

‘तुझं मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. तुला कितीवेळा मी समजावून सांगितलं तरी तीच चूक तू पुन्हा पुन्हा करतोस.
‘तुझं मला काहीही ऐकून घ्यायचं नाही. तुला कितीवेळा मी समजावून सांगितलं तरी तीच चूक तू पुन्हा पुन्हा करतोस. तुझ्या या स्वभावाला कंटाळून मी माहेरी कायमची निघून जातेय.’ अंजलीने बॅग भरत सुशांतला ऐकवले.
‘अंजू, सॉरी ! रिअली सॉरी.’ सुशांतने कान पकडून म्हटले. त्यावर अंजली पुन्हा खवळली.
‘मी तुला हजारवेळा सांगितलंय, की आपलं भांडण झाल्यावर तू मला सॉरी म्हणायचं नाहीस. माझा भांडणाचा सगळा मूड जातो. दहा मिनिटे मी तुझ्याशी किती मस्त भांडत होते. मला किती भारी वाटत होतं पण तू सॉरी म्हणून त्यावर पाणी ओतलंस. माझं सुख तुला बघवत नाही, बाकी काही नाही.’ अश्रूंना मोकळी वाट करुन देत अंजली म्हणाली.
‘सोसायटीतील कित्येक घरं बघ. नवरा-बायकोची काय मस्त भांडणं होतात. एकमेकांवर आवाज चढवून काय बोलतात, भांड्यांची फेकाफेक काय होते, दोघंही घर डोक्यावर घेतात आणि इकडे तू ‘भांड म्हटलं की काय भांडू, कसं भांडू’ असं विचारतो. तुझ्या अशा वागण्यानं संसार मला फार मिळमिळीत वाटतो.’ अंजलीने रागावत म्हटलं.
‘अगं मी काय मुद्दाम करतो का? मला तुझा रागच येत नाही, हा काय माझा दोष आहे का?’ सुशांतने आपली कैफियत मांडली.
‘मित्रांबरोबर उशीरापर्यंत पार्टी करत जा. दारू पिऊन डुलत डुलत घरी येत जा. कधीतरी दारू पिऊन, गटारात लोळून ये. असंही तुला मी कितीवेळा सांगितलं असेल पण साडेपाचला ऑफिस सुटलं, की सहाच्या ठोक्याला घरात हजर. थोडा उशीरा घरी आला तर मी काय कोठे पळून चालली आहे का? अरे इतकं कशाला शिस्तीत जगतो.’ अंजलीने तक्रारीचा पाढा वाचला. ‘रविवारी सुटीच्या दिवशी मित्रांना घरी बोलावून ओली पार्टी केली तर बिघडेल का? मी तुम्हाला चकना पुरवायला तयार असताना तुला मात्र मुलांबरोबर खेळायचं असतं. कुटुंबाबरोबर सहलीला जायचं असतं. अरे हे काय जीवन झालं का? एवढं कष्ट करतोस तर कधीतरी एन्जॉय करायला शिक ना.’ अंजलीने असं म्हटल्यावर सुशांतने मान डोलावली. अनेक पुरुष फेसबुक, व्हॉट्सॲपवर कामधंदे सोडून चोवीस तास पडीक असतात.
अनेक अनोळखी महिलांना ‘j1’ झालं का? असं विचारत असतात. तू कधी असं केलं आहेस? दिवसातील मोजून पाच मिनिटे तू फेसबुकवर असतोस व उरलेल्या वेळात मला घरकामात मदत करत असतोस. फेसबुकवर सतत पडीक राहून मला ओरडण्याची एकदा तरी संधी कधी दिली आहेस का? कशाला उगाचंच आदर्श नवरा व्हायला बघतोस? मला तुझ्याकडून अजिबात तशी अपेक्षा नाही. मला तू इतर नवरोबासारखाच कामचुकार आणि आळशी हवा आहेस. कधी खरेदीला निघालो तर निमूटपणे माझे मागे येतो. मला काय खरेदी करायची ती करून देतोस आणि मुकाट्याने बिल देऊन मोकळा होतोस. तिथेही कसला वाद घालत नाहीस. रस्त्यातील एकाही परस्त्रीकडे डोळे वर करून बघत नाहीस. तसं केलंस तर काय पाप लागणार आहे का?’ अंजलीने चांगलीच झाडाझडती घेतली.
‘सॉरी. मी असं मुद्दाम करत नाही. तरीपण मी तुझ्या मनासारखं निश्चित वागेन.’ सुशांतने खाली मान घालत म्हटले. त्यानंतर वहीत तो लिहू लागला.
‘रोज सकाळी नऊ वाजता : भांडण (वेळ दहा मिनिटे), रोज सकाळी दहा वाजता फेसबुकवर पडीक राहणे (वेळ एक तास), सोमवारी, बुधवारी व रविवारी सायंकाळी एक पेग घेऊन रात्री उशीरा घरी येणे, रोज सायंकाळी सहाला परस्त्रीकडे पाहणे (वेळ : पाच मिनिटे).’
सुशांतने केलेले हे टाईमटेबल पाहून ‘तू कधीही सुधारणार नाहीस’ असं म्हणून तिने स्वतःच्या डोक्यावर मारून घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.