
बायकोच्या हातून आज सकाळी माझा मोबाईल पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. ‘सारखं काय त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलाय.
बायकोच्या हातून आज सकाळी माझा मोबाईल पाण्याने भरलेल्या बादलीत पडला. ‘सारखं काय त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसलाय. सवत परवडली पण तो मोबाईल नको’ असं सारखं ती माझ्या कानीकपाळी ओरडत असते. माझ्या मोबाईलला ती सतत ‘पाण्यात’ पाहत असते. त्यामुळे तिच्या हातून मोबाईल पाण्यात चुकून पडला की मुद्दाम पाडला, याविषयी माझ्या मनात शंका आहे. भिजलेल्या मोबाईलकडे पाहत ‘अमर प्रेम’ चित्रपटातील राजेश खन्नासारखे ‘यह क्या हुआ, कैसे हुआ’ हे गाणं दुःखी अंतःकरणाने म्हणू लागलो. मोबाईल चालू व्हावा, यासाठी सगळे प्रयत्न केले. मात्र काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मोबाईलविना दिवस सुनासुना वाटू लागला. मन कशातच रमेना. बराचवेळ उदासपणे बसून राहिलो. मोबाईल चालू असताना वेळ कसा जायचा, हेच कळायचे नाही. मात्र, आता एक एक मिनिट तासा-तासासारखा वाटू लागला. काहीतरी करायचं म्हणून मी बेड मागे ओढला व फ्रीज पुढे ओढला.
‘अगं काय हे. बेड व फ्रीजच्या मागे किती कचरा साचला आहे. तुझं लक्ष कोठं असतं? एवढा आळशीपणा चांगला नाही. माझं लक्ष नाही, असं पाहून तू घराचा पार उकिरडा केला आहेस.’ मी एवढी तीन-चारच वाक्ये म्हटली. त्यानंतर मात्र फळीवरील भांड्यांनी आपली जागा सोडायला सुरवात केली. दणदण असा आवाज येऊ लागला. त्याचबरोबर माझ्या सात पिढ्यांचा उद्धार होऊ लागला. ‘तुम्हाला काडीचं काम करायला नको. मी मात्र काडी काडी जमवून संसार करते. तुम्ही मात्र काडी टाकून मोकळे होता. तुमच्या या वागण्याला कंटाळून मला अनेकदा काडीमोड घ्यावा वाटतो.’ बायकोचा तोंडाचा पट्टा सुरु झाला.
‘घरात एवढुसा काय तो कचरा दिसला तर घर डोक्यावर घेतलंय. मी दिवसरात्र काबाडकष्ट करते, ते कधी दिसले नाही. घरात बायको आहे, याचं तरी भान असतं का? चोवीस तास डोळ्यापुढे तो मोबाईल धरायचा. फेसबुकवरील परस्त्रीला ‘j1’ झालं का? असं काळ वेळ न बघता विचारायचं. स्वतःच्या बायकोला कधी ‘j१’ झालं का विचारलंय का? सारखं आपलं स्वतःच्या धुंदीत. प्रेमानं कधी बोललाय की माझ्याशी. माझ्या माहेरच्याचं तर कधी कौतुकच नाही. मी मात्र सासरच्या सगळ्यांचं करायचं. घरकामात मला कधी मदत केलीय का? दिवसभर काम करुन दमली असशील, असं म्हणून कधी डोकं वा पाय चेपून दिलंय का? मी म्हणून टिकले. दुसरी एखादी असती ना कधीच पळून गेली असती.’
बायकोच्या जिभेला आता चांगलीच धार आली होती. त्यानंतर तिने माकड, गाढव अशासारख्या शंभर प्राण्यांची मला उपमा दिली. यातील अनेक नावे मी प्रथमच ऐकली होती. तिचा प्राणीशास्राचा एवढा दांडगा अभ्यास असेल, असं मला वाटलं नव्हतं. सलग दोन तास बोलून तिच्या जिभेला कोरड पडली असावी. त्यानंतर तिने ग्लासभर पाणी पिले व परत आपला तोंडाचा पट्टा चालू केला. मी दाखवलेल्या कचऱ्यामुळे मला ब्रम्हांडज्ञान तर मिळालेच पण माझा वेळही मजेत गेला. त्यानंतर तिने बेड व फ्रीजमागील कचरा मला साफ करायला लावला. आता मी शिडीवर चढून पंखे पुसत आहे आणि तोंडाने ‘यह क्या हुआ, कैसे हुआ’ हे गाणं म्हणत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.