सोशल मिडियावरून अल्पवयीन मुली टार्गेट

सोशल मिडियावरून अल्पवयीन मुली टार्गेट
Published on: 

सकाळ एक्सक्ल्युझिव्ह
-------------
फ्रेंड रिक्वेस्टपासून अपहरणापर्यंत;
सोशल मीडियावर मुलींचे ‘टार्गेटिंग’

१० महिन्यांत ३०७ अल्पवयीन मुली बेपत्ता; दररोज एका मुलीचे अपहरण

तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : सोशल मीडियातून अल्पवयीन मुलींना टार्गेट केले जात असून १ जानेवारी ते २२ ऑक्टोबरपर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातील तब्बल ३०७ अल्पवयीन मुलींचे अपहरण (दररोज एक) झाल्याची माहिती समोर आली आहे. पालकांच्या तक्रारींवरून पोलिसांनी यातील २४५ मुलींना शोधून काढले, पण अजूनही ६२ अल्पवयीन मुली ना स्थानिक पोलिसांना, ना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला सापडल्या.

सोलापूर शहर-जिल्ह्यातून मागील १० महिन्यांत दरमहा सरासरी ३० अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची नोंद पोलिसांत आहे. फसवणारे सुरुवातीला फेसबूक, इन्स्टाग्रामवर मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. स्वत:च्या ‘डीपी’वर फोटो छान ठेवतात. तो सुरुवातीला मैत्री, काही दिवसांनी प्रेम आणि विवाह करू, असे काहीतरी आमिष दाखवतो. वयात आलेल्या अल्पवयीन मुलींना त्या समोरील व्यक्तीचा आधार वाटू लागतो, पालकांचे दुर्लक्ष असते. अशावेळी अल्पवयीन मुलीला समोरील तरुणाची सवय लागते. सुरुवातीला तो तरुण किंवा पुरूष सकाळी उठल्या-उठल्या पहिला मेसेज तिलाच करतो. जेवण केले का, काय जेवण केले, काय करत आहेस, बरी आहे का, असे बोलत असतानाच काही दिवसांनी तो प्रेमाचे बोलतो. अल्पवयीन मुलीने स्माईल पाठवले किंवा प्रेमाबद्दल बोलूनही बोलणे बंद नाही केले तर तो तरुण तिला जाळ्यात अडकवतो. तिला फोटो मागतो, काही दिवसांनी भेटायचे ठरते आणि पहिल्याच भेटीत महागड्या वस्तू घेऊन देतो, चांगल्या हॉटेलमध्ये जेवण खाऊ घालतो. बाहेर कोठेतरी फिरायला नेतो. दोन-तीनवेळा असे झाल्यानंतर तो थेट तिला आपल्या शहरात भेटायला बोलावतो. त्यानंतर विवाहाचे आमिष दाखवून जबरदस्तीने अत्याचार करतो. काही दिवसांनी ते पळून जातात, अशी उदाहरणे समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
------------------
कोट:PNE26W61059
अनोळखी तरुण किंवा पुरुष आपल्याला सोशल मिडियातून मैत्री, प्रेमाचे, विवाहाचे आमिष दाखवत असल्यास त्याच्यावर विश्वास ठेवू नये. पालकांनीही आपल्या अल्पवयीन मुलींचे सोशल मीडियावर अकांऊंट आहे का, त्याचा वापर कशासाठी होतोय, याकडे लक्ष द्यायला हवे. शाळांमध्ये अल्पवयीन मुला-मुलींसाठी मोबाईल वापरण्यास मनाई असावी. शिक्षकांनी सोशल मिडियासंदर्भात मुलींना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. मुलींना कोणी त्रास देत असल्यास त्यांनी शाळांमधील तक्रार पेटीत किंवा पोलिस काका, पोलिस दीदीकडे तक्रार नोंदवावी. डायल ११२ या क्रमांकावरही तक्रार करता येते.
- प्रीतम यावलकर, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
-----------------
अल्पवयीन मुलींची आकडेवारी
(१ जानेवारी ते २३ ऑक्टोबरपर्यंत)
ग्रामीणमधील बेपत्ता मुली
२११
सापडलेल्या मुली
१५९
शहरातील बेपत्ता मुली
९६
सापडलेल्या मुली
८६
जिल्ह्यातील न सापडलेल्या मुली
६२

Marathi News Esakal
www.esakal.com