बांधकाम मजुरांना ‘स्मार्ट कार्ड’

सनील गाडेकर
शुक्रवार, 12 जुलै 2019

पुनर्नोंदणीची आठवण करून देणार
कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीचे काम दिलेल्या संस्थेचे कर्मचारी ही प्रक्रिया करणार आहेत. कामगारांची माहिती घेतल्यानंतर नोंदणी अधिकारी त्या कागदपत्रांची तपासणी करतील. त्यानंतर नोंदणी करण्यात येईल. एका वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कामगारांना एसएमएस करून पुनर्नोंदणीची आठवण करून दिली जाणार आहे. तसेच नूतनीकरणाच्या वेळी सर्वच कागदपत्रे द्यावी लागणार नाही, असे श्रीरंगम यांनी सांगितले.

पुणे - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता कामगारांची नोंदणी ऑनलाइन होणार आहे. येत्या तीन महिन्यांत ही यंत्रणा सुरू होणार असून, नोंदणी झालेल्या कामगारांना ‘स्मार्ट कार्ड’ देण्यात येणार आहे.

काही उपक्रमांच्या माध्यमातून कामाच्या ठिकाणी जाऊनही कामगारांची नोंदणी केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्त व इतर सरकारी कार्यालयांमधील नोंदणी सुरूच असेल. कामाच्या ठिकाणी नोंदणी झालेल्या कामगारांना इतर प्रक्रियेसाठी कार्यालयात यावे लागणार नाही, अशी माहिती मंडळाचे सचिव एस. सी. श्रीरंगम यांनी दिली. 

मंडळाच्या वतीने कामगारांच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या २९ योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंद असणे आवश्‍यक आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि कामगारांच्या कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने नोंदणीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ही नोंदणीप्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात येणार आहे. या योजनेचा बांधकाम मजुरांसह इतर २१ प्रकारच्या कामगारांचा फायदा होईल.

नोंदणीसह विविध योजनांचे लाभ आदी कामे ऑनलाइन होणार आहे. कामगाराला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सध्या त्यांना सर्व कागदपत्रे जमा करावी लागतात. मात्र, स्मार्ट कार्ड दिल्यानंतर त्यांची बरीचशी माहिती या कार्डमध्ये सेव असेल. त्यामुळे विविध योजनांचा लाभ घेणे कामगारांना आता सोपे जाणार आहे. 
- एस. सी. श्रीरंगम, सचिव, कामगार कल्याणकारी मंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart Card for Construction Worker