Pune : पार्वतीबाई आठवले ते लीना मोगरे; एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या नवदुर्गा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SNDT

Pune : पार्वतीबाई आठवले ते लीना मोगरे; एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या नवदुर्गा

पुणे : भारतात स्त्री-शिक्षणाच्या चळवळींना जोर धरून काही वर्षं उलटली आणि एका युगपुरूषाला विधवा, निराधार महिलांना आधार व शालेय शिक्षण देत असताना स्त्रियांच्या उच्चशिक्षणाची स्वप्नं पडू लागली. स्त्री उच्च्शिक्षित तर असावीच, परंतु मूल्य, सामाजिक भान, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभान जपणारी 'संस्कृता' असावी, असा आग्रह धरीत महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा यांनी भारतवर्षीय महिला विद्यापीठाची स्थापना केली. हे रोप अनेकांच्या सहकार्याने फुलू लागले, त्याची बौद्धिक, वैचारिक, सामाजिक पाळेमुळे घट्ट रुजू लागली. पुढे शारदेच्या आणि दुर्गेच्या ह्या मूर्त रूपास सर विठ्ठलदास ठाकरसी या महान लक्ष्मीपुत्राचे वरदान लाभले नि वटवृक्षाच्या विस्तार झाला.

विद्यापीठाचे एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ असे नामकरण झाले व पुण्याला रुजलेला वृक्ष आता मुंबईलाही पाळंमुळं रुजवू लागला. ह्या प्रवासात महर्षींना अनेक तेजस्विनी महिलांची सक्षम साथ लाभली. आजवरच्या १००हून अधिक वर्षांतील प्रवासात कित्येक विदुषी विद्यापीठाला लाभल्या तर आल्या तर शेकडो संस्कृता जन्मल्या... अशा नऊ प्रातिनिधिक दुर्गांच्या उल्लेखाचा हा छोटासा प्रपंच!

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या चर्चगेट, जुहू व पुणे येथील मुख्य प्रांगणातील तीन वसतिगृहांची नावे बाया कर्वे, पार्वतीबाई आठवले आणि सीताबाई अण्णिगेरी या तीन तेजस्वी महिलांच्या नावावर आहेत: अण्णांच्या कार्यात स्वतःला झोकून दिलेल्या ह्या दुर्गांचं स्मरण लेखाच्या आरंभी करू. 

महर्षी  कर्वे  यांच्या पत्नी बाया कर्वे यांनी वैधव्याची बालवयापासून झळ सोसली खरी, पण पुढे वडील-बंधूंच्या साथीने शिक्षणास सुरुवात केली. त्या शारदासदनच्या पहिल्या विद्यार्थिनी ठरल्या. वडिलांनी  गोदुबाईंचा म्हणजेच बायांचा विवाह अण्णांशी करून दिला. बाया अनेक स्त्रियांच्या माता ठरल्या आणि आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित व उत्तम नागरिक म्हणून घडवले. त्या अत्यंत विचारी व कष्टाळू होत्या. त्यांनीही सतत प्रवास करून अण्णांनी सुरू केलेल्या 'भाऊबीज फंडा'साठी पैसे गोळा केले.

पार्वतीबाई आठवले  यांनी २६व्या वर्षानंतर शालेय शिक्षण घेतले आणि विधवाश्रमाच्या कार्याला वाहून घेतले. जवळपास २५ वर्षे अण्णांच्या कार्यासाठी भारतभ्रमण करून त्यांनी एक लाखांवर वर्गणी जमवली! त्यांनी शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यावर अनेक दिव्यांतून पार पडून अण्णांचे कार्य आणि स्वतःचे स्त्री-शिक्षणाविषयीचे विचार इतरांपर्यंत पोहोचविले.  प्रा. कोसंबी यांच्याबरोबरच्या जपान-वास्तव्यात तेथील महिला विद्यापीठ पाहणाऱ्या ह्या सर्वप्रथम महिला! मायदेशी परतल्यावर त्यांनी आश्रमासाठी वयाच्या ८६ वर्षांपर्यंत अपार कष्ट घेतले.

स्त्री-सक्षमीकरणाच्या स्वप्नाच्या पूर्ततेची साक्ष ठरलेल्या सीताबाई अण्णिगेरी १९१६ मध्ये महर्षींच्या भारतवर्षीय महिला विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन पदवीधर झालेल्या पहिल्या पाच महिलांमध्ये एक होत्या. जगप्रवास करून येणाऱ्या, सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्यासमवेत जपानच्या महिला विद्यापीठास भेट देणाऱ्या सीताबाई कन्याशाळेच्या आधारस्तंभ होत्या. त्यांनी सॅन फ्रांसिस्कोमध्ये पदव्युत्तर उच्चशिक्षणही घेतले व भारतात येऊन एक बुद्धिमान स्त्री म्हणून आपला ठसा उमटवला. त्यांनी महर्षींच्या 'भाऊबीज फंडा'च्या कार्याध्यक्ष, उद्यममंडळाच्या प्रवर्तक आणि एल.आय.सी. एजंट अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या व दीड लाखांहून अधिक निधी जमवला.

