टाइम (ना) पास!

Panchnama
Panchnama

आमचा वेळ जाता जात नाही, अशी तक्रार करणाऱ्यांचे आम्हाला फार आश्‍चर्य वाटते. याचा अर्थ वेळ कसा घालवावा, हेच त्यांना उमगलेले नसते. आम्हाला मात्र ही अडचण कधीच आली नाही. उलट आम्हाला वेळ फार कमी पडतो, असे आमचे निरीक्षण आहे. आम्हाला थोडा जरी कंटाळा आला तरी आम्ही लागलीच एखाद्या प्रार्थनास्थळाकडे जातो. म्हणजे ध्यान- धारणा किंवा दर्शनासाठी नाही बरं का? तेथील दारातील चपलांच्या ढिगाकडे बघतो आणि लगेचच त्या एकत्रित करतो. त्यानंतर दहा- पंधरा मिनिटांनी लोकांचा उडालेला गोंधळ व झालेली फजिती आम्ही एन्जॉय करतो.

अजून जास्त वेळ आनंदात घालवायचा असेल तर एका पोत्यात चपलांचा ढीग गोळा करून, वीस-पंचवीस फुटांवर तो ठेवतो. प्रार्थनास्थळावरील संयोजकांचेच हे काम आहे, असा समज भाविकांचा होऊन ते रागावण्याच्या फंदात पडत नाहीत. ही सवय आम्हाला लहानपणापासून लागली आहे. गावाकडे लग्नात पूर्वी पत्रावळीवर जेवण वाढले जायचे. जेवण झाल्यानंतर आम्ही पत्रावळीच्या एकमेकांना जोडलेल्या काड्या काढायचो व पत्रावळी गोळा करणाऱ्या माणसाची गंमत बघत शेजारी उभे राहायचो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आता गेल्या वर्षभरापासून आम्ही मास्क घालू लागलो आहे. आम्हाला कंटाळा आला की रस्त्यावरील एखाद्या अनोळख्या व्यक्तीला गाठून, मास्क न काढताच पंधरा- वीस मिनिटे जवळकीने गप्पा मारतो. ख्याली- खुशाली विचारतो. सुरवातीला ती व्यक्ती भांबावते व नंतर गोंधळते. आम्ही निघून गेलो की ‘कोण होती बरं ही व्यक्ती’ या प्रश्‍नाचा भुंगा दिवसभर त्या व्यक्तीच्या मागे लागतो. `विमा घ्या’, ‘क्रेडिट कार्ड घ्या’, ‘कर्ज घ्या’ असे फोन तुमच्याप्रमाणे आम्हालाही सतत येत असतात. अशावेळी त्यांच्यावर चिडून काही उपयोग नसतो.

‘कधीपासून नोकरी करताय? राहायला कुठं आहात? मुलं किती आहेत? लग्न झालंय का?’ अशा कौटुंबिक प्रश्‍नांचा बिनधास्त मारा करावा. आपली चिडचिड होण्याऐवजी आपला वेळ मजेत जातो. मुलं किती आहेत? या प्रश्‍नानंतर लग्न झालंय का? असा प्रश्‍न विचारला तरी हल्लीच्या काळानुसार चालून जातो. अर्थात हे सगळे प्रयोग आपापल्या जबाबदारीवर करायला हवेत, हा वैज्ञानिक इशारा आम्ही देऊन ठेवतो. 

आता काल दिवसभर आम्हाला जाम कंटाळा आला होता. अशा वेळी आमची हमखास यशस्वी ट्रिक वापरायची ठरवली. बराच वेळ टाइमपास करायचा हेतू असल्याने आम्ही एक पोतं घेऊनच एका प्रार्थनास्थळावर गेलो व चपलांच्या ढिगाऱ्यात घुसलो. पोत्यामध्ये चपला गोळा करू लागलो. तेवढ्यात ‘चप्पलचोर...चप्पलचोर’ या आवाजाने भानावर आलो. पाच-सहा जणांनी आम्हाला वेढा दिला होता व आमच्याकडे रागाने ते पाहत होते. दोघांनी आमची गचांडी पकडली. ‘‘चांगला सभ्य घरातील दिसतोस. कधीपासून चप्पलचोरीचे हे धंदे चालू केलेस? गेल्या काही दिवसांपासून चपलांची चोरी होतेय, अशा तक्रारी भाविकांकडून यायला लागल्याने आम्ही पाळतच ठेवून होतो. नेमका आज तावडीत सापडलास,’’ असे म्हणून दोघा-तिघांनी आमच्यावर हात साफ केला. त्यानंतर आम्हाला शंभर उठाबशा काढायची शिक्षा फर्माविण्यात आली. आता आम्ही उठाबशा काढत असून, लोकांचाच मस्त टाइमपास होतोय, हे त्यांच्या नजरेवरून आम्हाला दिसतंय.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com