अखेर मारुतीराया पावला रिक्षावाला लाइनीत आला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

रिक्षावाले काकांना विचारलं. नागनाथ पार ते शनिपार हे अंतर जास्त नसल्याने आम्ही अपमान सहन करायची तयारी केली होती. मात्र, काकांनी हसतमुखाने होकार दिला.

अखेर मारुतीराया पावला रिक्षावाला लाइनीत आला

‘शनिपारला येता का?’ आम्ही थोडं घाबरतच

रिक्षावाले काकांना विचारलं. नागनाथ पार ते शनिपार हे अंतर जास्त नसल्याने आम्ही अपमान सहन करायची तयारी केली होती. मात्र, काकांनी हसतमुखाने होकार दिला.

‘आजोबा, आरामात बसा.’ असे म्हणून रिक्षातून खाली उतरून त्यांनी आमच्या हातातील पिशवी रिक्षात ठेवली. आम्हाला आणखी एक धक्का बसला. ज्येष्ठ नागरिक बघून, अव्वाच्या सव्वा भाडे घेण्याचा चालकाचा विचार असावा, अशी शंका आमच्या मनात आली.

‘मीटरने येणार की ? आधी ठरवून भाडे घेणार?’ आम्ही पुन्हा थोडं घाबरतच विचारले.

‘आजोबा, त्याची काळजी करू नका. जवळचे अंतर असले तरी मीटरप्रमाणेच येणार. सुट्या पैशांचीही काळजी करू नका.’ त्यांनी दिलासा दिला. यावर मात्र आम्ही रिक्षातून खाली उतरून ‘सूर्य कोठे उगवला आहे’ याची खात्री केली. तो नेहमीप्रमाणे पूर्वेलाच उगवला होता.

‘पुण्यात नवीन दिसताय की रिक्षा व्यवसायात नवीन आहात?’ आम्ही उत्सुकतेने विचारले.‘‘पेशवाईपासून आम्ही पुण्यात आहोत. रिक्षा व्यवसायातही आमची दुसरी पिढी आहे. माझे आजोबा पूर्वी टांगा चालवायचे.’ काकांनी माहिती दिली. काहीतरी, कुठंतरी चुकतंय, याची आम्हाला जाणीव होऊ लागली.

‘आम्ही पुण्यातच आहोत ना?’ अशी शंका आम्ही विचारली. त्यावर काकांनी गोड हसत ‘होय’ म्हटले. ‘आम्ही स्वप्नात तर नाही ना’ अशी शंका आमच्या मनात आली व हळूच आम्ही स्वतःला चिमटा काढला. आम्ही जागेच होतो. आता मात्र आमचा धीर सुटत चालला होता. आपल्यासोबत काहीतरी वेगळंच घडतंय, या जाणीवेने आम्ही कासावीस झालो.

‘तुमचा ‘सौजन्य सप्ताह’ चालू आहे का?’ आम्ही पुन्हा शंका विचारली. त्यावर रिक्षावाले काका मोठ्याने हसले व म्हणाले,

‘आजोबा, बारा महिने, चोवीस तास माझा ‘सौजन्य सप्ताह’ चालू असतो.’ आता मात्र आम्हाला घाम फुटला. रिक्षात बसावे की नाही, असा विचार आम्ही करू लागलो. ‘आजोबा, चला लवकर.’ काकांनी असं म्हटल्यावर आम्ही निमूटपणे रिक्षात बसलो. रिक्षावाले काकांचं वागणं पाहून आम्ही अस्वस्थ झालो होतो. शनिपारला आल्यावर काकांनी रिक्षा थांबवली. मीटरमध्ये पाहिले व २७ रुपये झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही तीस रुपये दिल्यावर त्यांनी सुटे तीन रुपये आमच्या हातावर टेकवले. रिक्षातून उतरून, पिशवी बाहेर काढली व आमच्या हातात दिली.‘‘आजोबा, तुमचा दिवस आनंदात जावो.’ अशा शुभेच्छा देऊन, रिक्षावाले काका निघून गेले. हा सगळा प्रकार पाहून आम्ही मटकन खाली बसलो. ‘मारूतीराया, पुण्यात हे काय चाललंय?’ मारूतीच्या मूर्तीकडे हताशपणे पाहत आम्ही म्हटले. थोड्यावेळानं आम्ही स्वतःला सावरलं. रिक्षावाले काकांच्या या वागणुकीने आम्ही अस्वस्थ झालो होतो. आमच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. ब्लडप्रेशरही वाढले. झालेला प्रकार फार चुकीचा होता. यावर उतारा म्हणून आम्ही शेजारच्या रिक्षावाले काकांकडे गेलो. ‘नागनाथ पाराला येता का?’ आम्ही विचारले. ‘वेड लागलंय का? एवढ्या जवळ कोणी येतं का? कोथरूडला नाहीतर औंधला येता का?’ काकांनी मोठ्या आवाजात विचारलं.

‘मीटरपेक्षा जास्त पैसे देतो.’ आम्ही लालूच दाखवली.

‘पैशांची मिजास आम्हाला दाखवू नका. दोन तास मी येथे थांबेल पण जवळचं भाडं करणार नाही.’ रिक्षावाले काकांचा ठाम निर्धार ऐकून आमच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचू लागली. आता आमचे ब्लडप्रेशरही नॉर्मल झाले होते. चेहऱ्यावरील तणाव निवळला होता. ‘आताशी कुठं आम्ही पुण्यात आहोत, असं वाटतंय’ असं म्हणत आम्ही शीळ घालत, प्रसन्न मनाने घराची वाट धरली.

टॅग्स :punePanchnama