#SmartSchool महापालिकेच्याही शाळा 'स्मार्ट'
खासगी शाळांप्रमाणे माझी शाळाही स्वच्छ का नसते? असा प्रश्न विद्यार्थ्यांनीच आम्हाला विचारला. त्यावर मार्ग काढण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांनाच पुढाकार घेण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे प्रकल्पातील शाळांचे रूप पालटले आहे. शाळेत आरोग्यदायी वातावरण निर्माण करून शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
- गौरी वैद, संस्थापिका, स्टेपअप फाउंडेशन
पुणे : महापालिकेची शाळा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येते? अस्वच्छता, पावसात गळणारे छत, थुंकीने रंगलेले भिंतींचे कोपरे, पायाभूत सुविधांची वानवा, अपुरी शिक्षक संख्या... ही यादी आणखी वाढू शकते. मात्र, या साऱ्याला एखादा अपवादही असू शकतो.
महापालिका शाळांची ही दुरवस्था बदलण्यासाठी केवळ महापालिका-शिक्षण मंडळ किंवा व्यवस्थेला दोष न देता, शाळेचा कायापालट करण्याचा विडा या शाळांमधील विद्यार्थ्यांनीच उचलला आहे. शहराच्या विविध भागांतील 21 शाळांमध्ये या परिवर्तनाची विद्यार्थ्यांनी सुरवात केली. शाळांच्या भिंती रंगवण्यापासून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्यापर्यंतचा हा उपक्रम आता बाळस धरू लागला आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये हजारो गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण अपुऱ्या सुविधा आणि शैक्षणिक दर्जा यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था समोर आल्या असून, त्यांनी शिक्षण मंडळाच्या सहकार्याने विविध प्रयोग हाती घेतले आहेत. किशोरवयीन मुलांसाठी "आरोग्य शिक्षण आणि नेतृत्व विकास' या क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुण्यातील "स्टेप अप फाउंडेशन'च्या वतीने अशा शाळांचे स्वरूप बदलण्याचा प्रकल्प विद्यार्थी, शिक्षकांच्या मदतीने हाती घेण्यात आला आहे.
काय आहे प्रकल्प ?
विद्यार्थ्यांकडून शाळांमधील समस्यांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. यातून शाळेतील अस्वच्छता हाच मुद्दा प्रामुख्याने समोर आला. वर्गात कचरा टाकणे, पुड्या खाऊन थुंकणे, स्वच्छतागृह घाण असणे, त्यात पाणी नसणे, आठवडा-पंधरा दिवसांतून एकदाच स्वच्छतागृहाची स्वच्छता होणे, वर्गात व स्वच्छतागृहात डस्टबिन नसणे यांसारख्या समस्या समोर आल्या. यासोबतच स्वच्छतागृहात पाण्याचा वापर न करणे, सॅनिटरी नॅपकिन इतरत्र टाकणे या मुद्द्यातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या प्राथमिक सवयींबाबतचे वास्तव समोर आले.
असे केले बदल...
प्रत्येक शाळेमध्ये "लीडर ग्रुप'ची स्थापना केली. या गटात कार्यरत असणारे 15 ते 20 विद्यार्थी मुलाखतीद्वारे निवडले. हा गट शाळेतील स्वच्छता, स्वयंशिस्त, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, शिक्षक-विद्यार्थी संवाद अशा मुद्द्यांवर भर देऊन काम करीत आहे.
यासोबत वेगवेगळ्या शैक्षणिक कार्यक्रमांची आखणी व नियोजन, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास- सभाधीटपणा वाढवणे, वाचनाची आवड निर्माण करणे यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जात आहे. टाकाऊ बॉक्सपासून कचऱ्याचे डबे तयार करणे, इतर वर्गात जाऊन स्वच्छतेबाबतची चर्चा करणे यांसारख्या सकारात्मक बदलांना शाळांमध्ये सुरवात झाली आहे. काही शाळांमध्ये वर्गांच्या भिंती स्वच्छ करून त्यावर विद्यार्थी चित्र रेखाटत आहेत.
प्रकल्प सुरू असणाऱ्या शाळांमधील स्थिती
- विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली
- विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढला
- शाळेविषयी आत्मीयता वाढून शिक्षणाची गोडी वाढली
- आरोग्याचे प्रश्न कमी होऊ लागले
शाळेत थुंकल्यामुळे भिंती घाण असतात. परिणामी, अस्वच्छता पसरते. त्यामुळे आम्ही शाळेत यायचे टाळायचो, पण आता भिंती छान रंगविल्या आहेत. स्वच्छतेविषयी आम्हाला सांगण्यात येत आहे. आता माझी शाळा अधिक चांगली झाली असून, मी नियमितपणे शाळेत यायला लागलो आहे.
- ओंकार बागदुरे, विद्यार्थी
आमच्या शाळेत स्टेपअप फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शाळेत स्वच्छतेचा उपक्रम राबविल्याने शाळेचे चित्र पालटले आहे. विद्यार्थी स्वतः शाळेत स्वच्छता ठेवत आहेत.
- माजीद शेख, शिक्षक, उर्दू माध्यमिक विद्यालय, बोपोडी