स्मार्ट मीटरबाबत महावितरणचे मेळावे

स्मार्ट मीटरबाबत 
महावितरणचे मेळावे
Published on

पुणे, ता. १२ : स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनातील शंका, प्रश्न आणि गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणकडून पुणे परिमंडलात जुलैमध्ये ७२३ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जनजागृती मेळावे घेण्यात आले. या उपक्रमादरम्यान ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १ हजार २७४ वीजबिलविषयक तक्रारींपैकी ९१८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले.
स्मार्ट मीटरबद्दल गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती मेळावे घेत असून या मेळाव्यात आतापर्यंत १ लाख ६६ हजार ४०० ग्राहकांनी सहभाग नोंदविला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
-----
स्मार्ट मीटरचे फायदे
दिवसा वीज वापरावर सवलत : सकाळी ९ ते सायं. ५ या दिवसाच्या वेळेत वीज वापराचे नियोजन केल्यास ग्राहकांना वीजखर्चात प्रतियुनिट ८५ पैशांची बचत करता येते.
अचूक आणि मानवी हस्तक्षेपाविरहित बिलिंग : स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंगची प्रक्रिया अधिक स्वयंचलित होत असल्याने मानवी हस्तक्षेप कमी होऊन बिलिंग प्रक्रियेत अधिक अचूकता व पारदर्शकता येण्यास मदत होते.
वीज वापराचे नियोजन : वीज वापराबाबतची माहिती महावितरणच्या ॲपद्वारे उपलब्ध झाल्याने ग्राहकांना आपल्या दैनंदिन वीज वापरावर लक्ष ठेवता येते आणि अनावश्यक वीज वापर कमी करून वीजखर्चाचे नियोजनही करता येते.

“ग्राहकांनी स्मार्ट मीटरबाबत कोणताही गैरसमज न ठेवता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्याची कार्यपद्धती आणि फायदे समजून घ्यावेत. ग्राहकांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संवाद साधत आहेत. या जनजागृती मोहिमेत ग्राहकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.”
-सुनील काकडे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल

Marathi News Esakal
www.esakal.com