डिजिटल व्यसनाधीनतेवर नियंत्रण हवे 

संवेदनशील विषयाकडे आर्थिक पाहणी अहवालाने वेधले लक्ष

डिजिटल व्यसनाधीनतेवर नियंत्रण हवे संवेदनशील विषयाकडे आर्थिक पाहणी अहवालाने वेधले लक्ष

Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २९ : सोशल मीडियाचा तरुणाईवर होणारा परिणाम लक्षात घेता सरकारने मुलांसाठी सोशल मीडिया वापरासाठी वय-आधारित मर्यादा लागू करण्याचे आवाहन आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आले आहे. भारतात, किशोरवयीनांमध्ये वाढणारे डिजिटल व्यसन आणि स्क्रीनशी संबंधित मानसिक आरोग्य आव्हानांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संवेदनशील विषयाकडे आर्थिक पाहणी अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. स्मार्टफोन, सोशल मीडिया, गेमिंग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील अतिसक्रियतेमुळे तरुणांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर शैक्षणिक प्रगतीवर तसेच दीर्घकालीन आर्थिक उत्पादकतेवर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वय-आधारित प्रवेश मर्यादांवरील धोरणांचा विचार केला जावा, असे अहवालात म्हटले आहे. मुख्य आर्थिक सल्लागार सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी पत्रकारांशी बोलताना सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. कुटुंबांमध्ये स्क्रीन-टाइम मर्यादा, डिव्हाइस-मुक्त तास आणि सामायिक ऑफलाइन कामकाज या बाबींना प्रोत्साहन दिले देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

कार्यशक्तीत घट
डिजिटल व्यसनामुळे म्हणजेच डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे आणि ऑनलाइन सक्रियतेमुळे एकाग्रता कमी होणे, झोपेची कमतरता, चिंतावृद्धी, नैराश्य यासारखा मानसिक त्रास वाढण्याबरोबरच कार्यशक्ती कमी होत असल्याकडे आर्थिक पाहणी अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. यासोबतच ऑनलाइन खर्च, गेमिंग आणि सायबर फसवणुकीमुळे होणारे आर्थिक नुकसान होणे तसेच रोजगारक्षमता,, उत्पादकता घटणे यासारखी अप्रत्यक्ष हानी होत असून १५ ते २४ वयोगटातील तरुणांमध्ये या समस्यांचे प्रमाण जास्त असल्याचे विविध अध्ययनांद्वारे आढळून आल्याचेही अहवालात नमूद केले आहे.

हस्तक्षेप हवा
या आव्हानाला तोंड देण्यासाठी आर्थिक पाहणी अहवालात विविध प्रकारच्या हस्तक्षेपांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये सायबर-सुरक्षा शिक्षण, समवयस्क-मार्गदर्शक कार्यक्रम, शाळांमध्ये शारीरिक सक्रियता वाढविणे, स्क्रीन-टाइम व्यवस्थापनाबद्दल पालकांचे प्रशिक्षण, वयानुसार डिजिटल प्रवेश धोरणे आणि हानिकारक सामग्री असलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मची जबाबदारी निश्चित करणे यासारख्या उपाययोजनांचा समावेश असावा.

२०२४ मधील स्थिती
- भारतात सुमारे इंटरनेट वापरकर्त्यांपैकी निम्म्या जणांनी ऑनलाइन व्हिडिओ पाहिले, ४३ टक्के लोकांनी सोशल मीडियाचा वापर केला, ४० टक्के लोकांनी ईमेल किंवा स्ट्रीमिंग संगीत वापरले आणि २६ टक्के लोकांनी डिजिटल पेमेंट केले.
- ओटीटी व्हिडिओ आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर सुमारे ४० कोटी वापरकर्ते
- सोशल मीडियावर जवळजवळ ३५ कोटी वापरकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com