एकीच मारा, लेकिन सॉलिड मारा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘अरे काय तुम्ही आजकालची पोरं. सातवीत असून अठ्ठावीसचा पाढा येत नाही. मी तिसरीत असताना माझे शंभरपर्यंतचे पाढे पाठ होते. आमच्यावेळचं शिक्षणच भारी होतं.

Panchnama : एकीच मारा, लेकिन सॉलिड मारा...

‘कितवीस आहेस बाळा?’’ पार्थला त्याच्या दूरच्या नात्यातील मामाने विचारले.

‘सातवीत आहे.’’ पार्थने विचारले.

‘अठ्ठावीसचा पाढा म्हणून दाखव.’’ मामाने म्हटले. त्यावर पार्थने मान नकारार्थी हलवली.

‘अरे काय तुम्ही आजकालची पोरं. सातवीत असून अठ्ठावीसचा पाढा येत नाही. मी तिसरीत असताना माझे शंभरपर्यंतचे पाढे पाठ होते. आमच्यावेळचं शिक्षणच भारी होतं. आता काय शिकवतात कोणास ठाऊक? बरं मराठी महिन्यांची आणि ऋतूंची नावे सांग बघू.’’ मामाने असं विचारल्यावर पार्थने हे काय असतं? असा चेहरा केला.

‘बरं तुला एक कोडं घालतो. प्रत्येकाजवळ अशी गोष्ट कोणती आहे. जी कधीच कमी होत नाही तर सतत वाढत असते. ती गोष्ट माझ्याजवळही आहे. सांग बरं.’’ मामाने विचारले.

‘याचं उत्तर मला माहिती आहे. मूर्खपणा. ती तुमच्याजवळ आहे आणि ती कधीही कमी न होता सतत वाढतच आहे.’’ पार्थने रागाने उत्तर दिले.

‘मामाची चेष्टा करतोस काय? या साध्या प्रश्‍नाचं उत्तरही तुला येत नाही, असं सांग की. उगाचंच माझ्यावर राग काढतोस. त्या प्रश्‍नाचं उत्तर वय असं आहे. वय कधीही कमी होत नाही. उलट ते वाढतच राहतं.’’ मामाने उत्तर दिले.

‘असं काय आहे, की ज्याचं येणंही चांगलं नाही आणि जाणंही चांगलं नाही. या कोड्याचं उत्तर सांग.’’ मामाने विचारले.

‘याचं अर्ध उत्तर मला माहिती आहे. तुमचं आमच्याकडे येणं चांगलं नाही. जाणं मात्र चांगलं आहे.’’ पार्थने उत्तर दिले.

‘नाही रे. त्याचं उत्तर डोळे हे आहे. डोळे येणंही चांगलं नाही आणि जाणंही चांगलं नाही. हल्लीच्या मुलांना अजिबात डोकं चालवायला नको असतं.’’ मामाने असं म्हटल्यावर पार्थने जांभई दिली.

‘मामा, मला आता खेळायला जायचे आहे. ’’ पार्थने म्हटले.

‘अरे हल्लीची मुलं कसले बैठे खेळ खेळताय. त्यामुळे शरीराला अजिबात व्यायाम होत नाही. बरं ते जाऊ दे. एकावेळी किती जोर आणि बैठका मारतोस?’’ मामाने आपली गाडी आता व्यायामाच्या दिशेने वळवली

होती.

‘अहो अभ्यासच एवढा असतो, की जोर आणि बैठकाला अजिबात वेळ नसतो.’’ पार्थने उत्तर दिले.

‘अरे तुला पाढे येईनात, कोड्यांची उत्तरे येईनात की मराठी महिन्यांची नावे सांगता येईनात आणि तू कशाचा अभ्यास करतोस रे. मला तर आजच्या शिक्षणपद्धतीवरच संशय आहे. अरे तुझ्याएवढा मी होतो, तेव्हा मी एकावेळी पाचशे बैठका आणि शंभर जोर मारायचो. लहानपणी व्यायाम केल्यामुळे मी एवढा सुदृढ झालो आहे. आज एका दमात मी शंभर किलोच्या ज्वारीचं पोतं मानगुटीवर उचलून ट्रकमध्ये टाकतो. आख्खा ट्रक मी तासाभरात खाली करतो. आहेस कोठे? मार्केट यार्डमध्ये हमाली करणे, हे येरा-गबाळ्याचं काम नाही.’’ मामानं फुशारकीने म्हटलं.

‘पण मला तुमच्यासारखी हमाली करायची नाही.’’ पार्थने उत्तर

दिले.

‘बरं मग मोठा झाल्यावर काय करायचं ठरवलं आहेस?’’ मामांनी विचारले.

‘काहीही करीन...पण कोणाच्या घरी जाऊन, त्यांच्या लहान मुलांना फालतू प्रश्‍न विचारून भंडावून सोडणार नाही.’’ पार्थच्या या उत्तराने मामाचा चेहरा पार उतरला.

टॅग्स :punePanchnama