आई माझी मायेचा सागर; दिला तिने जीवना आधार!

माझ्यावर नाराज असल्यामुळे तू कालपासून माझ्याशी अबोला धरला आहेस, हे मला कळतंय. त्यामुळंच मातृदिनानिमित्त मी तुला पत्र लिहायचं ठरवलंय.
Panchnama
PanchnamaSakal
Summary

माझ्यावर नाराज असल्यामुळे तू कालपासून माझ्याशी अबोला धरला आहेस, हे मला कळतंय. त्यामुळंच मातृदिनानिमित्त मी तुला पत्र लिहायचं ठरवलंय.

‘प्रिय आई, सप्रेम नमस्कार!

माझ्यावर नाराज असल्यामुळे तू कालपासून माझ्याशी अबोला धरला आहेस, हे मला कळतंय. त्यामुळंच मातृदिनानिमित्त मी तुला पत्र लिहायचं ठरवलंय. लहानपणी माझ्या हातून काही चुकलं तर लगेच तू छोटी-मोठी शिक्षा करायचीस पण कधी अबोला धरला नाहीस. मग आताच असं का वागतेस? तुझ्या अबोलपणामुळे मी मात्र कासावीस होत आहे. जीव अक्षरक्षः तुटतोय गं. वाटल्यास लहानपणीसारख्या हातावर दोन छड्या दे पण हा अबोला सोड.

‘काहीही झालं तरी आई माझ्यासोबत राहणार. मी तिला एकटीला गावाला पाठवणार नाही,’ या माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. हा माझा विचार तुला न आवडल्याने तू नाराज आहेस, हे मला कळतंय पण आई मी तुझ्यावाचून जगू शकत नाही, पाण्यावाचून मासा तडफडतो ना, तशी माझी अवस्था होईल, हे तू लक्षात का घेत नाहीस? गावाकडील घर, शेतीवाडी यातलं मला काही नको. मला फक्त तू हवी आहेस. कायमची!

आई, अतिशय कष्टात तू आम्हाला वाढवलंस. अनेकदा जेवण कमी असलं की ‘आज मला उपवास आहे,’ ‘मी आधीच जेवलेय’ असं काहीबाही सांगून तू आम्हा मुलांना पोटभर जेवायला घालायचीस. आमची पोटं भरली की तुला ढेकर यायचा. तुझं पोट आणि मन तृप्त व्हायचं. आम्हाला गरीबीची झळ लागू नये म्हणून तू दिवस-रात्र राबायचीस. मग आता आम्ही आमच्या पायावर उभं असताना, तुला सुखाचे दिवस दाखवायची आमची इच्छा असताना तू हल्ली निरवानिरवीची भाषा का करतेस? आमच्या सुखा-समाधानासाठी तू आयुष्यभर झटलीस. मग आमची परिस्थिती सुधारली असताना तुला सुखा-समाधानात ठेवायची, हे आमचं कर्तव्य नाही का? आताशी कोठं तुझं वय सत्तर आहे. मला तुझा शंभरावा वाढदिवस जोरात साजरा करायचाय, हे लक्षात ठेव.

गेल्या आठवड्यात मित्र भेटला होता. ‘तुझी आई कोणाकडे असते रे’ असं त्यानं सहज विचारलं. त्यावर मी म्हणालो, ‘‘माझ्याकडे आई राहायला येईल, एवढा मोठा मी नाही रे. मीच आईकडे राहायला असतो.’’ आजही पायाला ठेच लागली की आपसूक ‘आई गं’ हेच शब्द ओठी येतात. मी अडचणीत असताना वा ताण-तणावात असताना तुझ्याशी मनमोकळेपणानं बोललं की डोक्यावरचा ओझं हलकं होतं. तुझ्या बोलण्यात काय जादू आहे, ते कळत नाही पण परिस्थितीशी लढण्यासाठी अंगात शंभर हत्तीचं बळ येतं. अशावेळी मला दिवार चित्रपट आठवतो. अमिताभ बच्चन शशीकपूरला विचारतो, ‘मेरे पास बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है? त्यावेळी शशीकपूर म्हणतो, ‘मेरे पास माँ है’. करोडो रुपयांच्या मालमत्तेपेक्षाही आईचं पारडं नेहमीच जड राहतं, याचं हे उदाहरण आहे. परमेश्वर सगळीकडं पोचू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली, असं म्हटलं जातं. मी मात्र परमेश्वरालाच तुझ्यात पाहतो. लहानपणी तू केलेले संस्कार आयुष्यभर मला उपयोगी पडले. तुझ्या संस्काराच्या पायाभरणीवरच माझ्या यशाची इमारत उभी आहे.

माझी बायको मानसी व दोन्ही मुलांना तुझे महत्त्व मी नेहमी पटवून देतो. आई माझ्यामागे खंबीरपणे उभी होती म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून तुम्ही आहात, हे वाक्य मी त्यांना ऐकवत असतो. काही का असेना त्यामुळं मानसी व मुलं तुला फार जपतात. अनेक अनोळखी लोकांना तुम्ही दोघी मायलेकी आहात, असं वाटतं. एवढी आत्मीयता व जिव्हाळा तुमच्या दोघीत आहे. नातवंडांचा तर तुझ्यावर किती जीव आहे, हे मी तुला वेगळं सांगायला नको. एखाद्यादिवशी तू घरात दिसली नाहीस तर दोघेही कासावीस होतात. एवढं सगळं चांगलं असताना तुला गावाची ओढ कशी लागते, हेच कळत नाही. कदाचित माझ्या संसारात आपली लूडबूड नको, असा विचार तुझ्या मनात असेल तर तो काढून टाक. आजही तू आमची कुटुंबप्रमुख आहेस आणि आमच्या पाठीवरील मायेचा हात काढून, आम्हाला पोरकं करुन, कुटुंबप्रमुख कधी कायमचा गावी जातो का गं? त्यामुळं तू तुझा निर्णय बदल. तू आम्हाला हवी आहेस कायमची आणि शंभरावा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी...

कळावे,

तुझा मुलगा श्रावण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com