विद्यापीठाच्या १००हून अधिक वर्षांच्या प्रवासात यशस्वी योगदान देणाऱ्या अनेक कुलगुरूंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! माजी कुलगुरू डॉ. माधुरीबेन शाह (१९१९-१९८९) या १९७५ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची शिक्षणाधिकारीपदाची जबाबदारी पूर्ण करून विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर विराजमान झाल्या. १९८१ पर्यंत विद्यापीठाला माधुरीबेनसारख्या विद्वान व सक्षम शिक्षणतज्ज्ञ कुलगुरू म्हणून लाभल्या. विद्यापीठातील निवृत्तीनंतर त्याच वर्षी त्यांची यु.जी.सी.च्या अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. ह्या कर्तृत्ववान विदुषीला शासनाने 'पद्मश्री' बहाल केली.

विद्यापीठामध्ये ज्ञानदानाचे कार्य करून पुढे कुलगुरूपद सांभाळलेल्या पाचव्या दुर्गा  प्रा. मरिअम्मा वर्गीस यांनी एस.वी.टी. होम सायन्स महाविद्यालयाच्या प्राचार्या  (१९८४-८७), रिसोर्स मॅनेजमेंट पदव्युत्तर विभागाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख अशा भूमिका बजावल्या आणि १९९६-२००१ या कालावधीत विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाने नॅकचा ५ तारकांचा दर्जा मिळवून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना मागे टाकले. (२००१). त्यांच्याच कार्यकाळात विद्यापीठात अभियांत्रिकी महाविद्यालय (UMIT), व्यवस्थापन संस्था (JDBIMS) या संस्था स्थापन झाल्या. त्यांना फुलब्राईटने सन्मानित केले गेले होते. महाराष्ट्र राज्य "उत्तम शिक्षक" पुरस्काराच्याही त्या मानकरी होत्या.

विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी व प्राध्यापिका प्रा. वसुधा कामत याही फुलब्राईट सिनिअर संशोधक व महाराष्ट्र राज्य "उत्तम शिक्षक" पुरस्काराच्या मानकरी होत्या.  पी.व्ही.डी.टी. शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये ३ वर्षे अध्यापनकार्य केल्यावर त्यांनी एज्युकेशनल टेक्नॉलॉजी पदव्युत्तर विभागाची प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. पुढे सी.आय.ई.टी.-एन.सी.ई.आर.टी., दिल्ली येथे सह-संचालक म्हणून कार्य करताना त्यांची निवड एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी झाली. २०११-१६ हा त्यांचा  कार्यकाळ नवे शैक्षणिक बदल, तंत्रविज्ञानाच्या सुविधा, नॅकचा 'ए' दर्जा, रुसाची २० कोटी अनुदानाची व शतकमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र-राज्याकडून  ७५ कोटी अनुदानाची मजुरी, अशा अनेक संपादनांचा ठरला. त्या देशाला परिपूर्ण व परिवर्तनशील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देणाऱ्या समितीतील महत्त्वपूर्ण सदस्य आहेत.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने शतक-महोत्सवी वर्षारंभी स्थापना-दिनानिमित्त (जुलै २०१५) "माजी शिष्योत्तमा" म्हणून गौरवलेल्या तीन दुर्गांचा परिचय पाहू.

श्रीमती अर्चना कान्हेरे यांनी  विद्यापीठाच्या पुणे येथील महाविद्यालयातून संगीत विषय घेऊन बी.ए. आणि एम्.ए.  पदवी प्राप्त केल्या. त्यांनी श्रेष्ठ  गायिका माणिकताई वर्मा यांच्याकडे गायनाची तालीम घेतली व पंडित शंकर अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदिशीवर संशोधन केले. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत आणि मराठी व  संस्कृत नाटयसंगीत अशा संगीताच्या विविध क्षेत्रांमध्ये गायिका म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.  त्यांनी ग्वाल्हेर येथील तानसेन समारोह, पुणे येथील सवाई गंधर्व संगीत महोत्सव तसेच अमेरिका व कॅनडा येथेही गायनाकला सादर केल्या. त्या 'स्वरेंदु' या संस्थेच्या उपाध्यक्ष तसेच इंडियन क्लासिकल म्यूझिक फॉर इंडियन विमेन्स क्लब-बँकॉक संस्थेत सिनिअर प्रोफेसर आहेत.  

लोकप्रिय वैयक्तिक फिटनेस ट्रेनर श्रीमती लीना मोगरे यांची 'शरीरस्वास्थ्य आणि आरोग्यक्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय आहे. १९८६ मध्ये 'अन्न विज्ञान आणि पोषण' विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केल्यानंतर, त्यांनी एस.व्ही.टी. कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये अध्यापन केले. त्यांनी १९९४ मध्ये पहिली फिटनेस अकादमी "एल.एम.-द फिटनेस अकादमी" सुरू केली. त्यांचा ब्रँड देशातील आघाडीच्या फिटनेस इन्स्टिट्यूशन ब्रँडपैकी एक बनला. त्या पाच कॉर्पोरेट मालकीच्या आणि फ्रेंचायझी केंद्रांच्या प्रमुख आहेत. त्यांच्या त्यांनी पोषक आहाराबरोबर हायपरटेन्‍शन, ह्रदय-संवहनी रोग आणि मधुमेहासाथीच्या आहारालाही महत्व दिले. प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी, तसेच मॉडेल्स आणि सोशलाइट्स त्यांचे ग्राहक आहेत.