लोकसहभागातून फुलले ज्ञानमंदिर; इंगळगीच्या जिल्हा परिषद शाळेने घडवला ग्रामीण शिक्षणाचा नवा आदर्श

लोकसहभागातून फुलले ज्ञानमंदिर; इंगळगीच्या जिल्हा परिषद शाळेने घडवला ग्रामीण शिक्षणाचा नवा आदर्श
Published on

JEU26B08214, JEU26B08215, JEU26B08216
इंगळगी (ता. अक्कलकोट) ः येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा आकर्षक परिसर.

लोकसहभागातून इंगळगीची जिल्हा परिषद शाळा झाली ‘स्मार्ट’
बोलक्या भिंती, डिजिटल वर्ग अन् आधुनिक सुविधांनी ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा

अक्कलकोट, ता. १३ : शाळेच्या भिंतीवर प्रतापगडापासून भारतीय संविधानापर्यंतची चित्रे, वर्गखोल्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे, प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड अन् एलईडी टीव्ही... हे चित्र एखाद्या खासगी शाळेचे वाटावे; मात्र हे वास्तव आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे. लोकसहभाग, सामाजिक बांधिलकी अन् शिक्षणाविषयीची तळमळ यांच्या जोरावर या शाळेचा झालेला कायापालट ग्रामीण शिक्षणातील सकारात्मक बदलाची दिशा दाखवत आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच आकर्षक रंगसंगती अन् शैक्षणिक चित्रांनी सजलेल्या बोलक्या भिंती लक्ष वेधून घेतात. थ्री-डी शैलीतील चित्ररचना अन् ऐतिहासिक किल्ल्यांच्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, संस्कृती अन् अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे.
शाळेच्या विकासासाठी सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकारातून पुण्यातील एका कंपनीच्या सीएसआर निधीतून सुमारे साडेआठ लाख रुपयांची मदत मिळाली. त्यातून प्रत्येक वर्गात एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, संगणक, टेबल-खुर्च्या अन् साऊंड सिस्टीम अशा आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या.
स्थानिक उद्योजक किशोर माळी यांनी एक लाख ५२ हजार रुपये, तर शिवानंद हत्तुरे यांनी एक लाख रुपयांची मदत केली. लोकमंगल उद्योग समूह, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती अन् शिक्षकांनीही सुमारे साडेतीन लाख रुपयांचे योगदान दिले. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अन् शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यामुळे लोकसहभागातून सुमारे १२ लाख रुपयांच्या निधीतून शाळेचा सर्वांगीण विकास साकारला.

वर्गाबाहेरही ‘आनंददायी शिक्षण’
शाळेतील शिक्षण केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित ठेवण्यात आलेले नाही. दररोज योगशिक्षण, तबलावादन अन् संगणक शिक्षण दिले जाते. शनिवारी आनंददायी शिक्षणांतर्गत अभिव्यक्ती कौशल्य, संवाद-सादरीकरण, बालसभा, ‘माझे अनुभव’ अन् पुस्तक परीक्षण असे उपक्रम घेतले जातात.
रविवारी ‘रानसफर’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना गावातील शेतशिवारात नेले जाते.
या परिवर्तनात मुख्याध्यापक अंकुश मनोहर, डॉ. अनिल सर्जे, शेखलाल शेख, शांतप्पा शिंगे, श्रीकांत बिराजदार, उर्मिला सर्जे, अर्चना फुलारी अन् शमा शेख यांचे विशेष योगदान आहे.

कोट
- आमदार सुभाष देशमुख, किशोर माळी, शिवानंद हत्तुरे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामस्थ तसेच शिक्षक बंधू-भगिनी यांच्या सामूहिक सहभागातून शाळा विकासाचा रथ वेगाने पुढे जात आहे. भविष्यातही सर्वांचे दातृत्व अन् सहकार्य असेच कायम राहावे, ही अपेक्षा आहे.
- डॉ. अनिल सर्जे, सहशिक्षक, जि. प. शाळा, इंगळगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com