‘स्लम फ्री सिटी’मुळे पुराचा धोका टळेल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात शहर उभारणी करताना सुटसुटीतपणा, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगला सर्वाधिक प्राधान्य देत; महापालिकेच्या बांधकाम खात्याने ‘स्लम फ्री सिटी’ संकल्पना पुढे आली आहे..

पुणे - पुण्यातील नियोजित ‘स्लम फ्री सिटी’ योजनेत बांधकामांना परवानगी नसलेल्या क्षेत्रांतील झोपडीपट्टीधारकांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी हरितपट्‌टे, डोंगरमाथा, डोंगरउतार, नदीपात्र, कालवे आणि ओढ्या-नाल्यांवर उभारलेल्या साऱ्या झोपड्या हलवून त्यांचे पुनर्वसन होईल. अर्थात, बेकायदा झोपडपटट्या उभारलेल्या नागरिकांनाही घरे मिळणार आहेत. दुसरीकडे नदीपात्र, नाल्यांवरील बांधकाम काढल्याने पूरस्थितीचा धोका टाळता येणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भविष्यात शहर उभारणी करताना सुटसुटीतपणा, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगला सर्वाधिक प्राधान्य देत; महापालिकेच्या बांधकाम खात्याने ‘स्लम फ्री सिटी’ संकल्पना पुढे आली आहे. त्याअंतर्गंत तब्बल ५६८ भागांत विस्तारलेल्या झोपड्या काढून त्या आणि अन्य जागी नव्या इमारती उभारणीचा विचार आहे. ज्यामुळे संपूर्ण शहर झोपडपट्‌टीमुक्त होईल. त्याचवेळी बांधकामांना परवानगी नसलेल्या मात्र, सध्या झोपड्या असलेल्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या झोपडपट्‌टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे. त्यामुळे डोंगरउतार, डोंगरमाथा, नदीपात्र, कालवे, ओढे-नालेही सुक्षित राहणार आहेत. नदीपात्रालगत, ओढ्या-नाल्यांभोवती अतिक्रमणे झाल्याने त्यांच्या मूळ प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम म्हणजे, पावसाळ्यात पूरस्थिती ओढवून नुकसान होत आहे. म्हणूनच ‘स्लम फ्री सिटी’त या घटकाला स्थान राहणार असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महापालिकेकडूनच अंमलबजावणी 
शहरात गलीच्छ वस्ती निमूर्लन करीत झोपडपट्‌टी पुनर्वसन योजने (एसआरए)तील प्रकल्पांना गती देण्याच्या घोषणा आजवर अनेकदा झाल्या. या योजनेची नियमावली जाचक असल्याने बदलही करण्यात येणार असल्याचे संकेत तेवढ्याच वेळा देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, ही योजना पुढे सरकणार नाही, याची व्यवस्था सरकारी पातळ्यांवर झाली; अर्थात योजनेचा वेग काही केल्या कधीच वाढला नाही. त्यामुळे या योजनेतून गेल्या पंधरा वर्षात २० हजार घरे उभारली गेली आहेत. त्यामुळे या पुढील काळात ‘एसआरए’ बंद करून महापालिकाच या योजनेची अमंलबजावणी करणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे शहराला झोपडपट्टीमुक्तीच्या दिशेने नेताना सर्व झोपडपट्टीधारकांना एकसारखे आणि वेळेत घर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. नव्या योजनेत कोणी बेघर राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. अशा योजनेतून या घटकाचा सामाजिक, आर्थिक स्तरही उंचावेल अशाच सुविधा पुरविण्यात येतील. 
-मुरलीधर मोहोळ महापौर, महापालिका, पुणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slum Free City will reduce the risk of floods