स्मार्ट स्कूल; स्मार्ट स्टुडंट 

पीतांबर लोहार
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

दृष्टिक्षेपात महापालिका शाळा 
मराठी : 62 
सेमी इंग्रजी : 25 
इंग्रजी : 2 
हिंदी : 2 
उर्दू : 14 
एकूण : 105 

पिंपरी - सेमी इंग्रजी, स्पोकन इंग्लिश, कराटे, दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅबद्वारे मार्गदर्शन, रूम टू रीड, वनस्थळी, पतंग वर्ग उपक्रम, वॉटर फिल्टर अशा माध्यमातून महापालिकेच्या शाळा स्मार्ट होत आहेत. 

महापालिकेच्या शाळांबाबत बहुतांश पालकांची शिक्षक शिकवत नाहीत, वातावरण चांगले नाही, इमारती बरोबर नाहीत, अशी प्रतिक्रिया उमटते. मात्र, आता या शाळा बदलत आहेत. त्यासाठी पहिली आणि पाचवीपासून सेमी इंग्रजी वर्ग तीन वर्षांपूर्वी सुरू केले. ते विद्यार्थी आता तिसरी व सातवीपर्यंत पोचले असून, चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलत व वाचत असल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत आढळून आले. 

असे आहेत उपक्रम
- सेमी इंग्रजी : पालकांचा दृष्टिकोन बदलणे व पटसंख्या वाढविण्यासाठी शाळांनी सेमी इंग्रजी उपक्रम राबविला. प्रायोगिक तत्त्वावर आणखी सहा शाळांमध्ये राबविणार. 
- दप्तरविना शाळा : दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी दप्तरविना भरतात. विद्यार्थी आवडीनुसार विविध वस्तू बनवतात. 
- रूम टू रीड : खासगी संस्थेद्वारे 50 शाळांमध्ये रूम टू रीड उपक्रम सुरू आहे. वर्गनिहाय वेळापत्रक तयार असून, विद्यार्थी आवडीचे पुस्तके वाचतात. 
- कराटे प्रशिक्षण : विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी कराटे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे. 
- वॉटर फिल्टर : पिण्याच्या पाण्यासाठी कॉंक्रीट व प्लॅस्टिकच्या टाक्‍या आहेत. आता वॉटर फिल्टर बसविण्यात येणार आहेत. 
- प्रशिक्षण : शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी मुख्याध्यापकांना सात सप्टेंबरला भोसरीतील अंकुशराव लांगडे नाट्यगृहात प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

इंग्रजी पुस्तके हवीत 
तिसरी व सातवीच्या काही विद्यार्थ्यांना अद्याप विज्ञान व गणिताची इंग्रजी माध्यमाची पुस्तके मिळालेली नाहीत. ती मिळावीत, असे एका शिक्षकाने सांगितले. 

शंभर टक्के मुलांना लिहिता, वाचता आले पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सेमी इंग्रजी माध्यम सुरू आहे. पालकांचा शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, महापालिका 

आमच्या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. विविध भाषेतील व वेगवेगळ्या विषयांची पुस्तके आम्हाला वाचायला मिळतात. 
- सायली भणगे, विद्यार्थिनी, सातवी, हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर, दापोडी 

Web Title: Smart school; Smart students