
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?
‘मॅडम, माझी बायको उद्यापासून तुमच्याकडं कामाला येणार नाही.’ अस्मिताला दत्तूने ऐकवले. ते ऐकून तिच्या पायाखालची वाळूच सरकली.
‘म्हणजे आपण आपल्या नवऱ्यावर अधून-मधून संशय घेत होतो, हे तर त्यामागे कारण नसेल,’ असे म्हणून ती चरकली. स्वतःला सावरत ती म्हणाली, ‘तुम्ही समजता तसं काही नाही. माझा नवरा मनाने चांगला आहे.’ तिने खुलासा केला.
‘मला तुमच्या नवऱ्याचं काय करायचंय? ते चांगले असतील किंवा वाईट, माझा काय संबंध येतो.’ दत्तूने असं म्हटल्यावर तिच्या जीवात जीव आला.
‘आता आपल्याला सोसायटीतील खबरा घरबसल्या कोण देणार’ याची भीती तिला वाटू लागली. गेल्या दोन वर्षापासून संगीता त्यांच्या घरी घरकामाला होती. कामात एकदम चोख तर होतीच शिवाय सोसायटीतील कोणाच्या घरी काय चाललंय, याची बित्तंबातमी तिच्याकडे असायची. त्यामुळे ती कामावर येणार नसल्याचे ऐकून अस्मिताला दुःख झाले.
‘पगार वाढवून हवाय का? ॲडव्हान्स हवाय का? ’ तिने दत्तूला विचारले.
‘पगाराचा वा ॲडव्हान्सचा काही विषय नाही. ’ दत्तूने म्हटले.
‘बरं जास्त काम पडतं का?’ तिने विचारलं.
‘नाही तसंही काही नाही.’ दत्तूने म्हटले.
‘बरं मग तिच्या तब्येतीची काय तक्रार आहे का?’ अस्मिताने विचारले.
‘तिला काय धाड भरलीया.’ दत्तूने असं म्हटल्यावर अस्मिता पुन्हा चिंतेत पडली.
‘ती काम का सोडतेय, याचं खरं कारण मला कळायला हवं. तरच मी परवानगी देईल.’ अस्मितानं म्हटलं.
‘मॅडम, तुम्ही तुमच्या नवऱ्यावर दिवसभर ओरडत असता. त्यांच्यावर सतत संशय घेत असता. किरकोळ कारणावरून भांडणं उकरून काढता. टोमणे मारून त्यांना हैराण करता. त्यांच्याकडून घरातील सगळी कामं करून घेता. शिवाय शॉपिंगच्या नावाखाली भरपूर पैसेही काढून घेता. एखाद्या खाष्ट सासूसारखं त्यांना सतत घालून- पाडून बोलत असता....’ दत्तूने पाढा वाचायला सुरवात केली.
‘पण तुमच्या बायकोनं माझ्या घरचं काम सोडण्याचा या गोष्टींचा काय संबंध येतो.’ अस्मितानं विचारलं.
‘मॅडम, फार जवळचा सबंध येतो. तुम्ही जसं तुमच्या नवऱ्याशी वागता, त्याचं अनुकरण माझी बायको करतेय. ती सतत माझ्यावर ओरडू लागलीय, घरातील कामंही करून घेऊ लागली आहे. टोमणे मारणं तर नित्याचंच झालंय. काहीतरी खुसपट काढून तास- तासभर भांडायला लागलीय. तुमच्या नवऱ्याएवढी माझ्यात सहनशक्ती नाही. मला माझ्या घरात शांतता हवी आहे. तिच्या सततच्या भांडणानं मी वैतागलोय. तुमच्याकडं कामाला येण्यापूर्वी ती अतिशय प्रेमळ आणि गृहकर्तव्यदक्ष होती. आता सगळं बदललंय. माझा संसार सुखाचा होण्यासाठी तुमच्याघरचं काम बंद करायचा निर्णय मी घेतलाय.’ दत्तूने एका दमात सांगितले. हे ऐकून अस्मिता मटकन खाली बसली.
‘मला एक महिन्याची संधी द्या. माझा स्वभाव मी नक्कीच बदलते पण तुम्ही तिचं काम बंद करू नका. प्लीज.’ अस्मितानं विनंती केली.
संध्याकाळी मंगेश कामावरून घरी आल्यानंतर अस्मितानं हसून स्वागत केलं. गरमागरम नाश्ता व त्यानंतर चहाचा कप त्याच्या हातात ठेवला. संध्याकाळी त्याच्या आवडीची पावभाजी केली. घराकामाला तर हातही लावून दिला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी याचीच पुनरावृत्ती झाली आणि हे पाहून मंगेशचा चेहरा खुलला. कामाला जाताना त्याने दत्तूची भेट घेतली. त्याच्या हातावर पाच हजार रुपये ठेवत तो म्हणाला,
‘मित्रा ! तुझ्या अभिनयाची कमाल आहे. मी आयुष्यभर तुझा ऋणी राहील.’ असे म्हणून दोघेही खळखळून हसले.
Web Title: Sl Khutwad Writes Panchnama Pune 5th June 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..