काहींनी मदत न करणे ही सुद्धा एक मदतच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

‘घरकामाची आम्हाला पहिल्यापासून आवड आहे. मात्र, आमचं हे काम बायकोच्या डोळ्यात फार खुपते. आम्ही काही काम करायला गेलो, की ‘अरे देवा !

काहींनी मदत न करणे ही सुद्धा एक मदतच...

‘घरकामाची आम्हाला पहिल्यापासून आवड आहे. मात्र, आमचं हे काम बायकोच्या डोळ्यात फार खुपते. आम्ही काही काम करायला गेलो, की ‘अरे देवा ! आता माझ्यापुढे काय वाढून ठेवलंय’ याचा जप ती करत बसते. ‘तुम्ही प्लीज शांत बसून आराम करा,’ अशी विनवणी ती करू लागते. त्यावेळी ‘संसाराच्या रथाची नवरा-बायको ही दोन चाके असून, दोघांनी एकसमान धावले पाहिजे. संसार आपल्या दोघांचा आहे ना. मग तूच एकटी का मरमर काम करतेस? माझी काहीच जबाबदारी नाही का?’ हे वाक्यही आम्ही दिवसातून आठ-दहा वेळा तरी म्हणतो. त्यावेळी ती डोळे शांत मिटून का घेते, कोणास ठाऊक?

आज सकाळी दाराला लटकावलेली दुधाची पिशवी आम्ही काढली व ‘आज मी दूध तापवणार’ अशी घोषणा केली. त्यावेळी बायको गॅलरीत काहीतरी काम करत बसली होती. दूध तापवण्यासाठी आम्ही भांडे शोधू लागलो. बरीच उचकापाचक करूनही ते न मिळाल्याने आम्ही कढईत दूध तापवायचा निर्णय घेतला. मात्र, थोड्यावेळाने आम्हाला फळीवर स्टीलचे भांडे दिसल्याने आमचा जीव भांड्यात पडला. फळीवरचं भांडे काढण्यासाठी आम्ही किचनमधील दिसतील ती भांडे एकमेकांवर रचली व ते भांडे खाली घेतले. भांड्यात दूध ओतण्यासाठी कात्रीने पिशवी कापू लागलो. मात्र, प्रयत्न करूनही पिशवी कापत नसल्याचे पाहून, कात्रीचे एक टोक पिशवीत घुसवले. त्याबरोबर दुधाचा फवारा आमच्या अंगावर उडाला. मग तोच फवारा आम्ही भांड्याकडे वळवला.

या गडबडीत बरेचसे दूध ओट्यावर सांडले. दूध गॅसवर ठेवून, आम्ही किचनओटा साफ करू लागलो. मात्र, घाईगडबडीत तेलाच्या वाटीला धक्का लागल्याने सगळे तेल किचनओट्यावर सांडले. तेलाने माखलेला किचनओटा आम्ही कसाबसा साफ केला. तेलाने माखलेले हात पुसण्यासाठी आम्हाला लवकर कापडच मिळेना. मग आम्ही हात पडद्यांना पुसले. खरं तर पडद्याचा हात पुसण्याशिवाय दुसरा चांगला उपयोग नाही, याची आम्हाला खात्री पटली. त्याच हाताने आम्ही फ्रिज उघडायला गेलो तर फ्रीजवरही तेलाचे डाग उमटलेले दिसले. आता हे डाग कशाने पुसायचे, याचा आम्ही विचार करत असतानाच दूध उतू गेल्याचे आम्हाला दिसले. आता परत किचनओटा आवरणे आले. एका तासांत आम्ही किमान तीनवेळा किचनओटा साफ केला असेल.

‘अगं तुझ्यासाठी आलं घालून चहा करतो गं.’ आम्ही बायकोला आवाज दिला. तिची काळजी आपण नाही घ्यायची तर दुसरं कोण घेणार? चहासाठी आम्ही भांडे शोधू लागलो. मात्र, ते न मिळाल्याने आम्ही कुकरचा वापर करायचे ठरवले. कुकरमध्ये चहा केल्यावर लवकर होईल, असा आमचा अंदाज होता. दूध, पाणी, चहापावडर असे सगळे मिश्रण तयार करून, कुकरच्या भांड्यात ठेवले. सोबत आल्याचे दोन मोठे तुकडेही ठेवले. त्यानंतर गॅस पेटवला. आता तीन शिट्या होण्याची आम्ही वाट पाहू लागलो. थोड्यावेळाने शिट्यांचा आवाज आल्याने बायको किचनमध्ये आली.

‘अहो, एवढ्या सकाळी कशाला कुकर लावलाय? ’ तिने विचारले.

‘अगं चहाचं भांडंच न मिळाल्याने आम्ही कुकरमध्येच चहा केलाय. तू सोफ्यावर जाऊन पेपर वाचत बस. मी तुला तिथं आणून चहा देतो.’ आम्ही तिच्यावर प्रेमाचा कटाक्ष टाकत म्हटले. बायकोची सेवा करण्यातही एक वेगळंच सुख असतं, याची आम्हाला कल्पना आहे. मात्र, किचनमधील परिस्थिती बघून तिने किंकाळीच फोडली.

‘तू आजचा दिवस आराम कर. जेवणही मीच बनवणार आहे...’ आम्ही असं म्हटल्यावर तिला चक्कर का आली, हे आम्हाला कळलेच नाही. तिला फ्रेश वाटावं म्हणून आम्ही सध्या लिंबू-सरबत करतोय. आम्हाला जमेल ना?

टॅग्स :punePanchnama