहात की मी?’ असे म्हणून डॉक्टर डाफरले. त्यानंतर त्यांनी कानही तपासले. चेहरा गंभीर करीत म्हणाले, ‘विसर्जन मिरवणुकीला गेला होतात का? सकाळपासून तुम्ही दोनशेवे पेशंट आहात. तुमच्या कानाचं भजं झालंय. आता तुम्हाला कायमस्वरूपी श्रवणयंत्र बसवायला हवे.’ असे म्हणून डॉक्टरांनी त्यांना औषधे- गोळ्यांबरोबरच श्रवणयंत्रही दिले. ‘दहा हजार रुपये बिल झालंय.’ डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच चिमणरावांनी कानावर हात ठेवले.

Web Title: Sl Khutwad Writes Panchnama Pune 11th September 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punePanchnama