
‘पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहील व पावसाचा एकही थेंब पडणार नाही,’ हवामानखात्याचा हा अंदाज ऐकून प्रथमेशने अंजलीला म्हटले.
‘पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहील व पावसाचा एकही थेंब पडणार नाही,’ हवामानखात्याचा हा अंदाज ऐकून प्रथमेशने अंजलीला म्हटले,
‘अगं पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार आहे बरं का? तू आधीच छत्र्या व रेनकोट शोधून ठेव.’ हवामानखात्याने दिलेल्या अंदाजाच्या विरोधात आपला अंदाज व्यक्त केल्यास तो खरा ठरतो, असा गेल्या काही वर्षापासूनचा प्रथमेशचा अनुभव होता. त्यानुसार त्याने आपले मत व्यक्त केले.
‘अंजली, मला हवामानखात्यात नोकरी हवी होती गं. माझ्यासारखा मीच नशीबवान ठरलो असतो. कोठले टार्गेट नाही. अंदाज खोटे ठरले म्हणून कोणी राजीनामा मागत नाही की कसली कारवाई होत नाही. अकार्यक्षमतेचा ठपका नाही. तसेच यांचे अंदाज कोणी गांभिर्यानेही घेत नाही. किती मजा ना? कसलंच टेंशन नाही. आमच्या आॅफिसमध्ये टार्गेटच्या मागे धावताना घोड्यासारखं पळावं लागतंय. काही चूक झाली की बोलणी तर खावी लागतातच शिवाय हातभर मेमोही मिळतो.’ प्रथमेशने उसासा सोडत म्हटले.
‘दुसऱ्याची बायको तुम्हा पुरूषांना सुंदर दिसते. आता या म्हणीत दुसऱ्याची नोकरी सुखा- समाधानाची वाटते, असा बदल करायला हवा.’ अंजलीने म्हटले.
‘ते जाऊ दे. आधी छत्र्या शोधून ठेव.’ प्रथमेशने म्हटले.
‘अहो, असं काय करता? घरात एकही छत्री नाही. एक छत्री तुमच्या बहिणाबाईंनी नेली. नेलेली वस्तू परत करायची, त्यांना सवय आहे का? दुसरी छत्री तुमच्या आईने मंदिरात हरवली.’ अंजलीने हिशेब दिला.
‘याचा अर्थ यंदा नव्याने छत्री खरेदी लागणार. मी आजच त्या खरेदी करतो.’ प्रथमेशने म्हटले.
‘नको. तुम्ही खरेदी- बिरेदीच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला कोणीही फसवू शकतं.’
अंजलीने म्हटले.
‘सुरवात तर तुझ्या वडिलांनी केली...’ असे म्हणत त्याने जीभ चावली. तेवढ्यात त्याला दोन महिन्यांपूर्वीची त्याची पायमोज्यांची खरेदी आठवली. दहा दुकाने हिंडूनही अंजलीला एकाही दुकानात आपल्यासाठी पायमोजे आवडले नव्हते. मात्र, स्वतःसाठी भरपूर साड्या व ड्रेस घेतले. आपण पुढच्या आठवड्यात परत पायमोजे खरेदी करायला येऊ, असे आश्वासन दिल्यानंतर प्रथमेशच्या पोटात गोळा आला होता. यावेळीही असंच काहीतरी व्हायचं, याची त्याला भीती वाटत होती.
‘अगं नको नको. मी छत्री खरेदी करतो.’ प्रथमेशने घाबरून म्हटले.
‘दुकानदाराने जेवढ्या किंमतीत छत्री मागितली आहे, त्याच्या निम्म्या किंमतीत ती मागा. याला बार्गेनिंग करणं म्हणतात. आम्हा बायकांना ते चांगलं जमतं.’ अंजलीने म्हटले.
‘ठीक आहे. निम्म्या किंमतीतच मी खरेदी करतो की नाही बघ.’ असे म्हणून तो तातडीने घराबाहेर पडला.
मंडईजवळील एका दुकानात तो शिरला. एक छत्री त्याने पसंत केली व दुकानदाराला त्याची किंमत विचारली.
‘ही छत्री चारशे रूपयांची आहे.’ दुकानदाराने म्हटले.
‘दोनशे रूपयांना द्या.’ प्रथमेशने बार्गेनिंग करत म्हटले.
‘साडेतीनशेला घ्या.’ दुकानदाराने म्हटले.
‘पावणेदोनशेला द्या.’ प्रथमेशने मागणी केली.
‘तीनशे रूपयांना घ्या.’ दुकानदाराने म्हटले.
‘दीडशे रूपयांन द्या.’ प्रथमेशने म्हटले.
‘आता शेवटचं सांगतो. अडीचशे रूपयांना घ्या.’ दुकानदाराने म्हटले.
‘आता शेवटचं मागतो. सव्वाशे रूपयांना द्या.’ प्रथमेशने म्हटले. यावर दुकानदार चिडला.
‘फुकट घेऊन जा.’ दुकानदाराने रागाने म्हटले.
‘मग एक कशाला दोन द्या.’ प्रथमेशने हट्टाने म्हटले. त्यावर दुकानदाराने त्याच्या कानाखाली ‘दोन’ दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.